उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?

By यदू जोशी | Updated: July 4, 2025 07:27 IST2025-07-04T07:25:35+5:302025-07-04T07:27:55+5:30

उद्धव आणि राज या दोघांच्या पक्षांची युती झाली तर ती तुटण्याची शक्यता अधिक; आणि एकमेकांमध्ये विलीन झाले तर मग वेगळे होण्याची शक्यता कमी!

Editorial articles Uddhav-Raj thackeray How will old wounds be dealt with? | उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?

उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

एक किस्सा सांगितला जातो... राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी ‘आनंद’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र भूमिका केली. ‘आनंद’ चित्रपटगृहात खूप चालतोय, असे सांगायला निर्माते राजेश खन्नाकडे गेले तेव्हा त्याने फार काही आनंद दाखवला नाही चेहऱ्यावर; शून्यात नजर लावून तो एवढेच म्हणाला, ‘लगता है, नया राजेश खन्ना आ गया है’. - महाराष्ट्राच्या राजकीय चित्रपटात सध्या उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊ पाहताहेत; त्यावरून हा किस्सा आठवला. दोन वर्षांनी अमिताभ-राजेश खन्ना पुन्हा एकत्र आले ते ‘नमक हराम’ या चित्रपटात. नंतर ते कधीही एकत्र आले नाहीत. दोघे एवढे मोठे सुपरस्टार असूनही त्यांनी दोनच सिनेमे एकत्र केले?- का? एकतर ते त्यांना मान्य नसावे किंवा दिग्दर्शक- निर्मात्यांनाही ते नको असावे. उद्धव-राज कायमचे एकत्र येणे न येणे हे केवळ त्या दोघांवर अवलंबून नाही. निर्माते-दिग्दर्शक वेगळेच आहेत. त्यामध्ये ‘महाशक्ती’ हा प्रमुख घटक आहे आणि ‘मातोश्री’ व ‘शिवतीर्था’वरील ‘स्त्रीशक्ती’ही तेवढीच महत्त्वाची आहे.

या एकत्र येण्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची, विशेषकरून मुंबई महापालिका निवडणुकीची किनार  आहे.  राजेश खन्नाच्या मनात अमिताभविषयी नेहमीच असुरक्षिततेची भावना होती, म्हणतात. हा आपले सुपरस्टारपद हिसकावेल असे त्याला वाटायचे. राज-उद्धव या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अशीच भावना असावी. गेल्या २० वर्षांत खूप लोकांनी खूप प्रयत्न करूनही जवळ आले नाहीत. दोघांमध्ये संपत्तीचा वाद नव्हता, बांधाचे भांडणही नव्हते. ‘तू मोठा, की मी मोठा’, ‘पक्षाचा ताबा तुझ्याकडे की माझ्याकडे’ हा कळीचा मुद्दा होता.  आधी नातेवाईक, मित्र आणि दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी प्रयत्न करून पाहिले, आता ती भूमिका ‘मराठी भाषा’ निभावत आहे.

अर्थात, भाषेसाठी भावनिक होऊन मेळाव्यापुरते एका व्यासपीठावर येणे आणि राजकारणासाठी कायमचे वा काही वर्षांसाठी एकमेकांसोबत राहणे खूप वेगळे. आपापले राजकारण पुढे नेण्यासाठी ठाकरे बंधूंनी मराठीचा आधार घेतला; पण आपापले राजकारण पुढे नेण्यासाठी एकमेकांचा आधार घेतील का? जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा सगळे आकाश तुमच्यासाठी मोकळे असते; पण कोणी वाटेकरी आला की मग तडजोडी अपरिहार्य असतात. अशा तडजोडी करण्याची दोघांची कितपत तयारी आहे यावर ‘भाऊबंदकी’ की ‘भाऊबंधकी’ याचा फैसला होईल. जुन्या जखमांचा हिशेब व्हावा लागेल. ‘विठ्ठलावर (बाळासाहेब ठाकरे) माझा राग नाही; पण माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे’ असे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना म्हटले होते, आता ‘मातोश्री’वरले उद्धव ठाकरे हेच ‘विठ्ठल’ मानले, तर बडवे आहेतच ना! त्यांच्याबाबत राज यांचे काय मत आहे?

एकत्र येण्याच्या वातावरणामुळे ‘ठाकरे ब्रँड’ला फायदा होत आहे, हे नक्की. पूर्वी एक वाद होता-‘युतीमध्ये मोठा भाऊ कोण?’ भाजप-शिवसेना यांच्यात त्याबाबत स्पर्धा असायची. उद्धव ठाकरे हे ६५ वर्षांचे, तर राज हे ५९ वर्षांचे आहेत. पण एकत्रितपणे पुढे गेले तर ‘मोठेपण कोणाकडे’ याचा बाँड आधीच लिहावा लागेल. त्याच्या अटी-शर्ती ठरवाव्या लागतील. राज यांची सभेतील आक्रमकता उद्धव यांना आवडेल; पण पक्षातील त्यांची आक्रमकता ते कितपत सहन करू शकतील? सोबत यायचे म्हणजे उद्धव सेना-मनसे यांनी विलीन व्हायचे, की युती करायची याचाही फैसला व्हावा लागेल. युती झाली तर ती तुटण्याची शक्यता अधिक; आणि एकमेकांमध्ये विलीन झाले तर मग पुन्हा वेगळे होण्याची शक्यता कमी!  विलीनीकरणातून शिवसैनिक, मनसैनिक आणि तमाम मराठी माणसांच्या मनात एक भरवसा तयार होईल; पण युती करून लढले तर लोकांना तेवढा भरवसा वाटणार नाही. ‘एकाच घरात राहणे’ आणि ‘वेगवेगळ्या घरात राहून एकच असल्याचे सांगणे’ यात फरक असतोच. घर एक आणि चूलही एक असली तर लोकांना पटते की घरात एकी नांदते आहे.

एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा चालू असताना दोन्ही पक्षांचे मावळे मात्र मोठ्या संख्येने भाजप आणि शिंदेसेनेत जात आहेत. दुसरीकडे भाजप आपली चाल चालत आहे. ‘मराठी सक्तीची आहेच, पण हिंदीचा आणि सगळ्याच भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला मानणारा मराठी मतदार आपल्याच सोबत राहील याची भाजपला खात्री आहे. मात्र, त्याचवेळी हिंदी आणि इतर भाषकांवरील आपला प्रभाव अधिक घट्ट करण्याची संधी म्हणून भाजप सध्याच्या घटनाक्रमाकडे पाहत आहे. 

महापालिकेत भाजपची सत्ता तर आणायची पण भाजप हा अमराठी भाषकांचा पक्ष आहे हा ठप्पादेखील बसू द्यायचा नाही याचे जाणीवपूर्वक प्रयत्न भाजप करत राहील. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि पक्षात रवींद्र अशा नवीन समीकरणाचे नवे रंग बघायला मिळतील.

                yadu.joshi@lokmat.com

Web Title: Editorial articles Uddhav-Raj thackeray How will old wounds be dealt with?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.