‘एव्हरेस्ट’वर एकटे जाऊ नका, पैसे जास्त मोजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 06:09 IST2025-02-18T06:09:11+5:302025-02-18T06:09:34+5:30

नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढाईसाठी शुल्कात वाढ केली आहे, शिवाय अष्टहजारी शिखरांवर ‘सोलो’ चढाईला बंदी घातली आहे, त्यानिमित्ताने...

Don't go to Everest alone, pay more! | ‘एव्हरेस्ट’वर एकटे जाऊ नका, पैसे जास्त मोजा!

‘एव्हरेस्ट’वर एकटे जाऊ नका, पैसे जास्त मोजा!

संस्थापक, गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग

जगातील प्रत्येक गिर्यारोहकाला एकदा तरी आपण एव्हरेस्ट सर करावं, असं वाटत असतं. त्यामुळेच नेपाळबद्दल त्याला वाटणारी ओढ काही वेगळीच असते. नेपाळ सरकारने नुकतेच घेतलेले दोन निर्णय गिर्यारोहण या क्रीडा प्रकाराच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचा विचार करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत.

गेल्या काही वर्षांत ‘एव्हरेस्ट समीट’ला एक वेगळंच ‘ग्लॅमर’ आलं आहे. गिर्यारोहणाचा सीझन जवळ येतो तशी जगभरातील गिर्यारोहकांची पावलं नेपाळच्या दिशेने वळतात. नेपाळच्या अर्थव्यवस्थेत गिर्यारोहण आणि पर्यटन या दोन क्षेत्रांचं योगदान मोठं आहे. काही वर्षांपूर्वी एव्हरेस्ट समीट पूर्ण करण्यासाठी गिर्यारोहकांची रांग लागलेला एक फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. त्यादरम्यान एव्हरेस्टच्या वाटेवर होणारे अपघात हाही चिंतेचा विषय होता. नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढाईसाठी नावनोंदणी करण्यासाठीच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अकरा हजार अमेरिकन डॉलर्सवरून हे शुल्क पंधरा हजार अमेरिकन डॉलर्स एवढं करण्यात आलं आहे. हे वाढीव शुल्क सप्टेंबरपासून आकारलं जाईल, असा  अंदाज आहे; मात्र शुल्क वाढवल्यामुळे एव्हरेस्ट मोहिमा करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम होईल असं नाही. गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नेपाळ सरकारने अष्टहजारी शिखरांवर ‘सोलो’, अर्थात एकट्याने चढाई करण्यावर नेपाळने बंदी घातली आहे. एखादा गिर्यारोहक एव्हरेस्टवर चढाई करतो तेव्हा त्याला अनेकजण सहकार्य करत असतात. कुणी त्याचं सामान वाहत असतं. कुणी त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेत असतं. कुणी त्याच्या सुरक्षेची काळजी वाहत असतं. त्यामुळे त्या एकट्याचं पाऊल एव्हरेस्टवर पडतं तेव्हा ते त्याला सहकार्य करत असलेल्या प्रत्येकाचं यश आहे, असं आम्ही मानतो.

गिरिप्रेमीचा संघ कांचनजुंगा मोहिमेवर असतानाचा एक प्रसंग मला आठवतो. चिली या देशाचा एक नागरिक सोलो चढाई करण्यासाठी आला होता. या गिर्यारोहकाचा संकल्प काहीसा अतिरेकी होता. ऑक्सिजनशिवाय एकट्याने चढाई करण्याचा त्याचा मानस होता. बर्फाच्छादित शिखरांच्या माथ्यावर सूर्य येतो तेव्हा तिथली परिस्थिती भयंकर असते. गिर्यारोहकांच्या  तंबूत प्रचंड उकडतं. तशा परिस्थितीत शरीराचं तापमान योग्य राखणं हे आव्हानात्मकच असतं.

कॅम्प टू मुक्कामावर तो चिलीचा गिर्यारोहक आमच्याबरोबर होता. सोलो समीट असल्यामुळे साहजिकच त्याला कुणाची मदत नव्हती. तशात त्याची स्लीपिंग बॅग उडाली. आमच्यापैकी काहींनी आलटून-पालटून स्वतःच्या स्लीपिंग बॅग देऊन त्याला मदत केली. दुर्दैव म्हणजे पुढे समीटच्या मार्गावर त्याचा मृत्यू झाला. त्याचा जीपीएस ट्रॅकर हलत नाही म्हणून ही गोष्ट लक्षात तरी आली. एरवी अशा सोलो चढाई करणाऱ्यांचं वाटेत काही बरं-वाईट झालं तरी पत्ता लागत नाही. अशा वेळी नेपाळ सरकारने त्या देशाच्या सरकारला घटनेची माहिती देणं वगैरे बरेच प्रकार असतात. त्यामुळे प्रशासनावरचा ताण वाढतो. माझ्या गिर्यारोहण कारकिर्दीतले असे अनेक प्रसंग मला आठवतात. त्यामुळेच सोलो समीट ही फार स्वागतार्ह गोष्ट नाही, असं माझं मत आहे.

शेर्पा हा गिर्यारोहण मोहिमांची लाइफलाइन असतो. गिर्यारोहकांचं सामान वाहण्यापासून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यापर्यंत शेर्पा सगळं काही करतात. एवढंच नाही तर ते स्थानिक असल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमताही प्रचंड असते. मोहिमांदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ओढवली तरी त्यातून मार्ग काढण्याचं कसब शेर्पांकडे असतं. एखादा गिर्यारोहक कितीही तयारीचा असेल तरी नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाहीत. शिवाय सोलो समीट करताना सामान वाहण्यापासून प्रत्येक गोष्ट स्वतः करावी लागते. साहजिकच काय किती बरोबर न्यायचं यावरही मर्यादा येतात.

त्यामुळे जोखीम प्रचंड असते. म्हणून अष्टहजारी शिखरांवर सोलो चढाई करण्यावर बंदी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

मोहिमेवरून परतताना हिमालयाच्या पर्यावरणाला हानिकारक ठरेल असा सगळा कचरा परत आणणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो आणि ते पारही पाडतो; पण गिर्यारोहकांकडून मोठं शुल्क घेणाऱ्या नेपाळने यापुढे पर्यावरणाशी असलेली बांधिलकीही जपावी, असं मला मनोमन वाटतं.

Web Title: Don't go to Everest alone, pay more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.