सत्ताकारणाच्या धुराळ्यात जेव्हा समाजकारणाचा विसर पडतो त्या वेळी राजकीय नेतृत्वाला भानावर आणण्याचे काम बुद्धिवंतांचे असते; परंतु सध्याचा काळ हा तथाकथित बुद्धिवंतांचा आहे आणि त्यांचेही समाजभान हरवलेले असल्यामुळे या तथाकथित बुद्धिवंतांच्या टोळ्याही सत्ताकारणाची समीकरणे सोडविण्यात मश्गूल आहेत. खऱ्या बुद्धिवंतांची प्रभावळ या तथाकथित टोळ्यांनी झाकोळून टाकल्याने प्रसारमाध्यमांनाही त्यांचा विसर पडलेला दिसतो; पण अशा परिस्थितीत वास्तवाची जाणीव लक्षात घेऊन इतरांना उपदेशाचे डोस न पाजता आपल्या कृतीतून सर्वांना संदेश देत वर्तमानाचे भान देण्याचे पाऊल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने उचलले आहे. गेल्या चार वर्षांचा दुष्काळ आणि या वर्षाचा ओला दुष्काळ या अस्मानी संकटाने मराठवाडा-विदर्भ पिचून गेला आहे.
विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीही या माºयातून सुटले नाहीत. त्यांच्यासमोर शिकण्यासाठी पैशाचा प्रश्न उभा राहिला आहे. गावाकडून पैसा येणार नाही हेच वास्तव आहे. अशाही परिस्थितीत अनेक विद्यार्थी कमवा-शिका योजनेतून काम करीत परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. अगदी विद्यापीठाची फळबाग, उद्यान येथेही निंदणी, खुरपणीची कामे हे विद्यार्थी करतात; पण या वर्षीची परिस्थिती आणखीनच बिकट असल्याने शैक्षणिक शुल्काचे पैसे कोठून भरायचे, अशी मूलभूत समस्या निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क या वर्षी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावाचे स्वागत करीत व्यवस्थापन परिषदेने एकमुखाने त्याला मान्यताही दिली. कुलगुरूंची ही कृती राज्याचा विचार करता छोटी असली तरी मोठा संदेश देणारी आहे. सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता आपल्या अधिकारक्षेत्रात काय करू शकतो, काही नाही तरी खारीचा वाटा उचलू शकतो, असा सकारात्मक संदेश देणारी ही त्यांची कृती आहे. मातीशी नाळ आणि वास्तवाचे भान असेल तर असे मार्ग शोधता येतात. विद्यापीठ हे केवळ पदवी देण्याचा कारखाना नाही तर समाजाला दिशा देण्याचे केंद्र आहे आणि विद्यापीठाची खरी भूमिका हीच तर आहे. या निर्णयातून खूप वर्षांनंतर विद्यापीठाच्या खºया भूमिकेचा प्रत्यय आला. अगदी तक्षशिला, पाटलीपुत्र अशा प्राचीन विद्यापीठांच्या कामाचा धांडोळा घेतला तर ती जशी ज्ञानाची केंद्रे होती तशी सामाजिक, राजकीय चळवळीचे प्रेरणास्रोतही होते. त्याही पूर्वीच्या आश्रम व्यवस्थेत ऋषिमुनींचे आश्रम म्हणजे ध्यान-धारणा, ईश्वर पूजांचे केंद्र नव्हतेच. मुळात वेगवेगळ्या ऋषींचे आश्रम हे प्रयोगशाळाच म्हणता येतील.