आजकालचे विद्यार्थी महाविद्यालयात का जात नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 07:17 IST2025-07-05T07:16:48+5:302025-07-05T07:17:49+5:30

महाविद्यालयांमध्ये मिळणारे शिक्षण, त्यामुळे कोचिंग क्लासकडे वाढणारा ओढा आणि त्यातून निर्माण होणारी ‘डमी महाविद्यालये’ हा तिढा सोडविणे गरजेचे आहे.

Editorial articles Why don't students go to college these days? | आजकालचे विद्यार्थी महाविद्यालयात का जात नाहीत?

आजकालचे विद्यार्थी महाविद्यालयात का जात नाहीत?

बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक, लोकमत, नागपूर

भारतीय शिक्षणव्यवस्था सध्या एका संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविण्याची शर्यत ठरू लागली आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दुय्यम स्थान मिळत आहे. अपवादवगळता, महाविद्यालयांत मिळणाऱ्या दर्जाहीन शिक्षणामुळे कोचिंग क्लासेसची लोकप्रियता वाढत असून, या बाबीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेशप्रक्रिया आणि करिअरची अनिश्चितता, यामुळे पालक आणि विद्यार्थी अधिकाधिक सुरक्षित पर्याय शोधू लागले आहेत. याच गरजेतून कोचिंग क्लासेसचा प्रसार वाढत आहे. हे क्लासेस विद्यार्थी आणि पालकांची गरज बहुतांशी भागवत असल्याने प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत आहे आणि ‘डमी महाविद्यालये’ निर्माण होत आहेत.

‘डमी महाविद्यालयां’चे हे कल्चर वाढतच चालले आहे. सर्वच ठिकाणी नाही; पण बऱ्याच ठिकाणी अशा महाविद्यालयांत विद्यार्थी केवळ नावापुरते दाखल असतात. प्रत्यक्ष नोंद आहे, पण शिक्षण, वर्गखोल्या, प्रयोगशाळा दर्जेदार असेलच असे नाही. बऱ्याच ठिकाणी ते नसतेच, असा अनुभव आहे. नाते असते ते फक्त मार्कशिटपुरते!

खरे तर शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नव्हे, तर प्रेरणादाते व मार्गदर्शक असतात. पण आज शिक्षण एक व्यावसायिक मॉडेल बनले आहे. परिणामी, शिक्षण ही मूल्यनिर्मितीची प्रक्रिया राहिली नसून, ती केवळ ‘निकाल’ देणारी यंत्रणा झाली आहे. ही स्थिती केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर समाजाच्या भविष्यातील आराखड्यावरही प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

या संकटातून बाहेर पडण्यासाठी शाळा, महाविद्यालये सक्षम करणे, शिक्षकांना आधार देणे आणि विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून, त्यात पुन्हा मूल्य, संस्कार आणि ज्ञानाचा समतोल साधणे, हाच शाश्वत उपाय आहे. शिक्षणाचा खरा अर्थ गुणांपुरता मर्यादित राहू लागला आहे. शाळा, महाविद्यालये ही केवळ अभ्यासाची नव्हे, तर वैचारिक, सामाजिक आणि भावनिक विकासाची जागा असते. मात्र, डमी महाविद्यालयांमुळे कृतिशील शिक्षण, गटचर्चा, प्रयोगांना संधीच उरत नाही, हे वास्तव आहे. यामुळे प्रश्न विचारण्याची सवय, चिकित्सक विचार, या गोष्टींना विद्यार्थी मुकतात. शिवाय, चुका स्वीकारायला ते तयार होत नाहीत. अति स्पर्धा आणि सततच्या तणावामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. ही परिस्थिती रोखायची असेल तर शिक्षणव्यवस्थेने फक्त निकालांवर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यायला हवा. महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यामध्ये समतोल साधणे, ही काळाची गरज आहे.

शिक्षण ही केवळ स्पर्धेतील शर्यत नाही, तर आयुष्याला दिशा देणारी प्रक्रिया आहे. ही दिशा घडवताना शाळा, पालक, विद्यार्थी आणि शासन या सर्वांचे योगदान आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांनी आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि प्रयोगशीलतेला चालना देणारी शैक्षणिक संस्कृती निर्माण करावी. शिक्षणाचं मोजमाप फक्त गुणांवर न करता, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगभूत कौशल्यांना विकसित करणारी पद्धती स्वीकारणे, ही काळाची मागणी आहे.

पालकांनी मुलांच्या स्वभाव, आवडीनिवडी आणि कलांचा आदर करावा. फक्त गुणांच्या मागे लागून त्यांचे व्यक्तिमत्त्व दडपले गेले, तर त्यांच्या आयुष्यातील मोठ्या संधी गमावल्या जातात. शिक्षणात समतोल दृष्टिकोन ठेवणे, हे आपल्या सगळ्यांचे सामूहिक उत्तरदायित्व आहे. शंका विचारणे, प्रयोग करणे, चुका मान्य करून शिकणे आणि पुढे जाणे, हेच खरे शिक्षणाचे लक्षण आहे. शासनाने शिक्षण व्यवस्थेला स्पर्धेचे नव्हे, तर मूल्याधिष्ठित आणि समावेशक स्वरूप देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. गुणवत्तापूर्ण सार्वजनिक शिक्षण संस्था बळकट करणे गरजेचे आहे.

शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला तरच आपल्या मुलांचे भविष्य सशक्त, सर्जनशील आणि संतुलित होईल. केवळ परीक्षांकडे न पाहता शिक्षणाचा खरा हेतू, म्हणजे ज्ञान, मूल्य आणि विचार क्षमतेचा विकास केंद्रस्थानी असावा. शिक्षण संस्थांनी आत्मपरीक्षण करत नव्या वाटा शोधाव्यात आणि पालकांनीही दीर्घकालीन विकासाचा विचार करत शाळा, महाविद्यालयांवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करायला हवा.

balaji.devarjanker@lokmat.com

Web Title: Editorial articles Why don't students go to college these days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.