डॉ. प्रवीण तोगडीयाकृत ‘गुजरात मॉडेल’चे वस्त्रहरण
By Admin | Updated: September 16, 2015 02:30 IST2015-09-16T02:30:48+5:302015-09-16T02:30:48+5:30
‘आज गुजरात राज्यात १६.५ लाख सुशिक्षित बेरोजगार आहेत. सरकारच्या वर्ग एक श्रेणीतील ३५० जागांकरिता आठ लाख तर तलाठ्याच्या पंधराशे जागांसाठी सात लाख अर्ज येतात.

डॉ. प्रवीण तोगडीयाकृत ‘गुजरात मॉडेल’चे वस्त्रहरण
- डॉ. हरि देसाई
(माजी संपादक, इंडियन एक्स्प्रेस)
‘आज गुजरात राज्यात १६.५ लाख सुशिक्षित बेरोजगार आहेत. सरकारच्या वर्ग एक श्रेणीतील ३५० जागांकरिता आठ लाख तर तलाठ्याच्या पंधराशे जागांसाठी सात लाख अर्ज येतात. नोकरीच्या शोधात असलेल्या देशभरातील ५५ कोटी युवकांपैकी केवळ आठ टक्क्यांनाच सरकार नोकरी देऊ शकते. दहा-दहा वर्र्षे सरकारमधील रिक्त पदे भरली जात नाहीत, पण त्यावर कोणत्याच सरकारकडे ठोस उपाय नाही. शिक्षणाच्या क्षेत्रातही पूर्ण अंधार आहे. गुजरातेत गेल्या दहा वर्षात ३० खासगी विद्यापीठे सुरू झाली, पण तिथे प्रवेश मिळवायचा असेल तर ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागते. मोफत शिक्षण आता केवळ स्वप्न बनून उरले आहे. मी स्वत: मोफत शिक्षण घेऊन डॉक्टर बनलो. आज तीस ते चाळीस लाख रुपये खर्च केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याचा हुशार मुलगा किंवा मुलगी डॉक्टर होऊ शकत नाही. याला का विकास म्हणायचा? अहमदाबाद शहराच्या ७० लाख लोकसंख्येपैकी सात लाख लोक आज झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. यावर्षी १०.८ लाख मुलांनी दहावीची परीक्षा दिली. ते २००५ मध्ये पहिल्या इयत्तेत होते. तेव्हा १७ लाख मुलांनी पहिलीत प्रवेश घेतला होता. त्यातले दहावीपर्यंत पोहचता पोहचता सात लाख गळून गेले. अनेक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत, अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ केवळ पंधरा-वीस टक्के भाग्यवान लोकांसाठीच जर गुजरातचे कथित यशस्वी मॉडेल असेल तर लोकांमध्ये असंतोषाचा भडका उडणारच’.
हे सारे विवेचन कोणत्याही काँग्रेस नेत्याचे वा मोदी विरोधकाचे नाही. तर ते केले आहे, विश्व हिन्दु परिषदेचे आंतरराष्ट्रीय नेते डॉ. प्रवीण तोगडीया यांनी. विहिंपच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना त्यांनी केन्द्र आणि राज्य सरकारचे वाभाडे तर काढलेच, शिवाय सध्या त्या राज्यात आरक्षणासाठी पाटीदार समाजाने सुरु केलेल्या आंदोलनाचे पूर्ण समर्थनदेखील केले. त्यांनी तसे का करावे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
स्वत: डॉ. तोगडिया गुजरातेतल्याच सौराष्ट्रातील पाटीदार समाजाचे एक नेते आणि विख्यात कर्करोग तज्ज्ञ. पण नंतर वैद्यकीय व्यवसाय सोडून त्यांनी पूर्णवेळ रा.स्व. संघाचे काम आपलेसे केले. कधीकाळी डॉ. तोगडिया स्वत:ला मोदींचे प्रतिस्पर्धी मानीत व म्हणून पंतप्रधान पदाची अभिलाषा बाळगून होते. परंतु मोदींचा रथ पुढे निघून गेला आणि तोगडिया मागेच राहिले. तरीही विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने त्यांचा असलेला प्रभाव काही कमी नाही. कोणे एकेकाळी मोदी आणि तोगडिया एकत्रितपणे मंत्रणाही करीत असत, पण दोहोंमध्ये विसंवाद निर्माण झाला आणि विहिंपमधील वरिष्ठांनी तोगडियांना गुजरातेतून बाहेर काढून राष्ट्रीय स्तरावरती नेले.
विश्व हिंदू परिषदेच्या वरील समारंभात डॉ. तोगडिया यांनी पाटीदार आंदोलनाचे उघड समर्थन तर केलेच, पण सरकारी आकडेवारीचाच आधार घेऊन सरकारच्या अपयशाचा पाढाही वाचला. ७० ते ८० च्या दशकात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुमारे ३५ टक्क्यांची भागीदार असलेला भारत तेव्हा खूप बलशाली मानला जात होता, परंतु आज समृद्ध राष्ट्रांच्या नामावलीत अमेरिका, ब्रिटन, जपान आदी देशांचे नावे घेतली जातात, भारत मात्र खूपच मागे पडला आहे, अशी टीका त्यांनी केली. भूकबळी ही नित्याची बाब बनली आहे, लोकांच्या अपेक्षा उंचावत चालल्या आहेत पण त्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे, गेली सात-आठ वर्षे गुजरातच्या ज्या विकास मॉडेलची चर्चा केली जाते ते मॉडेल हिंदुत्वाच्या भूमिकेला विराम देणारे आहे, अशी विविध निरीक्षणे जरी डॉ. तोगडिया यांनी नोंदविली तरी त्यांच्या भाषणात केंद्रस्थानी होता तो केवळ गुजरात. तरीही त्यांचा कोणाचाही स्पष्ट नामोल्लेख केला नाही व आपला रोख कोणत्याही एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या दिशेने नाही, असा खुलासाही केला. धर्म आणि संस्कृती यांना बाजूला सारून आपलेसे केलेल्या विकासाच्या तथाकथित मॉडेलमुळे केवळ सांस्कृतिक त्सुनामीच येऊ शकते आणि भारत आता त्या दिशेनेच वाटचाल करीत असल्याने हिंदुत्त्वाच्या जोडीने विकास असा आग्रह त्यांनी मांडला.
अलीकडेच राजधानीत पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या समविचारी संघटनांच्या अधिवेशनात सरसंघचालक मोहनराव भागवत पूर्ण वेळ उपस्थित होते. तिथे तोगडियाही अपेक्षित होते, पण ते तिकडे फिरकलेच नाहीत. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या मातृभूत येऊन व सरकारचीच आकडेवारी घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारचे बौद्धिक घेणे मोठे अजब होते व गुजरात आणि देशात जे असंतोषाचे वातावरण पसरले आहे, त्याला उचित ठरविणे हा त्यांचा हेतू स्पष्टपणे जाणवत होता. हिंदू धर्मातील सर्व जाती आणि उपजातींचे गोत्र एकच आहे असे सांगून सर्व हिंदूना एकत्र आणण्याची गोष्ट तोगडिया एरवी करीत असले तरी पाटीदार आंदोलनामुळे हिंदू धर्मातीलच विविध जाती जमातींमध्ये एक दुभंग निर्माण झाला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील मागासलेल्या जाती-जमाती, दलित आणि आदिवासी यांना एकत्र आणले आहे. सर्व प्रकारचे आरक्षण बंद करण्याच्या किंवा केवळ आर्थिक निकषावर आरक्षण सुरू करण्याच्या भूमिकेच्या विरोधात हे तिन्ही गट ठामपणे उभे राहण्याच्या पवित्र्यात आहेत. या सर्वांना जर पुन्हा एकत्र आणायचे झाले तर संघ परिवाराला अपार कष्ट उपसावे लागणार आहेत. याचा अर्थ समस्त हिंदूंचे एकीकरण संघाला जर गुजरातेत जमले नाही, तर ते ग्रहण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा लागू शकते.
केन्द्रावर आगपाखड करताना डॉ.तोगडिया यावेळी म्हणाले की, शेतीवर अवलंबून असलेल्या देशातील ७० टक्क्यांहून अधिक जनतेच्या दुर्दशेला सरकारी धोरणेच कारणीभूत आहेत. देशात रोज किमान ५० शेतकरी आत्महत्त्या करतात, २५०० शेतकरी स्थलांतर करतात, ९८ लाख हेक्टर्स शेतजमीनीपैकी केवळ निम्म्या जमिनीसाठीच सिंचन व्यवस्था उपलब्ध आहे आणि पंजाबसारख्या राज्यात ९० टक्के सिंचन सुविधा उपलब्ध असताना गुजरातेत ५० टक्क्यांपेक्षा ती अधिक का नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. केंद्र सरकार चौपदरी रस्त्यांसाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवते. तेच सरकार ७० कोटी शेतकऱ्यांना केवळ पाच हजार कोटी रुपये देण्यासाठी सुद्धा खळखळ का करते असा रोकडा सवालही तोगडिया यांनी बिनदिक्कतपणे यावेळी उपस्थित केला.
गुजरातच्या तथाकथित यशस्वी मॉडेलच्या चिंधड्या सत्ताधारी संघ परिवारातीलच एका संघटनेचा प्रमुख जर जाहीरपणे उडवित असेल तर गुजरात मॉडेलविषयीचे दावे किती पोकळ आहेत, ते वेगळे समजून सांगण्याची आता गरज नाही. त्यांनी ज्या पद्धतीने गुजरातेत येऊन गुजरात मॉडेलची पीसे काढली ती पहाता परिवार आणि भाजपा यांच्यात चिंतेचे वातावरण पसरणेदेखील स्वाभाविकच आहे.