गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 07:22 IST2025-02-07T07:17:34+5:302025-02-07T07:22:02+5:30

उद‌्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीत पर्यटकांसाठी स्वर्ग उभा करण्याचा अजब बेत ट्रम्प यांनी आखला आहे खरा; पण ही चिंचोळी पट्टी आहे कुठे? ती कशी तयार झाली?

donald trump on Gaza patti: Bloody History and Stifling Geography | गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल

गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल

-निळू दामले (ज्येष्ठ पत्रकार)
गाझा पट्टी हा सुमारे ३६५ चौरस किमी  आकाराचा छोटासा भूभाग आहे. आकारानं मुंबईच्या सुमारे अर्धा. एका बाजूला भूमध्य समुद्राचा किनारा, एका बाजूला सिनाईचं वाळवंट आणि बाकी तीनही बाजूंनी इस्रायल. गाझा हा संयुक्त राष्ट्रसंघ आणि १६० पेक्षा अधिक देशांनी मान्यता दिलेल्या पॅलेस्टाईन या देशाचा एक भाग आहे. वेस्ट बँक आणि गाझा मिळून पॅलेस्टाइन होतो. गाझामध्ये एक सरकार आहे. ते सार्वभौम नाही. दिवाबत्ती, पाणी इत्यादी नागरी सुविधा सांभाळणं येवढंच गाझातलं सरकार पाहतं. गाझाला स्वतःचं चलन नाही, स्वतःचं सैन्य नाही.
 
गाझावर इस्रायलचा ताबा आहे. इथलं जगणं इस्रायलच्या मेहेरबानीवर अवलंबून असतं.  गाझा आणि इस्रायल यांच्यात नेहमी संघर्ष होत असतो. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी गाझात सक्रिय असलेल्या ‘हमास’ या संघटनेनं इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला, १५०० माणसं मारली, २५० माणसांचं अपहरण केलं. तिथून गाझामधलं नुकतंच स्थगित झालेलं युद्ध सुरू झालं.

गाझा आणि इस्रायलमधील संघर्ष ही एक भळभळती जखम आहे. ही जखम म्हणजे वर्ष १९४८ च्या मे महिन्यात इस्रायलचा जन्म होणं. पॅलेस्टाईन हा एक भूभाग होता. म्हणजे जमीन होती, निसर्ग होता, तिथं माणसं राहत होती. राजकारणाच्या हिशेबात हा भूभाग कधी पर्शियन साम्राज्याचा भाग होता, कधी ऑटोमन साम्राज्यात होता, कधी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 

इसवी सनापूर्वी दोनेक हजार वर्षांपासून इथली माणसं इतरत्र गेली, बाहेरची माणसं इथे आली. इथे नाना धर्म आणि पंथ झाले. या सगळ्या खटाटोपात इथं कधी काळी ज्यू होते आणि कधी कोणताही धर्म नसलेले, तर कधी मुस्लीम झालेले लोक होते. भाषा वेगळ्या, उपासना पद्धती वेगळ्या; पण या सर्वांचा वंश एकच : अरब.

काळाच्या ओघात ज्यू पॅलेस्टाइनच्या बाहेर पडले, जगभर पसरले. ते सामान्यपणे जिथं वसले तिथं स्थानिक लोकांशी त्यांचं पटलं नाही. अनेक कारणांमुळं ते समाजापासून तुटले. या तुटलेपणातून अगदी टोकाची स्थिती निर्माण झाली आणि हिटलरनं त्यांचा नायनाटच करायचं ठरवलं, लाखो ज्यू मारले. ज्यूंबद्दल जगभर एक सहानुभूतीचा लाट आली. ज्यूंनी या लाटेचा वापर करून ज्यू समाजाचं एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं ठरवलं. 

ज्यू समाजात बुद्धिमान आणि उद्योजक खूप होते. त्यांच्या दबावामुळं ब्रिटिशांनी पॅलेस्टाइनमधेच इस्रायल तयार करायचं ठरवलं. कारण मुळात ज्यू लोक पॅलेस्टाइनमधलेच. वर्ष १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन ही दोन राष्ट्रं तयार करावीत, असा ठराव मंजूर केला. 

ठरावाची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकांशी विचारविनिमय झाला नाही. स्थानिकांनी विरोध केला. बाहेरून आलेले ज्यू आणि स्थानिक अरब यांच्यात मारामारी पेटली, सिव्हिल वॉर झालं. या भानगडीत इस्रायल समर्थकांनी बळ वापरून इस्त्रायल तयार करून टाकला.

अरबांच्या बाजूनं इजिप्त, सीरिया इत्यादी देश उभे राहिले. ब्रिटिश, अमेरिकन लोक इस्रायलच्या मागं उभे राहिले. युद्ध झालं. युद्धाचा फायदा घेऊन इस्रायलनं अरब गावं हडपली. पुन्हा युद्ध. पुन्हा हडपाहडपी. अमेरिकेनं जबर ताकद वापरली, इस्रायलच्या अरब विरोधकांत फूट पाडली. 

अरब देश स्वतःचा स्वार्थ साधत राहिले. पॅलेस्टाईन एकटं पडलं. पॅलेस्टाईन कधी लढाई करे, कधी बंड करे. त्यातून उलट पॅलेस्टाईनचंच नुकसान होत गेलं, इस्रायल हा देश अधिकाधिक बलवान होत गेला. इस्रायल स्थापन करणाऱ्या लोकांचा अंतस्थ हेतू पूर्ण पॅलेस्टाईन हडप करण्याचा होता. 

हुशारीनं वेस्ट बँक आणि गाझातली गावं काबीज करत इस्रायलनं आपला विस्तार सुरूच ठेवला. संयुक्त राष्ट्रसंघ आणि जगभरच्या देशांनी केलेले निषेध, ठराव, टीका हे सारं-सारं इस्रायलनं धाब्यावर बसवलं. हमासने केलेल्या हल्ल्याचं निमित्त करून केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेली गाझा पट्टी आता पूर्ण रिकामी करण्याची खटपट इस्रायलनं चालवली आहे. 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याच उद्ध्वस्त चिंचोळ्या पट्टीचं थेट ‘रिव्हिएरा ऑफ मिडल इस्ट’ करून टाकून इथे श्रीमंत पर्यटकांच्या आरामाची व्यवस्था करायची आहे आणि त्याकरिता या पट्टीतल्या हैराण, बेघर नागरिकांनी शेजारच्या इजिप्त आणि जॉर्डनमध्ये निघून जावं, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे.
damlenilkanth@gmail.com

Web Title: donald trump on Gaza patti: Bloody History and Stifling Geography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.