संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:01 IST2025-10-17T07:59:48+5:302025-10-17T08:01:31+5:30
१५ वर्षांपूर्वी तब्बल ७६ पोलिसांच्या हत्येचा डाग असलेला सर्वोच्च नेत्यांपैकी एक मल्लाेजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले.

संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
रक्तरंजित संघर्षाचा संदर्भ असलेल्या प्रसंगांमध्ये एखाद्या भावनिक मुद्द्याचे खूप उदात्तीकरण करायला नको, हे ठीकच. पण, जिथे फुलांऐवजी फक्त रक्ताचेच सडे पडलेले असतात, आयुष्ये-कुटुंबे उद्ध्वस्त झालेली असतात, तिथे फुलांचा मोहक सुगंध, चेहऱ्यावरील निर्मळ हास्य सारेकाही दुर्मीळ असते. म्हणून अशा क्षणांचे महत्त्व अधिक. महाराष्ट्राने, देशाने असाच क्षण बुधवारी अनुभवला. नक्षलवादी चळवळीचा रणनीतिकार, मास्टरमाइंड, १५ वर्षांपूर्वी तब्बल ७६ पोलिसांच्या हत्येचा डाग असलेला सर्वोच्च नेत्यांपैकी एक मल्लाेजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. शस्त्र टाकून संविधान हाती घेतले. तेव्हा, याच वर्षी, गेल्या १ जानेवारीला पोलिसांना शरण आलेली भूपतीची पत्नी विमला सिडाम ऊर्फ तारक्का हिला मंचावर बोलावून घेण्यात आले.
आपले समर्पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावे अशी भूपतीची व तारक्काचीही इच्छा होती. मग फुलांचा गुच्छ देता-घेताना तिने मुख्यमंत्र्यांना, ‘आप आए, बहुत अच्छा लगा’, असे धन्यवाद दिले. साठी ओलांडलेल्या तारक्काचा चेहरा उजळून निघाला होता. ते पाहून सत्तरीतील भूपतीच्या चेहऱ्यावर हास्य खळाळले. राज्यघटनेने सन्मानाने जगण्याचा हक्क लाभतो हे ज्याच्या डोक्यावर सहा कोटींचे इनाम अशा भूपतीसारख्या जहाल माओवाद्यालाही पटल्याचे द्योतक हा दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. भूपतीची भावजय, चाैदा वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये चकमकीत मारला गेलेला मोठा भाऊ किशनजी याची पत्नी पोटुला पद्मावती ऊर्फ सुजाता हिने गेल्या महिन्यात तेलंगणा पोलिसांसमाेर शरणागती पत्करली. थोडक्यात, बंदुकी व रक्तापातासोबत हयात काढलेले संपूर्ण कुटुंब आयुष्याच्या सायंकाळी सुरक्षेला शरण आले. पण, त्यामुळे माओवाद्यांचा रक्तपात थांबविण्यासाठी जीव धोक्यात घालणारे पोलिस, अन्य सुरक्षा पथकांची कामगिरी कमी महत्त्वाची ठरत नाही.
महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनी एकमेकांशी समन्वय ठेवून आखलेले डावपेच, धाडसी कारवाया, टप्प्याटप्प्याने माओवाद्यांना घेरून चकमकींमध्ये केलेला खात्मा यांमुळेच भूपतीला तारक्काची साथ गरजेची वाटली असावी. दहा महिन्यांचे अनुभव तारक्काने पतीला कळवले असावेत. त्याशिवाय, मे महिन्यात माओवादी सीपीआयचा सरचिटणीस बसव राजू ऊर्फ नंबाला केशव राव हा अबूजमाड जंगलात मारला गेल्यानंतर त्या पदाची इच्छा भूपतीच्या मनात होती. कदाचित पोलिसांना शरण आलेल्या तारक्काशी तो संपर्कात असल्याच्या कारणाने भूपतीऐवजी ते पद देवजीला दिले गेले. निराश भूपतीच्या मनात आत्मसमर्पणाची भावना बळावली असावी. क्रांतिकारक असला म्हणून काय झाले, संसार-कुटुंब, सुरक्षित जगणे यांपासून कोणाचीच सुटका नसते. शरणागतीसाठी भूपतीने जे साठ सहकारी तयार केले, त्यातही ही सामान्यांची भावना प्रतिबिंबित झाली आहे. यात तब्बल ४४ महिला नक्षलवादी आहेत. बारा जोडपी आहेत. फसव्या क्रांतीच्या मागे लागून या सगळ्यांनी शस्त्रे हाती घेतली. निरपराधांचे जीव घेतले. सरकारी यंत्रणेला वेठीस धरले. विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण केले. त्या कथित क्रांतीचा ओ की ठो माहिती नसण्याच्या वयात म्हणजे अकराव्या-बाराव्या वर्षी हातात बंदूक घेणारी गडचिरोलीची अनिता आढे व हरयाणातील असीन जयराम या जोडप्यानेही शरणागती पत्करली. या दोघांचे लग्न भूपतीनेच लावले होते. यावरून या चळवळीची अवस्था लक्षात यावी. असो.
इंद्रावती खोऱ्यातील दंडकारण्य झोन, रेड काॅरिडोरचे ध्येय आणि एकूणच नक्षलवाद्यांच्या अस्तित्वाला भूपतीच्या शरणागतीने सुरुंग लागला आहे. गडचिरोली जिल्हा जवळपास नक्षलवादमुक्त झाला आहे. साडेचार-पाच दशकांनंतर हा अरण्यप्रदेश विकासाच्या वाटेवर उभा आहे. चंद्रपूर-गडचिरोलीत अब्जावधींची गुंतवणूक होत आहे. नवे उद्योग उभे राहात आहेत. तरुण-तरुणींना रोजगार मिळत आहे. दैन्य-दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून आदिवासींची सुटका होईल, असे आशादायी चित्र आहे. अर्थात, नक्षलवाद आटोक्यात आल्यानंतर सरकारी यंत्रणेची जबाबदारी अधिक वाढणार आहे. स्वत:च्या निष्क्रियतेसाठी सरकारला आता हिंसाचार, रक्तपात व अशांततेची सबब सांगता येणार नाही. परवा भूपतीच्या शरणागतीची तयारी सुरू असतानाच एटापल्ली तालुक्यातील जेमतेम विशीतील गर्भवतीला गावकऱ्यांनी खाटेची कावड करून दवाखान्यात नेल्याने तिचे प्राण वाचले. या दुर्गम प्रदेशात हे रोजचे चित्र आहे. नक्षलवादासोबतच आरोग्य यंत्रणेची दुर्दशा, शिक्षणाची परवड, गरिबांची उपासमार हीदेखील गडचिरोलीची ओळख आहे. नक्षलवादासोबत ही दुसरी ओळख कधी पुसली जाईल आणि आदिवासींच्या जगण्यात सुखाचे झुंजुमुंजु होईल?