बाजारात ‘धन, धन’ दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:52 AM2020-11-17T05:52:44+5:302020-11-17T05:54:48+5:30

युरोप व अमेरिकावगैरे देश संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहेत. रोज लाखा-लाखाच्या संख्येने नवे बाधित निष्पन्न होत आहेत. भारतातही राजधानी दिल्लीत पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी अधिक रुग्ण निष्पन्न होताहेत आणि हिवाळ्यातील प्रदूषणाची पातळी आणखी गंभीर झाल्याने श्वसनाच्या त्रासाचा जणू उद्रेक झाला आहे.  

‘Dhan, Dhan’ Diwali in the market after corona Pandemic | बाजारात ‘धन, धन’ दिवाळी

बाजारात ‘धन, धन’ दिवाळी

Next

गेले आठ महिने कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करणाऱ्या भारतीय बाजारपेठेत दिवाळीच्या निमित्ताने झळाळी लाभली, मरगळ दूर झाली. रोज कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी जाणारा सामान्य माणूस इतका दीर्घकाळ घरात अडकून पडला होता. विषाणूची भीती अवतीभोवती थैमान घालत होती. त्यामुळे बाजारपेठा जणू ओस पडल्या होत्या. अनलॉक किंवा ‘मिशन बिगिन अगेन’सारख्या घोषणाही नैराश्येचे मळभ दूर करण्यात अपयशी ठरल्या होत्या. या पृष्ठभूमीवर दसऱ्यापासून महाराष्ट्र तसेच देशातील कोविड-१९ रुग्णसंख्या वेगाने कमी होऊ लागली.

रोज नव्याने निष्पन्न होणाऱ्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक राहू लागली. परिणामी, ऐन दिवाळीच्या पर्वामध्ये खरेदीचा उत्साह वाढला. वसुबारस व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारात चैतन्याचे दीप प्रज्वलित झाले, उलाढाल वाढली. भारतीय व्यापारी महासंघ किंवा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने देशातल्या २० मोठ्या शहरांमध्ये केलेल्या पाहणीत आढळले, की गेल्या दिवाळीच्या तुलनेत यंदा बाजारातील उलाढाल किमान १० टक्क्यांनी वाढली. ७२ हजार कोटीहून अधिक रकमेची उलाढाल या प्रकाशपर्वावर झाली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात तांत्रिक का होईना, पण पहिल्यांदाच मंदीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात मार्च ते जून या तिमाहीत जवळपास उणे २४ टक्के तर जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत उणे ९ टक्क्याच्या आसपास आर्थिक घसरण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे साहजिकच वर्षातील उरलेल्या दोन तिमाहीमध्ये काय होणार, याची चिंता व्यापारीवर्गाला लागलेली असणार. अशा वेळी ही बाजारपेठेतील चांगल्या उलाढालीची शुभवार्ता आली आहे. आपली अर्थव्यवस्था ग्राहकांच्या क्रयशक्तीवर, त्यांच्या खरेदीवर बेतलेली आहे. बाजारात चलनवलन राहिले तरच जीडीपीचा आलेख चढता राहतो. हे ओळखूनच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच काही रक्कम जाहीर केली. अन्य मार्गांनीही सामान्यांची क्रयशक्ती वाढविण्याचे प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांना दिवाळीच्या काळात यश आले, असे म्हणावे लागेल.


धनलक्ष्मीच्या या प्रसन्नतेला आणखी एक देशाभिमानाचाही पदर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लडाख सीमेवर चीनकडून जी आगळिकीची मालिका सुरू आहे, पाकिस्तानलाही गिलगिट-बाल्टिस्तानच्या रूपाने जी चीनकडून फूस दिली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्काराची भावना सार्वत्रिक आहे. भारतातील दिवाळी ही चिनी उत्पादकांसाठी पर्वणी असे. पण, यंदा देशाभिमानी भारतीयांनी चिनी मालावर पूर्णत: बहिष्कार टाकल्याचे आणि त्यामुळे चीनचे जवळपास ४० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे दिसून आले. आपल्या व्यवहाराला  व व्यापाराला अशी देशाभिमानाची जोड असेल तर अंतिमत: त्याचा फायदा आपल्या अर्थकारणाला, छोट्या-मोठ्या वस्तूंच्या उत्पादकांना व झालेच तर  संपतीनिर्मितीच्या प्रक्रियेला होणारच. यंदाच्या दिवाळीची आर्थिक उलाढाल या अंगाने खूप महत्त्वाची आहे. आर्थिक गाडा रुळावर येत असल्याचा हा आनंद टिकवून ठेवायचा असेल तर कुठे थांबायचे, हे आपणा सर्वांना समजायला हवे. दसरा-दिवाळीच्या सणासुदीत बाजारात, सार्वजनिक ठिकाणी वर्दळ वाढणार आणि कोविड-१९ विषाणूचा पुन्हा स्फोट होणार, असा इशारा अभ्यासक, तसेच जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संस्था गेले १५ दिवस देत आहेत.

युरोप व अमेरिकावगैरे देश संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहेत. रोज लाखा-लाखाच्या संख्येने नवे बाधित निष्पन्न होत आहेत. भारतातही राजधानी दिल्लीत पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी अधिक रुग्ण निष्पन्न होताहेत आणि हिवाळ्यातील प्रदूषणाची पातळी आणखी गंभीर झाल्याने श्वसनाच्या त्रासाचा जणू उद्रेक झाला आहे.  आता मंदिराच्या रूपाने शेवटची सार्वजनिक ठिकाणेही सरकारने लोकांसाठी खुली केली आहेत. त्याच वेळी घराबाहेर वावरताना मास्क न वापरण्याची, सॅनिटायझरचा वापर व इतर दक्षता न घेण्याची बेफिकिरी वाढताना दिसत आहे. हे असेच राहिले तर दिवाळीच्या आनंदावर विरजण टाकण्यास कारणीभूत होऊ. तेव्हा दिवाळीचा आनंद टिकून राहावा, बाजारातील उत्साह कायम राहावा, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. तरच विषाणूच्या फैलावाची दुसरी लाट आपण रोखू शकू, विविध कंपन्या जी कोरोना प्रतिबंधक लस बाजारात आणत आहेत, तिचा परिणामकारक उपयोग करू शकू.

Web Title: ‘Dhan, Dhan’ Diwali in the market after corona Pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी