रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा!

By Devendra Darda | Published: October 14, 2021 10:47 AM2021-10-14T10:47:16+5:302021-10-14T10:48:10+5:30

Pollution: जगाच्या पाठीवर कुठेही  जा, प्रदूषण  पाठ सोडत नाही.  घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविषयीही लोक साशंक झाले आहेत.

Does black smoke mix in your breath every day? An effect that can have on nature | रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा!

रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा!

googlenewsNext

>> देवेंद्र दर्डा, मॅनेजिंग डायरेक्टर, लोकमत

जगाच्या पाठीवर कुठेही जा, प्रदूषण पाठ सोडत नाही. घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविषयीही लोक साशंक झाले आहेत. प्रदूषणाच्या भीतीपोटी स्वत:ला घरात कोंडून घ्यावं, तर, आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहतात, अन् घराबाहेर पडलं, तर, प्रदूषणाचे काळे ढग आयुष्य कमी करतात. 

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानं तर, एक भयानक सत्य उजेडात आणलं आहे. संशोधकांचं म्हणणं आहे, तीन वर्षं एखाद्या प्रदूषित शहरात राहिलात, तरी हृदयविकाराचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. हार्ट ॲटॅक येण्याचा महिलांचा धोका तर, काही शहरात तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. दुसरीकडे संशोधकांचा असाही कयास आहे की, जगभरात प्रदूषणविरहित शहरांची संख्या आता जवळपास नष्ट झाली आहे. प्रत्येक ठिकाणचं प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतंच आहे. 

यासंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि दीर्घकाळ चाललेला असा अभ्यास डेन्मार्कच्या संशोधकांनी केला. त्यांनी सुमारे २२ हजार नर्सवर वीस वर्षे अभ्यास केला. त्यात शहरी आणि ग्रमाीण भागात राहाणाऱ्या, अशा दोन्ही प्रकारच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी काही निष्कर्ष काढले. त्यानुसार प्रदूषणामुळे महिलांना हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच जास्त आहे. ते सरासरी ४३ टक्क्यांपर्यंत जातं. गेल्या दशकात प्रदूषणाचं प्रमाण तर वाढलंच, पण, त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा घातक परिणामही वाढला. रोज विषारी वायू शरीरात जात असल्यामुळे विस्मरण, डिमेन्शिया, लठ्ठपणा, प्रजनन अक्षमता तसंच इतरही अनेक रोगांची शिकार होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात अनारोग्य वाढल्याचं कारणही प्रदूषण हेच आहे. 

हृदयविकारामुळे इतरही अवयव निकामी व्हायला लागतात. त्यामुळे थकवा येणं, खूप अशक्तपणा वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं, हे दृश्य परिणाम तर, दिसायला लागतातच, पण, अनेकांना लगेच लक्षातही येत नाहीत, अशा आजारांचं प्रमाणही वाढायला लागतं. आवाजाचं प्रदूषण, हवेचं आणि पाण्याचं प्रदूषण, वाहनांमुळे तसेच कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण यामुळे आपल्या धमन्या आणि रक्तवाहिन्या कडक होतात. त्यात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि त्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो. दुसऱ्या एका संशोधनानुसार दहा लाख ब्रिटिश नागरिक आणि तीन कोटी अमेरिकन नागरिकांमध्ये प्रदूषणाचे विपरित परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आले. त्यामुळे तिथेही हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. 

अनेकदा आवाजामुळे होणारं प्रदूषण आपल्या लक्षात येत नाही. कारण आपल्या कानांना त्याची सवय होत जाते, पण, सतत मोठ्या आवाजात बोलल्यामुळे, मोठा, कर्कश आवाज ऐकल्यामुळे, वाहनांच्या आणि हॉर्नच्या गोंगाटात वावरल्यामुळे आपली ऐकण्याची क्षमता तर, हळूहळू कमी होत जातेच, पण, अशा वातावरणात राहणाऱ्या माणसांचा स्वभावही रागीट, चिडचिडा होतो, असं संशोधकांना आढळून आलं आहे. कानठळ्या बसवणारा किंवा तीव्र आवाज सतत तुमच्या कानावर पडल्यानं तुमची झोपेची पातळीही खालावते. नीट, शांत झोप लागत नाही. अख्ख्या शरीरावर त्याचा ताण पडतो. हृदय आणि मेंदूवर त्याचा जास्त विपरित परिणाम होतो. त्यामुळेही हृदयविकाराचं प्रमाण वाढतं. 

संशोधकांचं म्हणणं आहे, प्रदूषणापासून वाचण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणं, प्रदूषणापासून दूर राहाणं, शहरापेक्षा ग्रामीण भागाला पसंती देणं, असे उपाय जगभरातल्या नागरिकांनी सुरु केले असले, तरी त्याचाही उलटाच परिणाम होतो आहे. कारण ज्या जागा, जी स्थळं, जी गावं आधी प्रदूषणापासून मुक्त होती, तीही प्रदूषणानं घेरली जायला लागली आहेत. प्रदूषणापासून दूर पळणं हा त्यावरचा उपाय नाही, तर, प्रत्येकानं प्रदूषण टाळणं हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. महिलांना त्यापासून अधिकच काळजी घ्यावी लागेल. 

हात, खांद्यांचा हृदयाशी काय संबंध?

संशोधकांनी आणखीही एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे. हृदयविकाराचं मुख्य चिन्ह म्हणजे तुमच्या छातीत दुखणं. पण, विशेषत: महिलांच्या बाबतीत प्रत्येकवेळी हे लक्षण दिसेलच असं नाही. त्याऐवजी मान, जबडा, खांदे, पाठीचा वरचा भाग, पोट इत्यादी ठिकाणी दुखणं, अस्वस्थ वाटणं, श्वासोच्छवासाची गती वाढणं, एका किंवा दोन्ही हातांना वेदना होणं, नॉशिया येणं किंवा उलटी, मळमळ होणं, घाम येणं, चक्कर येणं, वारंवार थकवा येणं, अपचन होणं.. अशी कारणं दिसली तर?... संशोधकांचं म्हणणं आहे, ही कारणं ‘किरकोळ’ असल्याचं अनेक महिला मानतात, त्याकडे दुर्लक्ष करतात, पण, तेच त्यांच्या हृदयविकाराचंही कारण असू शकतं!.. त्यामुळे महिलांनो, आपल्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करणं टाळा.

Web Title: Does black smoke mix in your breath every day? An effect that can have on nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.