अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 05:46 IST2026-04-06T05:45:18+5:302026-04-06T05:46:49+5:30

ही स्वप्ने केवळ अमेरिकेची नाहीत. भारतासह जगभरातील ४० देशांनी एकत्र येऊन मानवी इतिहासातील या नव्या अध्यायाची तयारी चालवली आहे.

Editorial beyond the moon The new history of the Orion spacecraft but the story is not yet complete! | अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!

अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!

जवळपास साडेपाच दशकांनंतर चार अंतराळयात्रींना घेऊन चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या ‘आर्टेमिस-२’ मोहिमेतील ओरियन यानाने नवा इतिहास लिहिला असला तरी ही कहाणी खऱ्या अर्थाने सफळ संपूर्ण नाही. १९७२ नंतर प्रथमच माणसाने ‘लो अर्थ ऑरबिट’ म्हणजे पृथ्वीची कक्षा ओलांडली हे खरे. तथापि, रीड वाइजमन, व्हिक्टर ग्लोवर, ख्रिस्तिना कोच हे तीन अमेरिकन व कॅनडाचे जेरेमी हॅन्सन हे अंतराळयात्री यावेळी चंद्रावर उतरणार नाहीत. ‘चंदामामा दूर के, पुए पकाये बूर के’ या अंगाईगीतासारखे दहा दिवस चंद्राभोवती प्रवास करतील, त्याला दुरूनच न्याहाळतील. खरा इतिहास आणखी वर्ष-दीड वर्षांनी लिहिला जाईल. आर्टेमिस-३ किंवा ४ मोहिमेत अंतराळयात्री मोठ्या संख्येने चंद्रावर उतरतील. तिथे मानवी वस्ती, त्यासाठी ऊर्जेची नवी व्यवस्था, लुनार गेटवेच्या रूपाने तिथून मंगळ किंवा सूर्यमालेतील इतर ग्रहांसाठी लाँच पॅडची उभारणी अशी अनेक स्वप्ने सोबत घेऊन इतक्या मोठ्या कालखंडानंतर मानवी पावले तिथे उमटतील.

ही स्वप्ने केवळ अमेरिकेची नाहीत. भारतासह जगभरातील ४० देशांनी एकत्र येऊन मानवी इतिहासातील या नव्या अध्यायाची तयारी चालवली आहे. तरीदेखील ‘आर्टेमिस-२’चे उड्डाण ऐतिहासिकच ठरते. अगदी माेहिमेच्या नावापासून. ग्रीक दंतकथेनुसार अपोलो व आर्टेमिस हे जुळे बहीण-भाऊ. झ्यूस आणि लेटो यांची अपत्ये. आर्टेमिस ही यात थोरली. अपोलो हा सूर्यदेव, तर शिकारीचे प्रतीक असलेली सदाकुमारी आर्टेमिस चंद्रदेवता. शीतयुद्धाच्या काळात सोविएत युनियन व अमेरिकेदरम्यान सर्व क्षेत्रांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू होते, तेव्हा रशियाच्या सोयूझ मोहिमेच्या स्पर्धेत अमेरिकेने अपोलो मोहीम राबविताना सूर्याची आराधना केली. तब्बल सतरा उड्डाणांची अपोलो मोहीम राबविली. अपोलो-८ पासून एकूण २४ जणांनी पृथ्वीच्या कक्षेचा उंबरठा ओलांडला.

२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, बझ ऑल्ड्रिन व मायकेल कोलिन्स यांना घेऊन ‘अपोलो-११’ यान चंद्रावर उतरले. कोलिन्स यानात बसून राहिले आणि आर्मस्ट्राँग व ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याचा इतिहास लिहिला. त्यानंतर बिघाड झालेले ‘अपोलो-१३’ वगळता १९७२ पर्यंत पुढच्या पाच मोहिमांमधून पंधरा जण चंद्रावर पोहोचले. अंतराळयान चंद्रावर उतरविले. दरवेळी एकजण यानात बसून राहिला व इतर दोघे खाली उतरले. दहा जणांनी चांद्रभूमीचा अद्‌भुत स्पर्श अनुभवला. कित्येक क्विंटल वजनाचे तिथले खडक, माती पृथ्वीवर आणली. चंद्रावरील भूमीला स्पर्शाचा रोमांच कितीही अवर्णनीय असला तरी हे सारे प्रचंड खर्चीक होते. अब्जावधी डाॅलर्स खर्च केवळ पुन्हा पुन्हा माणसाने तिथे उतरण्यासाठी करण्यात काही हंशील नव्हते. अपोलो माेहीम थांबविण्यात आली. त्याऐवजी पृथ्वीतलावरील सामान्य माणसाचे आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदींसाठी उपग्रहांचे प्रक्षेपण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ये-जा, स्पेसवाॅक, विविध प्रकारचे संशोधन यावर भर देण्यात आला. त्याचे फायदे आपण रोजच्या जगण्यात अनुभवतो आहोत. आता छोट्या-छोट्या देशांचे अंतराळयात्री अंतराळ स्थानकावर जाताहेत.

दुसऱ्या बाजूला अमेरिका, रशिया, युरोप आदींच्या अंतराळ संस्थांनी चंद्र मागे सोडला. त्या पलीकडे सूर्यमालेतील मंगळ, शनी, गुरु आदी ग्रह किंवा अगदी सूर्यमालेच्या टोकावरील डाॅर्फ प्लॅनेटचा अभ्यास सुरू झाला. १९९७ साली पृथ्वीवरून निघालेले कॅसिनी यान २००४ मध्ये शनीच्या कक्षेत पोहोचले. तेरा वर्षे प्रचंड अभ्यास केल्यानंतर शनीच्या वातावरणात घुसवून त्याचे अवतारकार्य संपविण्यात आले. २०११ साली गुरुच्या दिशेने झेपावलेले जुनो यान २०१६ मध्ये तिथे पोहोचले. लँडर-रोव्हर, ऑर्बिटर मिळून दहा मंगळ मोहिमा यशस्वी झाल्या. यात २०२२ पर्यंत आठ वर्षे मंगळाच्या कक्षेत फिरून यशस्वी झालेली भारताची माॅम (मार्स ऑर्बिटर मिशन) मोहीमदेखील होती. मंगळावर वेगळ्या स्वरूपात पाणी उपलब्ध असल्याची शक्यता अनेकदा वर्तविण्यात आली आहे.

मानवजातीला मंगळावर वस्तीची स्वप्ने पडत आहेत....मंगळ असो की अन्य ग्रह, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पृथ्वीपेक्षा चंद्रावरून प्रवास करणे सोपे. चंद्रावरील कमी गुरुत्वाकर्षण, परिणामी कमी एस्केप व्हेलाॅसिटी, कमी किंवा नगण्य वातावरण या स्थितीत एखाद्या यानाचे चंद्रावरून प्रक्षेपण कमी खर्चाचे, अधिक सुलभ असेल. म्हणूनच जगाला ग्रीक दंतकथांमधील अपोलोची बहीण आर्टेमिस आणि तिच्या खांद्यावर बसून चंद्राचा थांबा आठवला. नवा मानवी इतिहास त्या थांब्यावर लिहिला जाईल. तिथे विसावा घेऊन नजीकच्या भविष्यात मानवी अंतराळयान चंद्रावरून मंगळाकडे झेपावेल.

Web Title : आर्टेमिस मिशन: चांद पर नया इतिहास, कहानी अभी पूरी नहीं

Web Summary : आर्टेमिस-2 का चंद्र मिशन एक नया युग है, हालाँकि इस बार अंतरिक्ष यात्री नहीं उतरेंगे। भविष्य के मिशनों में चंद्र ठिकानों और मंगल लॉन्चपैड की परिकल्पना की गई है, जिसमें वैश्विक सहयोग शामिल है। यह अंतरग्रहीय यात्रा की दिशा में एक महंगा लेकिन महत्वपूर्ण कदम है।

Web Title : Artemis Mission: New Lunar History, But the Story Isn't Complete Yet

Web Summary : Artemis-2's lunar mission marks a new era, though astronauts won't land this time. Future missions envision lunar bases and Mars launchpads, involving global collaboration. It's a costly but crucial step towards interplanetary travel.