दिव्या दिव्या दीपत्कार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:21 IST2025-07-30T08:19:27+5:302025-07-30T08:21:40+5:30
स्पर्धेची अंतिम फेरी दिव्या आणि कोनेरू हम्पी या दोन भारतीय खेळाडूंमध्येच झाली.

दिव्या दिव्या दीपत्कार...
जाॅर्जियातील बाटुमी येथे सोमवारी नवा इतिहास लिहिला गेला. नागपूरची दिव्या देशमुख हिने अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ, फिडेचे जागतिक अजिंक्यपद पटकावले. भारताचे हे पहिलेच महिला अजिंक्यपद. संपूर्ण देश हरखून गेला. देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत मान्यवरांनी दिव्यावर काैतुकाचा वर्षाव केला. या महाराष्ट्रकन्येने विजेतपदासोबत अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. स्पर्धेची अंतिम फेरी दिव्या आणि कोनेरू हम्पी या दोन भारतीय खेळाडूंमध्येच झाली.
दिव्या देशमुख हिला थेट पंधरावे मानांकन. त्यातही ती केवळ आंतरराष्ट्रीय मास्टर. बाकीच्या बहुतेक दिग्गज ग्रँडमास्टर. कोनेरी ही गेल्या पंचवीस वर्षांमधील भारताची सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू. स्पर्धेत तिला चाैथे मानांकन. तिला हरविणे हाच एक चमत्कार. परंतु, दिव्याचे यश यापुरते मर्यादित नव्हते. तिने चाैथ्या फेरीत दुसरी मानांकित झू जिनर आणि उपांत्य फेरीत तिसरी मानांकित टॅन झोंगयी या चीनच्या दिग्गज दोघींना पराभूत केले होते. स्पर्धेची उपांत्य फेरी भारत विरुद्ध चीन अशीच होती. उपउपांत्य फेरीही तशीच होती. त्या फेरीत आठजणींपैकी भारताच्या चाैघी व चीनच्या तिघी होत्या. अजिंक्यपद पटकावताच दिव्याला थेट ग्रँडमास्टर किताब बहाल झाला. त्यासाठी फिडे संघटनेचे नियमित तीन निकष तिला पार करावे लागले नाहीत. दिव्या आता कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे आणि तिचा एकूण धडाका पाहता ती पुढच्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हानवीर असेल, अशी खात्री अनेक दिग्गजांना आहे.
अर्थात, दिव्याचे हे यश एक दिवसाचा चमत्कार नाही. जगज्जेते मुळात आकाशातून पडत नाहीत. त्यामागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या असते. ती साधना केवळ खेळाडूच लहानपणापासून करतात असे नाही, तर त्यांचे पालकही प्रचंड कष्ट उपसत असतात. खेळाडू व त्यांच्या पालकांची ही साधना खर्चीकही असते. त्यासाठी पालकांना खासगी आयुष्य, व्यवसाय बाजूला ठेवून अपत्यांना घडवावे लागते. डाॅ. जितेंद्र व डाॅ. नम्रता देशमुख हे दिव्याचे आई-वडील डाॅक्टर. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डाॅ. के. जी. देशमुख यांची दिव्या ही नात. आईने करिअर बाजूला ठेवून मुलीसाठी स्वत:ला वाहून घेतले, तर वडिलांनी व्यवसायात गुंतवून घेतले.
दिव्याच्या जागतिक यशाने आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. सात महिन्यांपूर्वी, डिसेंबरमध्ये अठरा वर्षांच्या गुकेश डोम्माराजू याने इतिहास घडविला. चीनच्या डिंग लिरेन याला हरवून जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट पटकावणारा गुकेश बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत तरुण जगज्जेता ठरला. त्याने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळविला होता. दिव्याचे फिडे जगज्जेतेपद ही गुकेशच्या सोनेरी कामगिरीची पुनरावृत्ती आहे. दोघांमध्ये अगदी विस्मयकारक अशी साम्यस्थळे आहेत. दिव्या व गुकेश दोघांचाही नागपूरशी संबंध आहे. नागपूर ही दिव्याची जन्मभूमी. चाैसष्ट घरांच्या पटावरच्या सगळ्या चालींची बाराखडी तिने इथेच गिरविली.
गुकेश चेन्नईचा असला तरी त्यानेही नागपूरच्या अकादमीत थोडे प्रशिक्षण घेतले. त्याने राष्ट्रीय स्तरावरील पहिले यशही नागपुरातच मिळविले. दोघेही विशीच्या उंबरठ्यावर आहेत. दोघांनीही अगदी कमी वयापासून, सात-दहा वर्षांच्या आतील वयोगटातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. दोघेही आता बुद्धिबळातील सर्वोच्च स्थानी आहेत. गेल्या वर्षीच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या सांघिक यशात दोघांचेही ठळक योगदान राहिले. याचा अर्थ भारतीय बुद्धिबळाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात केवळ सुरक्षितच नाही, तर नवा इतिहास घडविण्यासाठी ही पिढी सज्ज आहे आणि जागतिक यशाच्या गेल्या तीन दशकांमधील युगाचा पाया रचणारा विश्वनाथन आनंद या स्थित्यंतराचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आनंदनंतर जागतिक अजिंक्यपद जिंकणारा गुकेश हा केवळ दुसरा भारतीय आणि दिव्याने पटकावलेले अजिंक्यपद तर भारतासाठी पहिलेच.
कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावली, साैम्या स्वामिनाथन, वंतिका अग्रवाल किंवा सविता श्री यांना जमले नाही ते दिव्याने देशासाठी मिळविले आहे. तरुण वय, खांद्यावर भारताचा झेंडा, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यश, बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सुवर्णपदकामधील योगदान आणि सर्वोच्च किताब मिळवण्याची क्षमता, तिथले स्थान टिकविण्याची जिद्द ही या दोघांची साम्यस्थळे पाहता दिव्याचे अजिंक्यपद ही भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याचा, समृद्धीचा दीपत्कार ठरतो.