न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे; हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:19 AM2019-09-09T02:19:49+5:302019-09-09T06:15:37+5:30

विक्रमचे अवतरण हुकले असले तरी चांद्रयान सुरक्षित आहे आणि ते पुढील सात वर्षे माहिती पुरविणार आहे. नासाने आपली काही यंत्रे या यानावर ठेवली आहेत. यातून इस्रोची विश्वासार्हता किती वाढली आहे हे यावरून कळून येते.

Editorial On Chandrayan 2 Mission, Neither interruption nor disappointment is ISRO's Line; This line will lead to further success | न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे; हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार

न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे; हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार

Next

चंद्रावर ठसा उमटविण्याचा इस्रोचा प्रयत्न अगदी थोडक्यात हुकला असला तरी देशात निराशा नाही, उलट देशाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे. चांद्रयान मोहिमेचे हे लौकिक यश आहे. ही मोहीम सोपी नव्हती. ताशी २२ हजार किलोमीटर वेगाने जाणारे यान केवळ पंधरा मिनिटांत ताशी पाच किंवा सात किलोमीटर या वेगावर आणणे हे काम अतिअवघड असते. यानाला अचूक सूचना देण्याबरोबरच यानाची गती कमी करणारे रॉकेट योग्य क्षणी आणि परस्परपूरक रीतीने प्रज्वलित होतील, याची खात्री करावी लागते. दूर अंतराळात हे काम करून घेणे हे प्रगत देशांना आजही कठीण जाते. अमेरिका व रशिया यांनी यावर हुकूमत मिळविली असली तरी त्यांच्या अपयशाची यादीही मोठी आहे. इस्रायलसारख्या शास्त्रसंपन्न देशालाही मागील महिन्यात अपयश आले होते.

Image result for chandrayaan 2

अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांच्या तुलनेत भारतातील वैज्ञानिक परंपरा फारच तोकडी. झालीच तर चीनशी भारताची तुलना होईल. चीनने अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे व आता अमेरिका, रशियाशी स्पर्धाही सुरू केली आहे. परंतु, चीनमधील व्यवस्था व भारताची आर्थिक-सामाजिक-राजकीय व्यवस्था यांची तुलना होऊ शकत नाही. अत्यंत अवघड परिस्थितीत भारताने अवकाश तंत्रज्ञानात प्रवेश केला. या क्षेत्रात फारशी मदत मिळत नाही. स्वप्रयत्नानेच मार्ग काढावा लागतो. इस्रोने नेहमी स्वप्रयत्नाने मार्ग काढला. चांद्रयानाची निर्मिती आणि विक्रमची घडण ही स्वदेशी होती. रशियाने हात आखडते घेतल्यावर २०११ पासून इस्रोने स्वत:च प्रकल्प हाती घेतला आणि त्यात ९५ टक्क्यांहून अधिक यश मिळविले. आकडेवारीनुसार यश मोजण्याची सवय भारताला नाही. गणिती काट्यापेक्षा भावनांच्या लाटांवर जगणारा हा देश आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व आहे. इस्रोच्या नियंत्रण कक्षातही हे दिसून आले. इस्रोचे संचालक सिवन यांना भावना अनावर झाल्या व पंतप्रधानांना त्यांचे सांत्वन करावे लागले.

Image result for chandrayaan 2

शास्त्रीय मुलखात वावरणाऱ्या सिवन यांनी असे करावे काय, यावर काही वाचावीर ताशेरे झाडू लागले. सिवन हे शास्त्रज्ञ असले तरी शेवटी माणूस आहेत. या प्रकल्पात ते तनमनाने किती गुंतले होते, ते यातून दिसून आले. अशी भावनिक गुंतवणूक असल्याशिवाय प्रकल्प यशस्वी होत नाहीत. विक्रमचे अवतरण हुकले असले तरी चांद्रयान सुरक्षित आहे व ते पुढील सात वर्षे माहिती पुरविणार आहे. नासाने आपली काही यंत्रे या यानावर ठेवली आहेत. यातून इस्रोची विश्वासार्हता किती वाढली आहे, हे कळून येते. विक्रम व्यवस्थित उतरले असते आणि प्रज्ञान या रोव्हरने आपले काम सुरू केले असते तर इस्रोला १०० टक्के यश मिळाले असते. शेवटचा क्षण हुकला, पण अन्य बरेच काम सुरू राहणार असल्याने यशाचा टक्का ९५ वर आला.

Image result for chandrayaan 2

विक्रमचे अवतरण पाहण्यास पंतप्रधान मोदी नियंत्रण कक्षात हजर होते आणि शनिवारी सकाळी पुन्हा नियंत्रण कक्षात जाऊन त्यांनी इस्रोच्या निराश शास्त्रज्ञांसमोर प्रेरणादायी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अपयश हा शब्दही येऊ दिला नाही. पंतप्रधानांची ही कृती इस्रोला मोठे बळ देणारी व देशाला इस्रोच्या पाठी उभी करणारी ठरली. इस्रोचे यश थोडक्यात हुकल्यानंतरही भारतीय ताठ मानेने फिरू लागले. निर्भेळ यश मिळाले नसूनही विषण्ण वातावरण झाले नाही. भारतीय मानसिकतेमधील हा फरक समजून घेतला पाहिजे. अपयशाकडे सकारात्मक नजरेने पाहणे आवश्यक असते. भारताकडे तो गुण नाही, असे नेहमी म्हटले जाते. या गुणाची थोडी प्रचिती या वेळी आली. चांद्रयान मोहिमेबद्दल इस्रोने वेळोवेळी भरपूर माहिती देऊन, शेकडो विद्यार्थ्यांना तेथे बोलावून वातावरणनिर्मिती केली होती. त्याचाही फायदा झाला. चांद्रयानाच्या यशासाठी कोणी यज्ञ घातले नाहीत वा पूजाअर्चा केल्या नाहीत. बºयापैकी शास्त्रीय नजरेने कोट्यवधी भारतीयांनी इस्रोच्या बरोबरीने या मोहिमेत भाग घेतला. विक्रमला चंद्रस्पर्श झाला नसला तरी चंद्रापासून अवघ्या दोन किलोमीटरपर्यंत मजल मारण्याचे कौशल्य भारताच्या हाती आले असल्याचे इस्रोने दाखवून दिले आणि जगानेही इस्रोची पाठ थोपटली. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे, न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे. हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार आहे.

Image result for chandrayaan 2

Web Title: Editorial On Chandrayan 2 Mission, Neither interruption nor disappointment is ISRO's Line; This line will lead to further success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.