‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
By अतुल कुलकर्णी | Updated: December 25, 2025 08:03 IST2025-12-25T08:01:40+5:302025-12-25T08:03:28+5:30
‘निवडून आल्यावर मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही’, असे लिहिलेल्या स्टॅम्प पेपरवर तुमच्या वॉर्डात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची सही मागा... बघा, काय होते !

‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
- अतुल कुलकर्णी, संपादक
लोकमत, मुंबई
श्रीवर्धन नगरपरिषदेत उद्धवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. अंगावरचा गुलाल उतरायच्या आतच त्यांनी आपण शिंदेसेनेसोबत आहोत, असे सांगून टाकले. ज्या मतदारांनी उद्धवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांना मतदान केले असेल, त्यांच्या मतांची क्षणार्धात राखरांगोळी झाली. हे असे फक्त एकाच पक्षाबद्दल घडत नाही. मतदारांचे काम फक्त मतदान करणे आहे. विजयानंतर त्या उमेदवाराने कोणत्या पक्षात जायचे, कोणासोबत संसार थाटायचा, याचे कसलेही बंधन त्याच्यावर उरत नाही. ‘आम्ही तुमच्या पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून मतदान केले होते. आता तुम्ही पक्ष का बदलला?’ - असा सवाल करण्याची सोय नाही. कोणी विचारलेच, तर ‘तुम्हाला तुमच्या मतांचे पैसे मिळाले ना?’ - असे ऐकवायला विजयी उमेदवार कमी करणार नाहीत.
एकेकाळी पक्ष आणि भूमिका बघून लोक मतदान करायचे. डावे, उजवे, पुरोगामी, समाजवादी या शब्दांना काही अर्थ होता. उमेदवारांना पक्षाची गरज असायची. राजकारण बदलत गेले. निवडून येऊ शकणाऱ्या, आपापले मतदारसंघ सुभेदारासारखे सांभाळणाऱ्या सुभेदारांचा पक्ष अशी ओळख शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तयार केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले आणि पक्षा-पक्षातले फरक, भिंती गळून पडल्या. आता पक्षांना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची गरज पडते. ताकदवान उमेदवार सोयीच्या पक्षात जातात. सकाळी एका पक्षात असणारा नेता दुपारी दुसऱ्या पक्षात जातो. दुसऱ्या पक्षातला नेता संध्याकाळी तिसऱ्या पक्षात येतो. निवडून येणाऱ्यांसाठी पवित्र-अपवित्र काहीही उरलेले नाही.
मतदान हा पवित्र हक्क असून, लोकशाही वाचवण्याची ताकद आपल्या बोटात आहे, असे मतदार मानतात. मात्र, निवडून आल्यावर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांना असाहाय्यपणे बघत राहण्यापलीकडे आपण करतो काय? तुम्ही ज्यांना मतदान कराल, तो त्याच पक्षात राहील याची कसलीही खात्री तो उमेदवार देत नाही. ज्या पक्षातर्फे तो उभा आहे, तो पक्ष तरी कुठून तशी खात्री देणार...?

आपण ज्यांना मतदान करतो ते आपल्या मतांची किती कदर करतात, हे तपासण्यासाठी एक प्रयोग करून बघा. त्यासाठी चार-पाचशे रुपये खर्च करावे लागतील. शंभर रुपयांचे चार-पाच स्टॅम्प पेपर आणून ठेवा. तुमच्या वॉर्डात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडून, ‘मी निवडून आल्यानंतर कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. जर गेलो, तर माझा हाच राजीनामा समजावा’, असा मजकूर लिहून त्याखाली त्याची सही मागा. त्यावर त्याची काय प्रतिक्रिया येते, ते नक्की बघा. सोबत आणलेला प्रचाराचा कागदही तुम्हाला न देता ते पाठ फिरवून निघून जातील. उलट तुम्हालाच वेड्यात काढतील. एकही उमेदवार सही करणार नाही. जर एखाद्या उमेदवाराने अशा स्टॅम्प पेपरवर सही केलीच, तर त्याचा जाहीर सत्कार करा. सगळे मिळून त्याला निवडून द्या. मतदार म्हणून असा बाणेदारपणा दाखवण्याची वेळ आली आहे.
दुर्दैवाने, पाच वर्षांचे केबलचे पैसे भरा, सोसायटीच्या इमारतीला रंग लावून द्या, अशा मागण्या सोसायट्यांमधून होऊ लागल्या आहेत. अशा सहज विकल्या जाणाऱ्या ‘मतदारा’ची भीती कोणत्या उमेदवाराला वाटेल?, इतक्या स्वस्तात विकले जाणारे मतदार कोणाला नको आहेत?, मुंबईत एका कुख्यात गुंडाने निवडणुकीच्या काळात प्रत्येक घरात व्हेज, नॉनव्हेज बिर्याणीची पाकिटे पाठवली. जे दारू पितात त्यांच्या घरी रोज दारूची एक बाटलीही पाठवली. लोकांनी ते आवडीने स्वीकारले. ‘तुझ्यावर खुनाचे आरोप आहेत’, असे त्या उमेदवाराला विचारण्याची हिंमत कोणालाही झाली नाही. उलट खाल्लेल्या बिर्याणीला जागून लोकांनी मतदान केले.
पक्षांतर आजाराच्या साथीत सापडलेले उमेदवार अशा मतदारांच्या जिवावर तर वाटेल तशा उड्या मारतात. हीच वेळ आहे. आपल्या मतांची किंमत आपणच ओळखली पाहिजे. किमान मत मागायला येणाऱ्याकडून ‘पक्षांतर करणार नाही’, असे लेखी आश्वासन घेणे तरी आपल्या हातात आहे... बघा प्रयत्न करून, कोण लिहून देतो ते... असे लिहून देणारे भेटलेच तर अजूनही पक्ष, भूमिका, विचार या गोष्टी टिकून आहेत, असे म्हणता येईल.
atul.kulkarni@lokmat.com