हे बिल विखेंच्या नावाने फाडा
By Admin | Updated: December 13, 2015 23:00 IST2015-12-13T23:00:44+5:302015-12-13T23:00:44+5:30
राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने जो काही गोंधळ चालविला आहे तो बघता अधिवेशनाचे पहिले पाच दिवस वाया जाण्याचे संपूर्ण अपश्रेय त्यांनाच द्यावे लागेल.

हे बिल विखेंच्या नावाने फाडा
राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने जो काही गोंधळ चालविला आहे तो बघता अधिवेशनाचे पहिले पाच दिवस वाया जाण्याचे संपूर्ण अपश्रेय त्यांनाच द्यावे लागेल. आधीचे विरोधी पक्षनेते बरे होते असे म्हणण्याची वेळ दरवेळी येते. विखे यांनी ती परंपरा कायम ठेवली आहे. बिनबुडाचे भांडे कलंडते. तसे विचारांची पक्की बैठक आणि तो मांडण्याचा दमदारपणा नसला की काय होते हे त्यांच्याकडे पाहून चटकन लक्षात येते. विखे यांच्या नेतृत्वात सध्या विधिमंडळातील काँग्रेस पक्षाची जी दयनीय अवस्था झाली आहे ती बघता कीव येते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे नागपुरात लाखाचा मोर्चा निघाला. त्या दणक्याचा फायदा घेत सरकारला नामोहरम करण्याची संधी काँग्रेसने सभागृहात मात्र गमावली.
विखे साहेब! आपण इतकी वर्षे मंत्री होता. सभागृहात चर्चा न होता एखादी मागणी मान्य केली, असे कधी झाले काहो? शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे कसे आवश्यक आहे हे सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगण्याची जबाबदारी तुमची होती. ती विसरून नुसता पोरखेळ चालला आहे. आठवडाभर चालविलेल्या गोंधळाचे बिल तुमच्या आणि राष्ट्रवादीच्या नावाने फाडले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्हाला चर्चा नको; कर्जमाफीची घोषणा करा, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितल्यानंतरही त्यांच्या बाजूला बसलेले जयंत पाटील विधानसभेत बोलत राहिले. दादांच्या रिमोटचे सेल गेले की काय?
सोमवारपासून कामकाज करा. सरकारला जाब विचारून कर्जमुक्तीची घोषणा करण्यास ते भाग पडेल अशी कोंडी करा. सरकारऐवजी विधानसभेची कोंडी करायला तुम्ही निघाले आहात हे राज्यातील जनता पाहत आहे. कामकाजावर बहिष्काराची घोषणा करून सभागृहातून बाहेर पडणारे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांनी, ‘थांबा, आमचं ऐकून जा’, असे म्हणताच निमूटपणे जागेवर बसले. अशी अगतिकता बघितली की, कुठे नेऊन ठेवलाय विरोधी पक्ष माझा? असा प्रश्न पडतो. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांचे नेमके दुखणे याचा विचार करता कर्जमाफीने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि एका रात्रीतून शेतकरी आत्महत्त्या थांबतील असे मुळीच नाही. विरोधी पक्षांनाही हे कळतच असेल. मात्र गोंधळ, बहिष्काराने मिळणारी प्रसिद्धी कोणाला हवीहवीशी वाटत असेल तर काय बोलायचे? साखरसम्राट विखेंसाठी हे बोल कटू असतील पण विदर्भ, मराठवाड्याच्या आजच्या दुरवस्थेला जबाबदार कोण याचे उत्तर प्रामाणिकपणे द्या. नुसता गदारोळ काय करता? सरकारला जाब विचारा. बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्याला मेमो देण्याची सोय असते. संसदीय लोकशाहीमध्येही ती असती तर विधानसभेच्या कामकाजाला पाठ दाखवत असल्याबद्दल विखे-अजित पवारांना असाच मेमो द्यावा लागला असता. अजूनही वेळ गेलेली नाही. आठ दिवस शिल्लक आहेत.
शरद पवार यांच्या पुस्तकातून...
‘किल्लारीच्या भूकंपानंतर मी सकाळी सकाळी एका गावात अचानक पोहोचलो. एका बैलगाडीत पँटशर्ट घातलेला एक तरुण झोपलेला होता. तो शहरी वाटत होता. गावकऱ्यांना विचारल्यावर माहिती मिळाली की ते लातूरचे जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी आहेत. रात्री खूप उशिरापर्यंत मदतकार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलेले असते. मग जागा मिळेल तिथे अंग टेकतात; पुन्हा सकाळी कामाला लागतात.’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रातील हा प्रसंग. हेच परदेशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव आहेत. सर्व विभागांच्या सचिवांनी महिन्यातून आठ दिवस राज्यात दौरे केले पाहिजेत, असे आदेश मध्यंतरी काढण्यात आले होते. सचिवांनी दबाव आणून आठाचे चार दिवस करायला लावले. परदेशींना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैलगाडीत झोपायला सांगितले नव्हते. कर्तव्य म्हणून त्यांनी तसे केले. आजच्या सचिवांनीही लोककल्याणाची अशी भावना ठेवली तर आठ दिवसांचे दौरे चार दिवसांवर आणण्याचा अंगकाढूपणा ते करणार नाहीत.
- यदू जोशी