‘विकासा’ला आडकाठी न होता, कोणती झाडे लावावीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 07:50 IST2025-07-07T07:41:04+5:302025-07-07T07:50:15+5:30
महामार्गांच्या कडेला वृक्षारोपण करताना भविष्यकालीन विकासाचा विचारही आवश्यक आहे. अन्यथा होणारे नुकसान, वेदना कल्पनातीत असतील..

‘विकासा’ला आडकाठी न होता, कोणती झाडे लावावीत?
शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष,
आपलं पर्यावरण, नाशिक
दरवर्षी पावसाळ्यात महामार्गांच्या कडेला तसेच दुभाजकांच्या मधे सरकार, वनविभाग आणि विविध संस्थांतर्फे झाडे लावली जातात. हिरवाई वाढविणे, पर्यावरणाचे संरक्षण, जमिनीची धूप थांबविणे, पांथस्थांना सावली आणि पक्ष्यांना निवारा मिळावा, ही तर त्यामागची कारणे आहेतच, पण विकास न थांबवता कोणती झाडे कुठे लावावीत याचाही दीर्घकालीन विचार झाला तरच येणाऱ्या पिढीसाठी आणि त्या त्या भागातील पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राखण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
आज वेगवेगळ्या ठिकाणी महामार्गांचे जाळे विणले जात आहे. महामार्गांच्या बाजूने वृक्षारोपणही होत आहे. मात्र, हे करत असताना भविष्यकाळात हेच रस्ते चारपदरी, सहापदरी किंवा आठपदरी होणार आहेत, त्या अनुषंगानेच वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. जी झाडे महामार्गांच्या बाजूने लावली जाणार आहेत, त्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि दूरदृष्टी हवी. जी झाडे आपण लावणार आहोत, त्या वृक्षाच्या खोडाची वाढ व पर्णसंभाराचा विस्तार, त्याला येणारी फळे या सर्व बाबींचा विचार करून, त्या त्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे व रस्त्याला असलेल्या साइड मार्जिनप्रमाणे वृक्ष प्रजाती निवडण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी भरभर वाढणाऱ्या वृक्ष प्रजाती लावण्याचा कल जास्त असतो. जास्त वारा असल्यास अशा प्रजातींच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता असते.
काही प्रजाती उंच वाढतात. त्यांच्या फांद्या खोडापासून साधारण २० ते २५ फूट आडव्या पसरतात. उदाहरणार्थ कदंब वृक्ष किंवा जंगली बदाम. या वृक्षांची वाढ होताना खालच्या मोठमोठ्या फांद्या तसेच त्यांची मोठी फळे कालांतराने गळून पडतात. ती गाडीच्या टपावर पडल्यास चालकाचे मन विचलित होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मोठी फळधारणा व मोठ्या शेंगा असलेल्या वृक्ष प्रजाती रस्त्याच्या कडेने लावणे टाळावे.
वृक्ष लागवड करताना त्या त्या परिसरातील शेती उपयोगी पर्यावरणीय परिसंस्था कशी अबाधित राहील, या अनुषंगाने वृक्षांची निवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी रोपे तयार करून त्यानंतर त्या त्या वातावरणाशी निगडित त्या त्या भागामध्ये वृक्ष लागवड करावी. इतके हजार किंवा इतकी लाख झाडे.. अशी नुसती संख्या मनात ठेवून, घाईगर्दीने रस्त्याच्या कडेने हिरवळ निर्माण करण्यासाठी झाडे लावली जाऊ नयेत. घाईगर्दीत बऱ्याचदा चुका होतात आणि चुकीची वृक्ष लागवड केली जाते. महाराष्ट्राचा विचार करता कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र येथील वातावरण लक्षात घेऊन त्या भागातील प्रदेशनिष्ठ वृक्षांचा अभ्यास करून वृक्षारोपण करण्याची गरज आहे. त्यामुळे स्थानिक वृक्षतोडीमुळे झालेला पर्यावरणीय ऱ्हास लक्षात घेऊन तेथील परिसंस्था शाबूत ठेवण्यास मदत होईल.
वृक्ष लागवड करताना जास्तीत जास्त तीन ते चार फुटापर्यंत तिथेच रोपे लावल्यास त्यांची मुळे त्या मातीमध्ये पसरण्यास मदत होते. त्यासाठी जास्त वेळ लागत नाही व मोठ्या पिशवीतल्या रोपांपेक्षा ती जोमाने वाढतात. बऱ्याच ठिकाणी नऊ ते दहा फुटांची मोठ्या पिशवीतली रोपे लावण्याकडे कल आसतो. अशा रोपांची वाढ लवकर होत नाही. कारण, ती रोपे ज्या नर्सरीतून आणली जातात त्यांची सोटमुळे तेथील जमिनीत गेलेली असतात व ती कापून काढावी लागतात. पिशवी असलेल्या मुळाचा गुंता त्या पिशवीमध्ये झालेला असतो. त्या गुंत्यातून मुळांना सुटायला बराच कालावधी लागतो. मोठी रोपे जोराच्या वाऱ्यामुळे हलू नये यासाठी त्यांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.
साधारणपणे रस्त्यांच्या, महामार्गांच्या कडेला पिंपळ, निम, शमी, चिंच, पायर, आईन, हळदू, आसाना, अंजन, करंज, कळम, खैर, शिरीष, शिसम, कोशिंब, धावडा, मोह, तिवस, पापडा, बेहडा, महारुख, रिठा.. अशा काटक वृक्षांची गरज आहे. मात्र, त्यासाठीही त्या त्या भागातील वातावरणानुसार कोणती झाडे लावली गेली पाहिजेत याचा विचार आणि तशी कृती झाली तरच त्याचा फायदा होऊ शकेल. झाडे लावतानाच भविष्यकालीन नियोजनाचा विचारही त्यात असला पाहिजे. नाहीतर इतकी वर्षे जगलेली, जगवलेली झाडे नंतर एका झटक्यात कापून टाकताना होणारे नुकसान आणि वेदना कल्पनेपलीकडे असतील.
shekargaikwadtnc@gmail.com