उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 07:25 IST2025-09-18T07:20:30+5:302025-09-18T07:25:14+5:30
चार कोऱ्या मतपत्रिका चुकून पडलेल्या नाहीत हे नक्की. हे चार खेळाडू कोण? आज अदृश्य असलेले हे चौघे उद्याच्या कोणत्या खेळाची तयारी करत आहेत?

उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,
नवी दिल्ली
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ७६७ खासदारांनी मतदान केले, १५ मतपत्रिका बाद ठरल्या. परंतु, खरा बॉम्बगोळा पडला तो चार मतपत्रिका पूर्णपणे कोऱ्या निघाल्या तेव्हा... त्यावर एकही खूण नव्हती. रालोआचे सी. पी. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली. अपेक्षित मतांपेक्षा १५ जास्त. त्यामुळे इंडिया आघाडी विद्ध झाली. आघाडीला ३१५ मते अपेक्षित होती; मिळाली ३००. आता सगळीकडेच बोटे दाखवली जात आहेत.
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
शिवसेनेचा उबाठा गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. दोन्ही पक्षांनी आपली मते फुटल्याचा इन्कार केला आहे. पंजाबमध्ये आप गोंधळात असून, स्वाती मालीवाल यांच्यासह पाच खासदारांवर संशय घेतला जात आहे. समाजवादी पक्षाच्या एका आमदाराने बाजू बदलली, असे मानले जाते. त्याचबरोबर प्रमुख झारखंड मुक्ती मोर्चा आणि राजद यांच्यातल्याही ११ खासदारांकडे खासगीत बोट दाखवले जाते. इंडिया आघाडी उत्तरांसाठी चाचपडत असताना रालोआच्या छावणीतही अस्वस्थता पसरली.
चार कोऱ्या मतपत्रिका चुकून पडलेल्या नसून मुद्दाम काही संदेश देण्यासाठी त्या तशा ठेवल्या गेल्या. या खासदारांनी भविष्यात येणाऱ्या त्यांच्या ‘मालकांशी’ हातमिळवणी केली, असे सूचन त्यातून काढले गेले. हे रहस्य तसे बरेच गडद आहे. हे अदृश्य खेळाडू उद्याच्या कोणत्या खेळाची तयारी करत आहेत?
रालोआचे काही खासदार दगाबाजी करत असल्याच्या अफवांना समाजमाध्यमांवर पूर आला होता; तसे काही घडले मात्र नाही. त्याऐवजी या दगाबाजीने वेगळे असे सूचक वळण घेतले. कोऱ्या मतपत्रिकांमुळे दोन्ही बाजूना तर्क-कुतर्क निर्माण झाले. हे कोणी केले असेल, याचे अंदाज अजूनही बांधले जात आहेत. तुर्तास तरी कोणी कोणाचे नाव घेत नाही; परंतु दिल्लीतील सत्तावर्तुळात एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे: जे जे कोरे; ते रिकामे नसते तर त्यात बरेच काही भरलेले असते.
हसतमुख धनखड परतले; परंतु प्रश्न तसेच!
सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधीसाठी जगदीप धनखड राष्ट्रपती भवनात आले, तेव्हा त्यांचा आविर्भाव जणू काही झालेच नाही, असा होता. हसतमुखाने त्यांनी काही जणांशी गप्पा मारल्या. एकंदरीत माजी उपराष्ट्रपतींची उपस्थिती त्या कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. २१ जुलैला राज्यसभेत पूर्ण वेळ कामकाज करून धनखड यांनी संध्याकाळी राजीनामा दिला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. एरव्ही ऑगस्ट २०२७पर्यंत ते या पदावर राहिले असते. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले; परंतु राजकीय दबावाखाली त्यांनी राजीनामा दिला, असा अर्थ आजही काढला जातो. त्यानंतर ५३ दिवस ते अंतर्धान पावले होते. त्यामुळे रहस्यात भर पडली. कपिल सिब्बल यांनी तर हेबियस कॉर्पस याचिका करण्याची धमकीही दिली होती.
आता दक्षिण दिल्लीतल्या फार्म हाऊसवर ते आहेत, असे बाहेर कळल्यानंतर धनखड त्यांच्या नेहमीच्या अविर्भावात परतले. गप्पाटप्पा, चहापान सुरू झाले. ...पण या सगळ्यात एक गोष्ट गायब होती. ती म्हणजे त्यांची खास अशी बोलण्याची शैली! ‘राजीनामा का दिला?’- यावर ते काही बोलायला तयार नाहीत. ल्युटेन्स दिल्लीमध्ये व्ही ट्रिपल आय श्रेणीतला बंगला मिळण्याची ते वाट पाहात आहेत, असे सुत्रे सांगतात. हा बंगला कोणत्याही क्षणी त्यांना मिळू शकतो. आणखी बराच काळ धनखड बातम्यांमध्ये झळकत राहतील, हे मात्र नक्की!
डावे अय्यप्पाचरणी; तृणमूलचा दुर्गेला पाठिंबा
भारतीय राजकारणाला दैवी रंग प्राप्त होत आहेत. नास्तिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता भगवान अय्यप्पांची आराधना करत आहे. २० डिसेंबरला पिनारायी विजयन यांचे सरकार साबरीमालाजवळ पांबा येथे जागतिक अय्यप्पा समागम आयोजित करीत आहे. निवडणुका तोंडावर असल्याने डावे आधीच्या जखमा भरून काढून भाविकांचा अनुनय करताना दिसतात.
तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दुर्गा पूजेवर ५०० कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे. भाजपाच्या ‘जय श्रीराम’चा सामना करण्यासाठी जय मॉं दुर्गा, जय जगन्नाथ यांसारख्या घोषणा दिल्या जात आहेत. दुर्गापूजा आज ‘धर्म’ नसून आमची संस्कृती आहे, असे डावेसुद्धा आता सांगू लागले आहेत. एकुणात काय, केरळपासून कोलकातापर्यंत धर्मनिरपेक्ष पक्षही श्रद्धेच्या आश्रयाला गेलेले दिसतात.