महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बेराेजगारांच्या हालअपेष्टा, शेतकरी कर्जमाफी किंवा त्यांच्या आत्महत्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, आंदोलने गाजणार नाहीत, तर भलतेच काही तरी घडेल, अशी भीती होतीच. आमदार निवास उपाहारगृहाच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीत ती भीती डोकावली. आता अधिवेशन संपताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या लाॅबीमध्येच तुंबळ हाणामारी केली. एकमेकांचे कपडे फाडले. दोन दिवसांपासून आव्हाड-पडळकर यांच्यात जुंपली होती. नेत्यांसाठी कार्यकर्ते भिडले. ते ठरवूनही असावे. कारण, पडळकरांच्या गँगमध्ये एक जण मकोका आरोपी असल्याचे सांगितले जाते. आव्हाडांचा कार्यकर्ता आत येत असताना स्वत: पडळकर व टोळी कशी टपून होती, हेदेखील महाराष्ट्राने पाहिले. मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर. सभ्यता, सुसंस्कृतपणा वगैरे प्रकार त्यांना माहीत नसावा. याबद्दल त्यांना दोष देऊन फायदा नाही. आपण कोणाला प्रतिष्ठा दिलीय याचा विचार त्यांच्या मार्गदर्शकांनी करायला हवा; पण ते तसे करणार नाहीत. पडळकरांच्या टोळीला सत्तेचा माज असल्याचे आव्हाड म्हणत असले, तरी मुळात हा माज पैसा व पदाचा आहे आणि त्यासंदर्भात आव्हाडांची गँग सज्जनांची आहे, असेही नाही. बेधडक स्वभावाला, दादागिरीला शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेचे लेबल लावल्याने मूळ प्रकृती झाकली जात नसते. पोलिसांनी रात्री कार्यकर्त्याला ताब्यात घेतले तेव्हा आव्हाड स्वत:ही गाडीच्या पुढे झोपले. या राड्यानंतर अपेक्षेनुसार, झाडून सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी हा प्रकार दुर्दैवी, विधिमंडळाच्या पावित्र्याला आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावणारा असल्याचे सांगितले.
दोन्ही सभागृहांमध्ये चिंता, नाराजी, संताप व्यक्त झाला. दिवंगत मान्यवरांची नावे घेऊन सभागृहांचा इतिहास कसा विद्वानांचा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न झाला. ही आमदारांनी केलेली स्वत:चीच सामुदायिक फसवणूक आणि जबाबदारी झटकण्याचा सामूहिक प्रयत्न आहे. विधानभवन परिसराची सगळी जबाबदारी विधानपरिषदेचे सभापती व विधानसभेच्या अध्यक्षांची असते, हे आवर्जून प्रत्येकाने सांगितले. कारण, त्यामुळे सगळी जबाबदारी प्रा. राम शिंदे व ॲड. राहुल नार्वेकर यांच्यावर पडते. राडेबाज आमदार व त्यांचे पक्ष नामानिराळे राहतात. इतिहासाचे वैभव अभिमानाने मिरविणाऱ्या सगळ्यांनी मिळून कोणती राजकीय विकृती जन्माला घातली आहे, याचे उत्तर जनतेला द्यावे लागत नाही. आव्हाड हे शरद पवारांचे, तर पडळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. दीर्घकाळ राज्य चालविणाऱ्या या दोघांसह सर्वांनीच अंतर्मुख होऊन महाराष्ट्राच्या नव्या राजकीय संस्कृतीबद्दल गंभीर विचार करायला हवा. विधानभवनातील हाणामारीनंतर नुसते चुकचुकणे पुरेसे नाही. कारण हा महाराष्ट्राने, तमाम राजकीय पक्षांनी, ते पक्ष जन्माला घालणाऱ्या व चालविणाऱ्या विचारधारांनी जाणीवपूर्वक जन्माला घातलेल्या विकृतीचा परिणाम आहे.
विधान भवनाच्या पायऱ्यांवरून, टीव्ही कॅमेऱ्यांसमोरून जाता-येता असभ्य, गलिच्छ, अश्लील शेरेबाजी, त्यावर उलटून कोणी नजरेने अथवा देहबोलीतून प्रतिक्रिया दिलीच तर अंगावर चालून जाणे, लाखो लोक दोन वेळच्या जेवणाला माेताद असताना चांगले वरण मिळाले नाही म्हणून आमदाराने कँटीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करणे, सभागृहात शिवराळ भाषा ही या विकृतीची लक्षणे आहेत. ...आणि खरा धोका वेगळा व खूप मोठा आहे. गावागावांत, खेड्यापाड्यांत धर्म, जात, राजकीय पक्ष, नेत्यांची भक्ती, अशा वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांचे जीव घेऊ पाहणारी विषवल्ली आता थेट विधानभवन नावाच्या मंदिरात धुमाकूळ घालू पाहत आहे. तिला जोड आहे नव्या उथळ, तकलादू व बोलभांड राजकीय संस्कृतीची.
विधानभवनात येताना आजूबाजूला कार्यकर्ते, त्यांच्या प्रवेशपत्रांसाठी नाना खटपटी, चॅनल्सच्या कॅमेऱ्यांपुढे सनसनाटी विधाने एवढे केले की, राजकीय प्रतिष्ठा मिळते हे पाहून अनेकजण काहीही बरळतात. अनेकांची नेतेगिरी त्यातूनच उभी राहिली आहे. परिणामी, ‘राजकारण व जनसेवेची व्याख्या हीच’ असे खोटे चित्र तयार झाले आहे. मोजकेच, तोलूनमापून, तर्कनिष्ठ बोलणारे दुर्मीळ झाले आहेत. थोडक्यात, विंचू महादेवाच्या पिंडीवर बसला आहे. त्याला चपलेने मारताना पिंडीचे पावित्र्य भंग पावण्याची भीती आहे. त्या भीतीचा किती बाऊ करायचा, हे राज्याच्या कर्त्याधर्त्यांनी ठरवावे.