खंत की हतबलता
By Admin | Updated: November 3, 2015 03:41 IST2015-11-03T03:41:14+5:302015-11-03T03:41:14+5:30
राज्यात जेव्हां केव्हां सत्ताबदल होतो आणि कालचे सत्ताधीश आजचे विरोधक बनतात तेव्हां आम्ही विरोधात असल्याने नोकरशहा आमचे ऐकत नाहीत, आमची

खंत की हतबलता
राज्यात जेव्हां केव्हां सत्ताबदल होतो आणि कालचे सत्ताधीश आजचे विरोधक बनतात तेव्हां आम्ही विरोधात असल्याने नोकरशहा आमचे ऐकत नाहीत, आमची कामे अडवून ठेवतात, अशी तक्रार आजच्या विरोधी पक्षातले आमदार करीत असतात. परंतु आज तीच आणि तशीच तक्रार सत्ताधारी पक्षातला कोणी आमदार वा मंत्री नव्हे तर राज्याचा प्रमुख असलेला मुख्यमंत्रीच करीत असेल तर एक तर ती खंत समजली जाते वा हतबलता. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस स्वत:च जर असे म्हणत असतील की राज्याची नोकरशाही नव्या सरकारला सहकार्य करीत नाही, तर मग नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकत असले पाहिजे. अशी तक्रार आजवर त्यांच्या एकाही पूर्वसुरीने केल्याचे उदाहरण नमूद नाही. वास्तविक पाहता मंत्री परिषद आणि नोकरशाही एकाच रथाची दोन चाके असल्याचे रास्तपणे म्हटले जाते. साहजिकच रथाच्या विनाअडथळा मार्गक्रमणासाठी या दोन्ही चाकांनी परस्परात योग्य समतोल आणि समन्वय राखणे गरजेचे असते. नोकरशाही जात्याच नाठाळ असते आणि तिच्यात नकारात्मकता ओतप्रोत भरलेली असते. ती एक तर अभ्यासाने सरळ होते वा जरबेने. फडणवीस यांची ख्याती एक अभ्यासू आमदार अशी सांगितली जाते. त्यांच्या सरकारला अधूनमधून हलकेसे धक्के देण्याचे काम सत्तेतील भागीदार शिवसेना करीत असली तरी आपल्या सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्रीच वारंवार सांगत असतात आणि दिल्लीचा व विशेषत: पंतप्रधानांचा त्यांच्यावर वरदहस्त आहे. ही सारी स्थिती त्यांच्या आवाजत जरब निर्माण होण्यास अत्यंत पोषक अशीच आहे. असे असताना आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या नोकरशाहीला त्या सरकारच्या पद्धतीने काम करण्याची सवय लागल्याने नव्या सरकारची पद्धत स्वीकारण्याबाबत ती असहकार्य करते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे जनतेत वेगळाच संदेश घेऊन जाण्यास कारणीभूत ठरु शकते. यात एक शक्यता संभवते. युतीच्या याआधीच्या राजवटीतील मंत्री आणि विशेषत: सेनेचे मंत्री अधिकाऱ्यांना जी अवमानकारक वागणूक देत असत त्या वागणुकीच्या स्मृती पुसल्या गेल्या नसाव्यात. परिणामी नोकरशहांमध्ये फडणवीस सरकारबाबतही किंतु असणे संभवते. तरीही लोकानी तुमच्या हाती त्यांचे भवितव्य सोपविल्यानंतर ज्यावर मांड ठोकायची तो घोडा नाठाळ आहे अशी तक्रार करण्यात हशील नाही. नाठाळाला वठणीवर आणून त्यावर घट्ट मांड ठोकणे भागच आहे.