साधना शंकरलेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतून निवृत्त अधिकारी
आमच्या घरी एक आठ महिन्यांचे बाळ आहे. घरात कुठेही त्याला फोन दिसला की, ते कुतूहलाने त्या फोनकडे आपला मोर्चा वळवतं. त्याला स्क्रीनपासून लांब कसं ठेवायचं, या चिंतेने बाळाचे तरुण आई-बाबा आत्तापासूनच विचारात पडले आहेत. एका बाजूला मी त्यांच्या त्याबद्दलच्या चर्चा ऐकत असते आणि दुसऱ्या बाजूला साठी ओलांडलेला माझा नवरा शांतपणे आपल्या स्मार्टफोनमध्ये डोळे खुपसून बसलेला मला दिसत असतो. आमच्या आजूबाजूच्या इतर अनेक जोडप्यांसारखे आम्हीही एकमेकांच्या सततच्या स्मार्टफोन वापरावरून भांडत असतो.
सतत स्क्रीनला डोले खिळवलेले ज्येष्ठ नागरिक हा व्यसनाधीन लोकांचा एक नवाच गट आहे. आयुष्याच्या मध्यावर आल्यानंतर डिजिटल झालेली ही पिढी. त्यापैकी अनेकजण निवृत्त आहेत किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ही पिढी आता स्मार्टफोन, गेम कन्सोल्स आणि टॅब्लेट्स वगैरे गॅजेट्स वापरायला सरावली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ लोक तरुणांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनला खिळलेले असतात. या आधीची पिढी अशीच टीव्ही बघण्यात वाकबगार होती. एका संशोधनानुसार, गेल्या दहा वर्षामध्ये साठी ओलांडलेल्या लोकांच्या रेडिओ आणि टीव्हीच्या वापराचं प्रमाण स्थिर आहे. पण सोशल मीडिया, गेमिंग आणि ऑडिओ स्ट्रीमिंगवर घालवला जाणारा वेळ मात्र वाढला आहे. त्यामुळेच ज्येष्ठांचा स्क्रीन टाइम हा पूर्वी कधी नव्हता तेवढ़ा आत्ता आहे.
हे घरात आणि रस्त्यावर दोन्हीकडे दिसणारे चित्र आहे. वयोवृद्ध फेरीवाले, वॉचमन किंवा तत्सम काम करणारे ज्येष्ठ, रिक्षाचालक, खाद्यविक्रेते असे सगळेच तरुणांइतकेच आपल्या स्मार्टफोनमध्ये गुंतलेले असतात. टेक कंपन्याही आता या नवीन ग्राहक वर्गाकडे लक्ष देत आहेत. 'अॅपल' ही जगप्रसिद्ध टेक कंपनी आता 'हिअरिंग एड' म्हणजे श्रवणयंत्र म्हणून वापरता येतील असे 'इअरफोन' तयार करते. स्मार्टवॉच तर आता एवढं स्मार्ट झालं आहे की, ते घालणारी व्यक्ती धडपडून पडली तर ते थेट अॅब्युलन्सला फोन करते.
ज्येष्ठ लोक डिजिटल झाले याचे काही फायदेही आहेत. ते जुन्या मित्रांशी, दूर असलेल्या कुटुंबीयांशी जास्त 'कनेक्टेड' राहतात हा त्यातला प्रमुख फायदा. 'झूम' किंवा इतर मीटिंग प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने त्यांना घरबसल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होता येतं. ई-कॉमर्स वेबसाइट्समुळे खरेदीसाठी घराबाहेर पडावं लागत नाही. एकटेपणा कमी होतो, पण त्यांच्या ऑनलाईन वावरामुळेच ते ऑनलाइन स्कैम्स आणि फसवणुकीला बळी पडण्याची शक्यताही वाढते. इंटरनेटवरून आर्थिक व्यवहार करणाऱ्या ज्येष्ठांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच सायबर जगात धुमाकूळ घालणारे स्कॅमस्ट्रर्स त्यांना सहज लक्ष्य करतात. डिजिटल अरेस्टसारख्या गोष्टींना बळी पडणारे बहुतेक जण ज्येष्ठ आणि निवृत लोक आहेत.
तरुणांच्या 'स्क्रीन टाइम'वर त्यांचे शिक्षक आणि पालक यांचं किमान लक्ष तरी आहे. त्यांना स्क्रीन पाहण्यापासून रोखण्यासाठी नियमही केले जातात. ऑस्ट्रेलियाने नुकतेच १६ वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घातले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी शून्य स्क्रीन टाइम आणि २ ते ५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी दिवसाला जास्तीत जास्त एक तास स्क्रीन टाइमचं बंधन घातलं आहे, पण ज्येष्ठांबाबत असं कोणतंही नियंत्रण नाही.
आजची तरुण पिढी ही स्मार्टफोनच्या अतिरेकी व्यसनामुळे 'अॅक्शियस जनरेशन' होत चालली आहे, अशी चिंता अलीकडे व्यक्त केली जाते. सरकार आणि टेक कंपन्या तरुणांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी जशा उपाययोजना करतात तशीच दखल स्क्रीनला खिळलेल्या ज्येष्ठांसाठीही घेतली जाण्याची गरज दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ज्येष्ठांचा वाढता स्क्रीन टाइम याबद्दल सतत बोलण्याची, जनजागृती करण्याची गरज आहे, जेणेकरून या नव्याने तयार झालेल्या, सतत वाढत असणाऱ्या हट्टी तरी संवेदनशील गटाकडे आणि त्या गटाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जाईल.
Web Summary : Seniors are increasingly glued to screens, exceeding youth's screen time. While digital access offers connectivity and convenience, elders face online scams. Unlike youth, no screen time regulations exist for seniors, necessitating awareness and safeguards against digital risks.
Web Summary : वरिष्ठ नागरिक तेजी से स्क्रीन से जुड़ रहे हैं, युवाओं से भी अधिक समय बिता रहे हैं। डिजिटल पहुंच से सुविधाएँ हैं, पर ऑनलाइन धोखाधड़ी का खतरा है। युवाओं की तरह, वरिष्ठों के लिए कोई नियम नहीं, जागरूकता और सुरक्षा ज़रूरी है।