- राजेश शेगोकारवृत्तसंपादक लोकमत, नागपूर
ज्यांना स्वतःची लिपी नाही, अशा बोली भाषिक आदिवासी भागात प्रमाण मराठी भाषेचा संसार सोपा नाही. राज्यातील काही भागांत शाळा आहेत; पण शाळेची मराठी मुलांना कळतही नाही अन् झेपतही नाही, हे वास्तव आहे. मराठीतून संवादाचे, भाषेचेच दार बंद झाल्याने ज्ञानाची कवाडे कशी उघडायची?
भाषेच्या अडचणीचा हा मोठा डोंगर पार करण्यासाठी काही प्रयोगशील शिक्षकांनी बोली भाषेच्या काठीचा आधार घेऊन मुलांनाच नव्हे, तर आदिवासी ग्रामस्थांनाही मराठीची गोडी लावली आहे.
गडचिरोली कोरची तालुक्यातील मोहगावातील विद्यार्थ्यांची मातृभाषा छत्तीसगडी. मराठी शाळा. शिक्षकही मराठीच. त्यामुळे छत्तीसगडीमध्ये मुलांना शिकवणे कठीण जायचे, या शाळेत फिरोज फुलकवर रुजू झाले. लहानपण छत्तीसगडी कुटुंबांसोबत गेल्याने त्यांचे या भाषेवर प्रभुत्व. विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी ते एकेक विषय मराठीतून छत्तीसगडीमध्ये भाषांतर करून शिकवू लागले, पण परीक्षेतला पेपर मराठीतच सोडवावा लागणार ! म्हणून मग पुन्हा छत्तीसगडीमधून मराठी भाषांतर करून त्यांनी मुलांना मराठीच्या मार्गावर आणले अन् शिक्षणाची गाडी मराठीचा झेंडा मिरवित पळाली.
गोंदिया जिल्ह्यातील रेहळी हे गाव. मुलांना मराठी येत नाही आणि शिक्षकांना छत्तीसगडी येत नाही. त्यामुळे शाळेकडे अनेक मुलांनी पाठ फिरविली होती. मंगलमूर्ती सयाम या शिक्षकाने छत्तीसगडीतून शिक्षण देत मुलांची गाडी हळूहळू मराठीकडे यशस्वीपणे वलवली आहे. गडचिरोलीतीलच अतिदुर्गम मोहगाव येथे ग्रामसभेच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षापासून गोंडी भाषिक पहिली आदिवासी निवासी शाळा चालविली जाते आहे. चौथीपर्यतच्या या शाळेला प्राथमिक शिक्षण विभाग व राज्य शासनाची मान्यता नाही, त्यामुळे १ लाखाचा दंड शिक्षण समितीवर ठोठावला आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामसभा शिक्षण समितीने न्यायालयात धाव घेतली आहे, पण शाळा सुरूच आहे. येथे गोंडीसह हिंदी, इंग्रजी आणि मराठीचीही गोडी मुलांना लागली आहे.
कोरकू भाषिक आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख देण्याची धडपड करणारे शिक्षक तुलसीदास खिरोडकर, 'आगरी शाला' चालवणारा सर्वेश तरे अशी कितीतरी उदाहरणे! सर्वत्र असे लहान मोठे नंदादीप मराठी भाषेसाठीच उजळत आहेत. प्रतिकूल हवेतही तग धरून आहेत. मराठीच कळत नाही तिथे बोलीचा आधार घेत भाषेची गोडी लावण्याचा हा 'संवाद' यशस्वी झाला आहे. यामागे अंतिमतः मराठी कळली पाहिजे अन् पुढे जगली पाहिजे हाच हेतू आहे हे नाकारून कसे चालेल?