तुम्हाला खसखशीचा दाणा व्हायचंय की आभाळ?
By Admin | Updated: January 1, 2015 02:45 IST2015-01-01T02:45:55+5:302015-01-01T02:45:55+5:30
आपली शिक्षणाची सगळी वाट चुकलेली आहे. सगळा जो विद्यार्थी वर्ग आहे, त्याचे जीन्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे बुद्धीचे प्रकार, वेगवेगळ्या तऱ्हेची आवड घेऊन ही मुले जन्माला आलेली आहेत.

तुम्हाला खसखशीचा दाणा व्हायचंय की आभाळ?
आपली शिक्षणाची सगळी वाट चुकलेली आहे. सगळा जो विद्यार्थी वर्ग आहे, त्याचे जीन्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे बुद्धीचे प्रकार, वेगवेगळ्या तऱ्हेची आवड घेऊन ही मुले जन्माला आलेली आहेत. प्रत्येकाच्या घरातली पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. पण सगळ्यांना आपण एक कल्पून त्यांच्यासाठी एकच अभ्यासक्रम तयार करतो. त्यांच्यासाठी पुस्तकं तीच काढतो़ तोच अभ्यासक्रम, तीच पुस्तकं, तीच परीक्षा. जो काही निकाल असेल तो आकड्यांमध्ये. ही सगळी मोठी वैज्ञानिक चूक आहे, असं मला वाटतं.
चूक आता कशी सुधारता येईल, आणि आता आपण इतके पुढे आलो आहोत, परत मागे कसं जाता येईल, असे प्रश्न निर्माण होतील. पण मला असं वाटतं, की यातले सगळे ताण आहेत ते ढिले कसे करता येतील आपल्याला, हे पाहू. सगळ्या स्पर्धा असतात ना, त्या प्रथम आपण बाद करू या. एखादा मुलगा चित्र काढत असेल तर लगेच पाठवा त्याचं चित्र स्पर्धेत, असं न करता त्याला चित्र काढू द्या. त्याच्या चित्रकलेला प्रोत्साहन देऊ या आपण. पण त्याच्यापेक्षा तू चांगलं काढतोस, हे कशाला पाहिजे? त्याने चित्रं काढावीत. त्याने चांगलं चित्रकार व्हावं.
एखाद्याला गणित सोडवायची आवड असेल, एखाद्याला खेळायचं असेल; खेळू द्यात ना. म्हणजे अगदी सौम्य स्वरूपात स्पर्धा ठीक आहे. हुतुतू खेळ. दोन पार्ट्या आहेत. मुलं खेळतात आणि सगळे गप्पा मारत गावाकडं परत जातात. व्हॉलिबॉल खेड्यांत पूर्वी खूप असायचा. खेळ हा खेळाच्या जागी आहे. त्याचा उद्देश असा की आपल्याला एक चांगला ‘पास्ट टाइम’ येतो, चांगला भूतकाळ निर्माण होतो. पण खेळ किंंवा अभ्यास हेच मुख्य केंद्र समजून त्याभोवती जीवन, त्याभोवती सगळं काही आणि तीव्र स्पर्धा. त्याला ती ‘किलर इन्स्टिन्क्ट’ लागते. हे सगळं अजब आहे अजब. हा चांगला विरंगुळा आहे, असं आपण म्हणू या. विरंगुळा म्हणजे जीवनात किती वेळ असणार आहे? तितकं त्याचं स्थान असावं ना? आपला चौरस आहे की नाही? म्हणजे ताटात सगळं पाहिजे. भाजी पाहिजे, भाकरी पाहिजे, वरण पाहिजे, एखादी हिरवी पालेभाजी पाहिजे, एखादी कच्ची कोशिंंबीर पाहिजे. सगळं पाहिजे ना? इथं म्हणजे नुसतं अभ्यास एके अभ्यास; बाकी गोष्टींकडे आपण पाहायलाच तयार नाहीये.
खेड्यातल्या शाळेत किंंवा शहरातल्या शाळांमध्येही मुलांना झाडावर चढता येतं की नाही किंंवा नदीत पोहता येतंय का, हे आपण नाही बघत. जीवनावश्यक कौशल्यं आहेत ती. एखाद्याला मित्र मिळवता येतात का? दुसऱ्यांना मदत करतो की नाही तो? मित्रांची मैत्री टिकवता येते का? हे जीवनात लागणारं केवढं मोठं कौशल्य आहे! एवढं असताना आपण शिक्षणात आता त्याकडे लक्षच देत नाही. आपण कशाला एवढं सबंध अवडंबर तयार केलंय? हेन्री डेव्हीड थोरो होता ना? गांधीजी त्याला गुरू मानायचे. सत्याग्रहाची कल्पना त्याच्याकडून घेतली त्यांनी. त्याने खूप चांगलं उदाहरण सांगितलं आहे. समजा, एखादा विद्यार्थी धातुशास्त्रात म्हणजे मेटॅलर्जीत पहिला आला म्हणून त्याला त्याच्या वडिलांनी उत्तम कंपनीचा चाकू भेट करून दिला, स्विस कंपनीचा. आणि दुसरा विद्यार्थी डोंगरातून हिंंडत होता, त्याला दोन दगड दिसले. ते वेगळे दिसत असल्याने कसले हे पाहिले. नंतर ते दगड इंधन लावून खूप उकळले. त्याला त्यात धातूचा रस दिसला. रस वेगळा करून त्याची पट्टी तयार केली आणि चाकू तयार केला, तर कुठल्या चाकूला तुम्ही बक्षीस द्याल? स्विस कंपनीच्या की याच्या ओबडधोबड चाकूला? माझ्या मते ओबडधोबड चाकूला दिलं पाहिजे. कारण त्याच्यात त्याला काही तरी सुचलंय आणि सुचलेल्याचा त्याने पाठलाग केलाय. पाठलाग करून त्याने त्याच्यापुरतं एक साधन बनवलंय. माझ्या मते हे सर्वात मोठं कौशल्य आहे. आज आपण काय करतो? सगळं पाठ करायचं आणि पाठ केलेलं उतरवून काढायचं. यापलीकडं काय असतं ? आणि बोलायचं आपलं टम टम टम टम. गौतम बुद्धाच्या धड्यावरची उत्तरं मुलं लिहितील; पण गौतम बुद्धाविषयी त्याला कुतूहल निर्माण झालंय का? ती स्वत: काही पुस्तकं घेऊन वाचताहेत का?
एक वेगळा कल घेऊन मूल जन्माला आलेले असते आणि तो कल शोधायला त्याला शिक्षणाने मदत करायची. शिक्षकाने त्याला त्यासाठी पुस्तकं आणून द्यावीत, मदत करावी, त्यापुढं प्रश्न उभे करावेत. काही लोक म्हणतील, असे किती विद्यार्थी आहेत आणि त्यांचे प्रमाण काय आहे? पण दिशा लक्षात ठेवू यात. सध्या जो अभ्यास आहे, तो आपण टाळू शकत नाही; पण त्यातला स्पर्धेचा, नंबर येण्याचा सेन्स काढून टाकू या. त्याचा कल कशात आहे हे शिक्षकांनी शोधलं पाहिजे. कोणाला सुतारकाम आवडत असेल, कोणाला चित्रकला आवडत असेल, कोणाला खेळात आवड असेल, कोणाला आणखी कशात असेल. त्याला आपण समजा त्याच्या आवडीचं शिक्षण दिलं. समजा़ त्याला सुतारकाम करायचं आहे़ आपण सुताराकडं जाऊ. मुलं भारून जातात. मी जायचो सुताराकडे काम शिकायला. त्या वेळी पाहिलेलं आणि त्याच्या हाताखाली केलेलं काम पुढे आत्मविश्वास निर्माण करतं. मी आता वूडकार्व्हिंग करू शकतो. चर्मकार शिक्षक होते़ त्यांचा भाऊ चपला दुरुस्त करीत असे. त्याचं पाहून चपला दुरुस्त करायला लागलो घरच्या घरी. आसपासच्या लोकांच्या करू लागलो. कुठल्याही कामाला कमी समजायचं नाही. श्रमांना खूप महत्त्व आहे आपल्याकडे.
आपण काय करतो, की पैसे टाका आणि ते घ्या. दिवाळीचे आकाशकंदील आम्ही घरी करायचो. आता बाजारातून विकत आणतात. रांगोळ्या सुद्धा काढत नाहीत, त्याचे छाप आणतात. छापावर रांगोळी टाकतात. आम्ही ग्रीटिंंग्ज करायचो. त्यावर पणती काढायचो, दोन ओळी लिहायचो. आता नुसतं कार्डावर सही करून पाठवतात. कृत्रिम, कचकड्याचं आयुष्य झालं आहे. मला वाटतं शिक्षणाने विद्यार्थ्याला जीवनाकडं न्यावं. भूगोलाचा विषय असेल तर आपण गावाचा नकाशा काढायचाय. चला आपण फिरू या. कुठं काय आहे याची नोंद करू या. झाडं आहेत ती कसली आहेत हे जुन्या लोकांना विचारू या़ त्याचे उपयोग विचारू या. आपल्या गावाचा इतिहास, भूगोल जर आपण अशा तऱ्हेने शोधला तर गावासाठी केवढं डॉक्युमेंट होईल! गावाचा पण एक इतिहास असतो. कधी दुष्काळ पडलेला असतो, अनेक गोष्टी झालेल्या असतात, प्लस-मायनस अशा काही तरी. त्या आपण शोधणं याला इतिहास म्हणू या. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या गावात पोचली होती का, विचारू या वृद्धांना. त्यांना आठवत असेल. जीवनाशी मुलाला प्रत्यक्ष भिडू द्या. त्याला त्याचं ज्ञान होऊ द्या. मोठी माणसं आहेत, मुलांना त्यांना जे विचारायचे आहे ते विचारू द्या. तुम्ही नका तिथं जाऊ. मुलांनी माहिती घ्यावी आणावी, असं मला वाटतं. सगळ्या गोष्टींचं अवडंबर कमी करू या. आपण त्याला त्याच्या जागी ठेवू या. म्हणजे कुतूहल निर्माण झालं तर माझ्यापाशी पुस्तक आहे. ते संदर्भ म्हणून वाचेऩ पण पुस्तक हे संपूर्ण ज्ञान आहे, असं नाहीये. ज्ञानाविषयी कुतूहल असेल तर घेऊ दिलं पाहिजे. एक चांगलं वाक्य आहे, ज्ञान दिलं जात नाही, घेतलं जातं. आता ते नुसतं दिलं जातंय. ते घेतलं जाते की नाही हे आपण पाहात नाही. सगळ्यामध्ये पैसा हा केंद्रस्थानी आहे. मुलाला कुठल्या लाइनला घालायचं? त्या त्या वेळेला जास्त पैसा देणारी जी लाइन असेल ना, तिच्याकडे सगळा ओढा असतो. या पैसा संस्कृतीचा आपण विचार केला पाहिजे. फक्त पैशाने माणूस सुखी-समाधानी होतो का? तसं असतं तर सगळे श्रीमंत सुखी झाले असते!
उलटं आपण पाहतो. जेवढे श्रीमंत लोक असतात त्यांच्यावर कोर्टकचेऱ्या सुरू का असतात? एवढी त्यांची भाऊबंदकी उफाळून का आलेली असते? आपले प्रश्न ते स्वत: सोडवू शकत नाहीत. वकिलांची धन करावी लागते. माणसं मरतात, पिढ्या मरतात; खटले मात्र अमर आहेत. पिढ्या जातात, वकिलांच्या पिढ्या जातात तरी खटले सुरू राहतात.
पालकांनी हा विचार केला पाहिजे, की पैशासाठी आपण सारे करीत असतो? कोणत्या क्षेत्रात जास्त संधी आहे आणि कोणत्या आयटी कंपन्यांमध्ये चांगला पगार मिळतो, हे पाहण्यापेक्षा त्याची आवड कशात आहे हे पाहिलं पाहिजे. तुम्ही असंही करू शकता, उपजीविकेसाठी नोकरी असेल, माफक पगार असेल, पण त्याच्यातून मोकळा वेळ मिळाला की आवडीचं काम करता येईल. मुळात आवडीचं काम करता आलं की माणूस समाधानी राहील ना!
माणसं वखवखलेली आहेत
आज वखवखलेली माणसं आहेत. पैसा अतृप्ती तयार करतो. कितीही फायदा मिळाला तरी पुढच्या वर्षी वाढला पाहिजे, नाहीतर ग्राफ खाली आला. ग्राफ खाली आला की त्यांचं मन वर-खाली होतं. इतकं ते सगळं महत्त्वाचं आहे का? निसर्गानं तुमच्याकडं जे धन दिलेलं आहे, मन आहे. ते किती क्षुद्र होऊ शकतं? बहिणाबार्इंची कविता आहे ना? ‘मन केवढं केवढं जसा खाकसाचा दाणा, मन केवढं केवढं त्यात आभाळ मावेना.’
तुम्हाला खसखशीचा दाणा व्हायचंय की आभाळ व्हायचंय, असा हा प्रश्न आहे. आणि आपण आपल्या पोरांना असं किरटं जीवन का देतोय? त्यांच्या मनात ती बीजं का रोवतोय आपण? १० वर्षांच्या मुलानं जर्किन घेऊन दिलं नाही म्हणून आत्महत्या केली, हे आपण पाहिलं. भोवतालच्या वातावरणाचा मुलांवर जो प्रभाव आहे, तो केवढा जबरदस्त आहे. आपण आता जागे होणार आहोत की नाही?
- डॉ. अनिल अवचट
ज्येष्ठ समाजसेवक