युद्धाचा भडका आता वाढला आहे. स्वतःला ‘शांततादूत’ मानणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला युद्धाचे चटके द्यायला सुरुवात केली आहे. अमेरिका ठरवते ती लोकशाही आणि अमेरिकेला वाटते तो दहशतवाद, याच न्यायाने अमेरिकेची फौजदारकी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ‘हे युद्ध मी थांबवले, ते युद्ध थांबवले’, म्हणून शांततेचे नोबेल हिसकावून घेऊ इच्छिणाऱ्या ट्रम्प यांनी जगाला युद्धभूमी करून टाकले आहे. त्यांच्या जोडीला तेवढेच युद्धखोर असलेले बेंजामिन नेतन्याहू आहेत. या जोडीने खामेनेईंचा खात्मा केला, असे मान्य केले, तरी त्यामुळे युद्ध संपणार नाही. खामेनेई हेही ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्याच जातकुळीचे. इराणच्या अणू कार्यक्रमावरून चर्चा फिस्कटल्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर आक्रमण केले. या आक्रमणात त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या अधिकृत कार्यालयावर हल्ले केले. अमेरिकेचे खरे लक्ष्य खामेनेईच होते. त्यांना सत्तेवरून हटवून ‘लोकशाही’ सरकार आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. १९८९ पासून इराणच्या राजकारणावर आणि धार्मिक नेतृत्वावर प्रभावी नियंत्रण ठेवणाऱ्या खामेनेई यांनी इस्लामिक रिपब्लिकची दिशा ठरवली, रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या बळावर अंतर्गत विरोध दाबला आणि परराष्ट्र धोरणात अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी भूमिका ठाम ठेवली. त्यांच्या नेतृत्वाखाली इराणने आपला अणू कार्यक्रम पुढे नेला. लेबनॉन, सीरिया, इराक, येमेन या पट्ट्यात प्रभाव वाढवला. खामेनेई अमेरिकेला ‘इराणचा क्रमांक एकचा शत्रू’ असे म्हणत. ‘त्यानंतर इस्रायलचा क्रमांक लागतो’, असेही ते वारंवार म्हणत आले. इराण कधीही अण्वस्त्र तयार करणार नाही आणि त्यांचा आण्विक कार्यक्रम केवळ नागरी उद्देशांसाठी आहे, असे खामेनेई सातत्याने सांगत. खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातमीचा संबंध थेट इस्रायली कारवाईशी जोडला गेला, तर त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. इस्रायलसाठी हा धोरणात्मक विजय मानला जाऊ शकतो.
इराणमध्ये सर्वोच्च नेता हा केवळ राजकीय पदाधिकारी नसतो; तो ‘विलायत-ए-फकीह’ या तत्त्वाचा प्रतीक असतो. त्यामुळे मृत्यूची बातमी इराणी समाजात संतापाची लाट निर्माण करू शकते, ज्याचा परिणाम थेट इस्रायलविरोधी प्रतिहल्ल्यांत, क्षेपणास्त्र वर्षावात किंवा प्रादेशिक सहयोगी गटांच्या सक्रियतेत दिसू शकतो. हिझबुल्ला, हमास किंवा इराणसमर्थक मिलिशिया यांची हालचाल वाढल्यास हा संघर्ष मर्यादित न राहता व्यापक युद्धात परिवर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या मते, इराण अण्वस्त्रसज्ज झाला, तर जागतिक समुदाय धोक्यात येईल. त्यांच्या या भूमिकेला काही पाश्चात्त्य देशांचेही समर्थन आहे. अनेकांचा विरोध आहे. शीतयुद्धानंतरचे जग बहुध्रुवीय झाले आहे. मात्र, अमेरिकेला ते आपल्या ताब्यात घ्यायचे आहे. तंत्रज्ञान, सायबरयुद्ध, ड्रोन आणि प्रॉक्सी लढाया यामुळे युद्धाचे स्वरूप आता बदलले आहे. अशा वेळी एका सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूने संघर्ष अधिकच अनिश्चिततेकडे गेला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या या ‘पोस्टट्रूथ’ युगात अफवा, खोटे दावे आणि प्रचारयुद्ध हे सारेच असते. त्यामुळे कोणतीही बातमी स्वीकारताना सावधगिरी आवश्यक आहे. पण, मुद्दा तेवढाच नाही. खामेनेई हुकूमशहा होतेच. मात्र, लोकशाहीच्या बाता ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी माराव्यात, यासारखा मोठा विनोद नाही. तेल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील मालकीसाठी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला असेलही, पण अमेरिकेसोबत रशिया वा चीन नाही. युरोपही नाही. त्यामुळे जग विभागले गेले आहे. दोन्ही बाजूंकडे तेवढेच सामर्थ्य आहे. ही स्थिती वाटते तेवढी सोपी नाही.
अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सहभागामुळे प्रादेशिक युद्धाचे जागतिकीकरण झाले. थेट युद्ध पेटले, तर पर्शियन आखातातील तेलवाहतूक धोक्यात येईल, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढेल आणि जागतिक तेलदर उसळी घेईल. त्याचा परिणाम भारतासारख्या देशांवर थेट होईल. रुपयाचे अवमूल्यन, महागाईचा दबाव आणि शेअरबाजारातील अस्थिरता हे त्याचे आर्थिक परिणाम असू शकतात. हा तणाव तीव्र झाल्यास जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरच मोठा परिणाम होईल. हिंसेला प्रत्युत्तर हिंसेने दिले, तर संघर्षाची साखळी लांबत जाते. मध्यपूर्वेने अनेक दशके युद्ध, प्रतिहल्ले, निर्बंध आणि अस्थिरता अनुभवली आहे. सामान्य नागरिक सतत भय, महागाई आणि अनिश्चिततेत जगत आहेत. युद्धाच्या ज्वाळांमध्ये राजकीय गणिते बदलतात; परंतु शेवटी प्रश्न एकच उरतो, या संघर्षातून मानवी समुदायाला काय मिळाले? उत्तर केवळ विध्वंस हेच असेल, तर इतिहास पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती करेल !
Web Summary : Escalating conflict in the Middle East threatens global stability. The potential death of Iran's leader could trigger widespread retaliation, impacting oil supplies and economies. The world faces a complex, multi-polar situation with potentially devastating consequences.
Web Summary : मध्य पूर्व में बढ़ता संघर्ष वैश्विक स्थिरता के लिए खतरा है। ईरान के नेता की संभावित मृत्यु व्यापक जवाबी कार्रवाई को ट्रिगर कर सकती है, जिससे तेल आपूर्ति और अर्थव्यवस्थाएं प्रभावित होंगी। दुनिया एक जटिल, बहुध्रुवीय स्थिति का सामना कर रही है जिसके संभावित विनाशकारी परिणाम हो सकते हैं।