जगप्रसिद्ध घरात बाबा-काका वगैरेही सगळे डाॅक्टर...अन् जिवाचे मोल त्या सगळ्यांनाच कळू नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:59 AM2020-12-02T03:59:20+5:302020-12-02T07:26:09+5:30

आनंदवनातील वेदना, मुक्या प्राण्यांना लळा लावणाऱ्या कुटुंबाने नैराश्य व ताणतणावाचा सामना करणाऱ्या कर्तबगार लेकीची काळजी घेऊ नये? म्हणतात ना, अधिक दु:खी असलेल्या इतरांकडे पाहा म्हणजे स्वत:चे दु:ख हलके होईल.

Editorial on Dr Sheetal Amte Suicide Case over Anandwan Internal Issue | जगप्रसिद्ध घरात बाबा-काका वगैरेही सगळे डाॅक्टर...अन् जिवाचे मोल त्या सगळ्यांनाच कळू नये?

जगप्रसिद्ध घरात बाबा-काका वगैरेही सगळे डाॅक्टर...अन् जिवाचे मोल त्या सगळ्यांनाच कळू नये?

googlenewsNext

‘श्रृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई; दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही’, असे सांगत ज्यांनी चंद्रपूरजवळ वरोऱ्याच्या माळरानावर आनंदवन फुलवले, आसवे अन् अंगाराचा शृंगार साकारला, समाजाने टाकून दिलेल्या कुष्ठरोगी माणसांना छातीशी कवटाळले, पांगळ्यांना पत्थराहून कणखर बनवले त्या कर्मयोगी बाबा आमटेंच्या नातीने, महारोगी सेवा समितीच्या ‘सीईओ’ डाॅ. शीतल आमटे यांनी कसलेसे नैराश्य, कसले तरी वाद व मानसिक तणावाखाली विषारी इंजेक्शनची सुई टोचून घेऊन आत्महत्या करावी? छे...! जेमतेम चाळिशीच्या उंबरठ्यावर असतानाच जागतिक क्षितिजावर पावले उमटलेल्या तरुण कार्यकर्तीचे हे पाऊल कुणालाच रुचलेले नाही. स्वत: पेशाने डाॅक्टर,  त्या जगप्रसिद्ध घरात बाबा-काका वगैरेही सगळे डाॅक्टर... अन् जिवाचे मोल त्या सगळ्यांनाच कळू नये?

मुक्या प्राण्यांना लळा लावणाऱ्या कुटुंबाने नैराश्य व ताणतणावाचा सामना करणाऱ्या कर्तबगार लेकीची काळजी घेऊ नये? म्हणतात ना, अधिक दु:खी असलेल्या इतरांकडे पाहा म्हणजे स्वत:चे दु:ख हलके होईल. ज्या दु:खी, दुबळ्या, नात्यागोत्यांनी अव्हेरलेल्या अभागी जिवांचा सांभाळ आनंदवनात होतो, तिथे डाॅ. शीतलने डोळसपणे अवतीभोवती पाहिले असते तरी खूप होते ना ! डाॅ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हळहळतो आहे. अर्थात, ते साहजिकच आहे. जागोजागी उभ्या राहिलेल्या, राहणाऱ्या सेवाभावी संस्था, समाजसेवक व कार्यकर्त्यांची कुटुंबे, त्या संस्थांना हातभार लावणारे श्रम व धनयोगी, संस्था मोठ्या होत असल्याचे पाहून समाजाच्या चांगुलपणाला मनोमन सलाम करणारा सामान्य माणूस अशा सगळ्यांसाठीच डाॅ. शीतल आमटे यांची ही आत्महत्या धक्कादायक आहे. केवळ आनंदवनच नव्हे तर अवघा महाराष्ट्र शोकाकुल आहे.

Sheetal Amte Biography, Age, Mother, Father, Husband, Son, Daughter, Family -

मुळात आनंदवनसारख्या संस्था हे समाजाचे संचित असते. रंजल्यागांजल्यांची काळजी बुद्धाच्या करुणेशी, गांधींच्या प्रेमभावनेशी तादात्म्य असते. ‘व्यवस्था जिथे कमी, तिथे आम्ही’ म्हणणे हा व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार असतो. शेकडो सेवाभावींनी घरादारावर तुळशीपत्रे ठेवून, रात्रीचा दिवस करून, घाम गाळून फुलवलेले नंदनवन कोलमडून पडणाऱ्यांना उभारीच देते. अशा मंतरलेल्या परिसरांमध्ये आत्मघात होत नाहीत; नवनिर्मिती होते, उज्ज्वल भविष्य अंकुरते,  नवोन्मेष साकारतात. अवघ्या काही वर्षांच्या सार्वजनिक जीवनात किंवा अलीकडे सोशल मीडियातून डाॅ. शीतल आमटे-करजगी यांचे जे महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्त्व समोर आले, ते आनंदवन, हेमलकसा किंवा सोमनाथ प्रकल्पांची स्थापना व वाटचालीतील त्यागाशी, ध्येयवादाशी, समर्पणाच्या भावनेशी मिळतेजुळते होतेच असे नाही. आत्मविश्वास, फारतर आक्रमकता व आक्रस्ताळेपणा यातील रेघ अगदी बारीक असते, हे त्यांच्या लक्षात आले नसेल.

Dr Sheetal Amte-Karajki, granddaughter of Baba Amte, found dead in Maharashtra's Chandrapur - India News , Firstpost

धावणारा जिंकतोच असे नाही, पण कुठे थांबायचे हे ज्याला कळते त्याची जिंकण्याची शक्यता अधिक असते, हेही कळले नसेल. पण, हा दुर्विलास कोणत्याही सामाजिक संस्थांमध्ये कधी तरी येतोच. महापुरुषांच्या पुढच्या पिढ्या तितक्या उंचीच्या असत नाहीत. मोठ्या वृक्षाखाली वाढलेले छोटे वृक्ष डेरेदार बनत नाहीत. फक्त सावल्या मोठ्या होतात. डाॅ. शीतल आमटे यांना म्हणे आनंदवन हे ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचे होते, तिथल्या दुबळ्या माणसांनी वर्षांनुवर्षे चालवलेल्या व्यवसायांना आधुनिकतेचे अंगडे-टोपडे घालायचे होते. सेवाभावी संस्थेला ‘कार्पोरेट टच’ द्यायचा होता. जगभर जायचे होते. काळासोबत बदलताना हे करावेच लागते. त्याला कुणाचा विरोध असायचे कारण नाही. पण, माणसांचे मोठेपण ते इतरांना सोबत घेऊन चालण्यावर ठरते.

Dr. Sheetal Amte-Karajgi on Twitter:

नव्या कल्पना जुन्या कारभाऱ्यांना पटवून देणे, त्यांना शत्रू नव्हे तर सहकारी मानणे, सोबत घेणे, महत्त्वाचे म्हणजे विश्वस्त व मालक यामधील फरक समजून घेणे, हादेखील व्यवस्थापनाचा भाग असतोच ना ! सामाजिक काम हे प्रसिद्धीपासून दूर तपश्चर्येसारखे करायचे असते. सतत व्यक्त व्हायला लावणाऱ्या सोशल मीडियामुळे डाॅ. शीतल यांना कदाचित हा अनुभव मिळाला नसावा, की सार्वजनिक आयुष्यात टीका होणार, चुकांवर बोट ठेवले जाणारच. कशाला प्रतिक्रिया द्यावी व कशाला नाही, हे तारतम्य महत्त्वाचे. आमटे कुटुंबातील अंतर्गत कलहावर होणारी चर्चाही निरर्थकच आहे. मुळात, अशा संस्थांवर मालकी असलीच तर कुटुंबांची नव्हे, समाजाची असते. ते भान राहिले नाही की अशा वादाचा शेवट शोकात्म होतो.

Web Title: Editorial on Dr Sheetal Amte Suicide Case over Anandwan Internal Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.