ओढवून घेतलेले दुखणे; राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास केंद्र वा राज्य सरकार नव्हे, तर फक्त आपणच जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 03:50 AM2021-03-19T03:50:27+5:302021-03-19T06:41:24+5:30

अग्रलेख : ओढवून घेतलेले दुखणे; राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास केंद्र वा राज्य सरकार नव्हे, तर फक्त आपणच जबाबदार!

Dragging pain; Only We are responsible for the increase the number of corona patients in the state, not central or state government | ओढवून घेतलेले दुखणे; राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास केंद्र वा राज्य सरकार नव्हे, तर फक्त आपणच जबाबदार!

ओढवून घेतलेले दुखणे; राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास केंद्र वा राज्य सरकार नव्हे, तर फक्त आपणच जबाबदार!

Next

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे मरणाऱ्यांच्या संख्येतही वेगाने भर पडत चालली आहे. मुख्य म्हणजे देशभर कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी कमी होत चालले असताना, आपल्या राज्यात त्यात वेगाने वाढ होत आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचा इशारा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे; पण रुग्णसंख्या वाढत असूनही आपण सावध झालेलो नाही. बेदरकारी व बेपर्वाई जणू आपल्या नसानसांत भिनली आहे.  कोरोनाची ही दुसरी लाट आपल्या बेपर्वाईमुळेच आली आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढण्यास केंद्र वा राज्य सरकार नव्हे, तर फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आणि कारणीभूत आहोत. स्थानिक यंत्रणा नीट काम करीत नाहीत, असे केंद्रीय आरोग्य पथकाने म्हटले आहे. त्यात तथ्य असेलही; पण आपण तरी कुठे सावधगिरी बाळगत आहोत? (Dragging pain; Only We are responsible for the increase the number of corona patients in the state, not central or state government)

रुग्णसंख्या मध्यंतरी कमी होताच अनेकांनी मास्क वापरणे बंद केले, वाटेल त्या वेळी वाटेल तशा गर्दीत फिरायला सुरुवात केली. जणू त्या गर्दीत कोरोनाच चेंगरून मरेल, असे आपल्याला वाटत असावे. शिवाय रात्रीच्या पार्ट्या सुरू केल्या, शारीरिक अंतर ठेवणे पूर्णपणे बंद केले. ज्यांना फिरण्याची गरज नाही, अशी मंडळी सार्वजनिक वाहनांतून प्रवास करू लागली. वयस्कांनी आणि लहान मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे, या सूचना केंद्र व राज्य सरकार देत होते; पण त्या धाब्यावर बसवल्या गेल्या. किती काळ घरात बसून राहणार, या म्हणण्यात तथ्य असले तरी जीवघेण्या आजारापेक्षा घरात राहणे श्रेयस्कर हा विचारही केला गेला नाही. देशामध्ये बुधवारी जे २८ हजार रुग्ण आढळले, त्यापैकी २३ हजारांहून अधिक महाराष्ट्रातील होते. गुरुवारी देशातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३६ हजारांच्या घरात गेला. त्यात एकट्या महाराष्ट्रातील रुग्ण आहेत ३० हजारांच्या आसपास. म्हणजे रुग्णांतील ६० टक्के आपल्या राज्यातील. हे चित्र केवळ चिंताजनकच नव्हे, तर भयावहही आहे. आपणच ओढवून घेतलेले हे दुखणे आहे.

आता लसीकरण सुरू झाले आहे. सव्वातीन कोटींहून अधिक लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. या लसीकरणाचा वेग जसजसा वाढत जाईल, तसतसे संसर्गाचे प्रमाण घटेल आणि रुग्णसंख्या कमी होत जाईल, अशी सर्वांची अपेक्षा व अटकळ होती. प्रत्यक्षात मात्र उलटेच घडताना दिसत आहे. राज्यातील मुंबई-ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव अशी अनेक शहरे व जिल्हे पुन्हा कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्या ठिकाणची बंद करण्यात आलेली कोविड उपचार केंद्रे पुन्हा सुरू करावी लागत आहेत. एवढेच नव्हे, तर काही शहरांत अंशत: टाळेबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही मंडया, बाजारपेठा, दुकाने येथे गर्दी सुरू आहे आणि लोक मास्क न घालता, अंतर न ठेवता फिरताना दिसत आहेत. गेल्या वर्षी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात जशी स्थिती निर्माण झाली होती, तशी आपण यंदा स्वत:च निर्माण करू पाहत आहोत; पण यापुढे रेल्वे, बस, विमानसेवा बंद करता येणार नाही. उद्योगधंदे बंद झाल्यास लोकांचा रोजगार बंद होईल. त्यामुळे सर्व व्यवहार सुरू ठेवताना कोरोना वाढणार नाही, याचीही काळजी हवीच!  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुन्हा टाळेबंदी हा उपाय नव्हे, तसे केल्यास अर्थचक्र कोलमडून पडू शकते, त्यामुळे अन्य शक्य त्या सर्व मार्गांनी कोरोनाची दुसरी लाट रोखा, असे आवाहन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. अर्थात ते वा मुख्यमंत्री याहून वेगळे काय सांगणार? सरकार म्हणून करायच्या उपाययोजना सुरू आहेत.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीचे उत्पादन हाफकिनमध्ये करण्याची परवानगी द्या, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली. त्याबाबत काय तो निर्णय होईलच. रुग्ण वाढू नयेत आणि वाढले तर काय करायचे, त्याची तयारी राज्य सरकारने ठेवल्याचे दिसते; पण ही स्थिती उद‌्भवू नये, यासाठी दक्षता घेतली का, हा प्रश्न आपण स्वत:लाच विचारल्यास त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. गेल्या वर्षी टाळेबंदी लागल्यानंतर सर्वांचेच किती हाल झाले होते, हे लक्षात आहे ना? कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकांना आजतागायत रोजगार मिळालेला नाही. आपल्याला अन्नधान्य, भाज्या, फळे मिळतानाही अडचण येत होती. रस्त्यांवरून चालताना मध्येच पोलीस अडवायचे, रात्रीपासून पहाटेपर्यंत फिरायलाही बंदी होती. आपण हे सारे मान्य केले. कारण कोरोनाची मनात प्रचंड भीती होती. हा आजार आजही जगभर धुमाकूळ घालतो आहे. अशा वेळी कोरोनाविषयक नियम न पाळणे म्हणजे आजाराचे पायघड्या घालून स्वागत करण्यासारखे आहे. कृपा करून कोरोनाच्या हाती कोलीत द्यायला नको.
 

Web Title: Dragging pain; Only We are responsible for the increase the number of corona patients in the state, not central or state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.