Editorial: संपादकीय: मळभ हटू लागले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:38 AM2021-08-23T07:38:48+5:302021-08-23T07:40:05+5:30

कोरोनाने सगळ्या उद्योगांच्या तोंडचे पाणी पळवले असताना बांधकाम व्यवसाय त्यापासून वेगळा राहणे शक्यच नव्हते. काेरोनाच्या काळात सारेच व्यवहार थंंडावले. व्यापारउदीम जवळजवळ बंदच पडला. इमारतींची सगळी बांधकाम प्रक्रिया एकदम ठप्प झाली होती आणि खरेदी-विक्री व्यवहार  शून्यावर येऊन ठेपले होते.

Editorial: Corona Lockdown clouds removing from businesses, also in Real Estate | Editorial: संपादकीय: मळभ हटू लागले!

Editorial: संपादकीय: मळभ हटू लागले!

Next

या शतकातले एकविसावे वर्ष सुरू झाले ते कोरोनाची धग थोडी कमी करूनच. त्यामुळे व्यवहार काही प्रमाणात सुरू झाले आणि त्याचा सर्वाधिक फायदा बांधकाम क्षेत्राला झाला. त्याचेच सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. घर खरेदी-विक्रीचे व्यवहार गेल्या वर्षीच्या तुलनेत, जानेवारी ते जुलै महिन्यात, चांगले वधारले आहेत.  येत्या काळात या क्षेत्रातील व्यवहार ३३ टक्क्यांनी वाढतील, असा अंदाज आहे. लॉकडाऊनच्या सुस्त कालावधीनंतर हा बदल बाजारात काहीसे चैतन्य निर्माण करणारा आहे.

कोरोनाने सगळ्या उद्योगांच्या तोंडचे पाणी पळवले असताना बांधकाम व्यवसाय त्यापासून वेगळा राहणे शक्यच नव्हते. काेरोनाच्या काळात सारेच व्यवहार थंंडावले. व्यापारउदीम जवळजवळ बंदच पडला. इमारतींची सगळी बांधकाम प्रक्रिया एकदम ठप्प झाली होती आणि खरेदी-विक्री व्यवहार  शून्यावर येऊन ठेपले होते. या क्षेत्राला लॉकडाऊनच्या काळात अवकळाच प्राप्त झाली. या व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असलेले सारेच बेरोजगार झाले. बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, स्टील, लाकूड, विटा, टाइल्स, सुशोभीकरणासाठी लागणारा माल, गृहकर्ज या सगळ्याची मागणी एकदमच घसरली. मजुरांपासून ते मजुरांचा पुरवठा करणारे ठेकेदार,  कारागीर, आर्किटेक्ट, अभियंते आणि अगदी मालमत्तांच्या व्यवहारातील एजंट या साऱ्यांवर संकट कोसळणे अपरिहार्यच होते. या सगळ्या उदासीन पार्श्वभूमीवर हा व्यवसाय वधारत असल्याची वार्ता सुखद आहे. निवारा ही मूलभूत गरज. क्रयशक्ती कमी झाल्याने त्यापासून वंचित राहण्याची असाहाय्यता क्लेशकारक ठरते. आपल्या हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न साकार होण्याची संधी, हे सुचिन्हच आहे.  केवळ घर किंवा जागांची खरेदी-विक्री होते असे नाही तर त्यामुळे त्यास साहाय्यभूत ठरणाऱ्या सर्वच उद्योगांना अच्छे दिन येतात. बांधकाम मजुरांपासून ते घर सजावटीच्या कामापर्यंत शेकडो उद्योगांना चालना मिळून अर्थ व्यवहाराचा मोठा हिस्सा कार्यान्वित होतो म्हणून ही वार्ता सुखद.  कोरोनामुळे जशी वाहन खरेदी, त्यातही सेकंड हँड चारचाकी गाड्यांची खरेदी वाढली, तसाच  या काळातील घडामोडींचा प्रभाव घरांच्या खरेदीवर पडणे स्वाभाविकच होते. घरूनच काम करण्याच्या वाढत्या सोयीमुळे मोठ्या घराची गरज भासू लागली आहे. यामुळे दोन-तीन बेडरूमची घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला.

अभ्यासाची स्वतंत्र खोली ही एरव्ही चैन, पण आता ती गरज झाली आहे. सगळे सदस्य घरात असताना नोकरी, शाळा, शिकवणी वर्ग यांची एकाचवेळी ऑनलाइन सोय करताना तारांबळ उडू लागली आहे. त्यामुळे एका वाढीव खोलीची आस प्रत्येकाला वाटू लागली आहे.   एकट्या मुंबईत गेल्या वर्षी जुलैमध्ये २,६६२ खरेदी व्यवहार झाले होते, तिथे यावर्षी ९,०३७ व्यवहार झाले आहेत. मुंबई महानगर प्रदेश, पुणे, बंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद चेन्नई व कोलकाता अशा बड्या शहरांमध्ये २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ५८ हजार २९० घरांची खरेदी झाली होती, तर दुसऱ्या तिमाहीत २४ हजार ५७० घरांची खरेदी झाली. राज्य सरकारने २०२०च्या सप्टेंबर ते डिसेंबर आणि २०२१च्या जानेवारी ते मार्चमध्ये मुद्रांक शुल्कात अनुक्रमे ३ आणि २ टक्के सवलत जाहीर केली होती. तसेच एप्रिल-२०२१ पासून महिलांच्या नावे घरखरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

या दोन्हीचा फायदा झाला.  त्यामुळे लोकांच्या घरखरेदीत वाढ झाली. आपले स्वत:चे घर असावे असे अनेकांचे स्वप्न होते. ते त्यांना आवाक्यात आल्यासारखे वाटू लागले. गृहनिर्माण क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस आले. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत भारतात ६२ हजार १३० नवीन गृहप्रकल्पांची नोंदणी झाली. दुसऱ्या तिमाहीत ३६ हजार २६० गृहप्रकल्पांची सुरुवात झाली. २०२१मध्ये सुमारे एक लाख ३० हजार घरे देशातील सात महानगरात विकली जातील असा अंदाज आहे. केवळ महानगरांमध्येच नव्हे तर अगदी लहान शहरे आणि ग्रामीण भागातही याचे परिणाम दिसू लागतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. वास्तविक, २०१७-२०१९ हा बांधकाम क्षेत्रासाठी उत्तम काळ होता. त्या आधारावर २०२० मध्ये विक्रमी व्यवहार होतील अशी अपेक्षा होती, पण कोरोनाने दणका दिला आणि सगळे ठप्प झाले. साऱ्यांचे आडाखे चुकत आर्थिक गणित फिसकटले. त्यामुळेच आता बांधकाम क्षेत्राला हात देणारा हा कल कायम राहावा आणि त्याची सकारात्मक प्रभा इतर उद्योगांवर पडून सगळ्या अर्थव्यवस्थेनेच उभारी घ्यावी, असेच सर्वांच्या मनात आहे.

Web Title: Editorial: Corona Lockdown clouds removing from businesses, also in Real Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.