सुखाच्या ठिपक्यांची रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2023 09:38 AM2023-01-09T09:38:58+5:302023-01-09T09:40:02+5:30

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संशोधकांनी नामवंतांची उणीव भासू दिली नाही.

Described as a gathering of scientists, scholars, researchers, the Indian Science Congress was held in Nagpur. | सुखाच्या ठिपक्यांची रांगोळी

सुखाच्या ठिपक्यांची रांगोळी

googlenewsNext

देश-विदेशातील वैज्ञानिक, अभ्यासक, संशोधकांचा महामेळावा असे ज्याचे वर्णन केले जाते ती इंडियन सायन्स काँग्रेस नागपुरात पार पडली. स्वातंत्र्यापूर्वी, किंबहुना जनमानसात स्वातंत्र्याची ऊर्मी दाटून येण्याआधी, १९१४ साली सुरू झालेल्या आयोजनाची ही १०८ वी आवृत्ती. शताब्दी साजरी करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे या काँग्रेसचे यजमानपद होते. तिकडे चीनमधून कोविड-१९ विषाणूचा नवा अवतार पुन्हा एकदा जगात विध्वंस घालायला निघालेला असताना हे आयोजन झाले. २००९ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल विजेत्या एडा योनाथ वगळता विदेशातून कुणी मोठे शास्त्रज्ञ न येण्यामागे कदाचित ते कारण असावे; पण विज्ञान कोणाची वाट पाहात नाही याचा प्रत्यय आला.

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संशोधकांनी नामवंतांची उणीव भासू दिली नाही. अनेक विस्मयकारक संशोधनांची माहिती जगासमोर आली. विशेषत: संरक्षण सिद्धता, गुप्तचर यंत्रणा, मानसिक आरोग्य, वाढत्या नैराश्याचा धोका, प्राणी व वनस्पतींची जनुकीय रचना, जीव वाचविण्यासाठी व सामान्यांचे जगणे सुखी बनविण्यासाठी होणारे जनुकीय बदल, बदलती जीवनशैली व अन्य कारणांनी नपुंसकत्वासारखे धोके, जीवघेण्या आजारांवरील लस, अंतराळस्वारीची स्वप्ने, अंतराळातील पोटपूजा अशा बऱ्याच नव्या गोष्टींची ओळख या सायन्स काँग्रेसने करून दिली.

राेजच्या बातम्यांनी सामान्यांचे जगणे जितके भयप्रद व संकटग्रस्त वाटते तितके ते नाही किंवा भविष्यात तरी ते तसे असणार नाही, याची खात्री देणारे हे प्रयोग व्याख्याने, परिसंवाद व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या हजारोंना भावले. गेल्या काही वर्षांमधील ही अधिवेशने अवैज्ञानिक गोष्टींसाठीच गाजली. कुणी महाभारतकाळात दूरचित्रवाणीच्या गप्पा हाणल्या, कुणी गणेशाचा जन्म हाच मुळी विश्वातली पहिली प्लास्टिक सर्जरी होती, असे सांगितले. असे काही चित्र- विचित्र नागपूरमधून बाहेर गेले नाही. त्याचे कारण, या ना त्या कारणांनी राजकीय मंडळी आली नाहीत.

बऱ्यापैकी शुद्ध वैज्ञानिक चर्चा अनुभवता आली. महिला सशक्तीकरणातून शाश्वत विकास हे नागपूरच्या सायन्स काँग्रेसचे सूत्र होते. सोबत शेतकरी व आदिवासींच्या जगण्यातील विज्ञानही जोडले गेले. तथापि, बीजमाता, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची उपस्थिती सोडली तर या तिन्ही घटकांच्या जगण्यातील, भावविश्वातील विज्ञानाचे पापुद्रे फारसे उलगडले नाहीत. उलट,  अधिवेशनाला महिलांची गर्दी व्हावी म्हणून हळदी-कुंकू व संक्रांतीच्या तोंडावर तीळगूळ वाटप झाले. आयोजकांपैकी एका विदुषींनी घरासमोरची रांगोळी वैज्ञानिकदृष्ट्या कशी शुभ असते, यावर तारे तोडल्याने माध्यमांना चटपटीत बातम्या मिळाल्या. बाकी या सायन्स काँग्रेसचे आयोजन मात्र दर्जाला साजेसे झाले नाही. सगळीकडे सावळागोंधळ होता.

विद्यापीठ परिसरात आलेल्या प्रत्येकाची ससेहोलपट होत होती. अर्थात, ही टीका करतानाच विद्यापीठाच्या अडचणीही समजून घ्यायला हव्यात. पहिली बाब म्हणजे हे एक आपत्कालीन आयोजन होते. दरवर्षी जानेवारी महिन्यात ३ तारखेला ही काँग्रेस सुरू होते आणि समारोपावेळी ७ तारखेला पुढच्या स्थळाची घोषणा होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे आयोजन झाले नाही. त्याआधीची काँग्रेस बंगळुरू येथे जानेवारी २०२१ मध्ये झाली; परंतु, पुढचे ठिकाण ठरले नाही. आताही ते ठरलेले नाही. गेल्या ऑगस्ट महिन्यात नागपूर विद्यापीठाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे आयोजन नागपूरकडे आले. तयारीला चार-पाच महिनेच मिळाले. शिरस्त्याप्रमाणे उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे ते आले नाहीत. या आठवड्यातील बहुतेक कार्यक्रम त्यांनी आभासी पद्धतीने केले.

पंतप्रधान येणार म्हणून भव्य शामियाना उभारण्यात आला होता. काही परिसंवादांवेळी रिकामा दिसला तो हाच मंडप. १९७४ नंतर प्रथमच नागपूरमध्ये सायन्स काँग्रेस झाली. अशा मोठ्या आयोजनाची विद्यापीठाची पाच दशकांमधील पहिलीच वेळ. काही निमंत्रितांनी पाठ फिरवली तरी किमान निमंत्रित विमानतळ, रेल्वेस्थानकापासून मुक्कामाच्या ठिकाणी सहज पोचतील, नोंदणी, व्याख्याने, प्रदर्शन, भोजनकक्ष अशा ठिकाणी त्यांना कमीतकमी त्रास होईल, रोजच्या कार्यक्रमांची आगाऊ माहिती, त्यातील बदल तातडीने कळतील, अशी व्यवस्था करणे शंभर वर्षे जुन्या विद्यापीठाला अशक्य नव्हते; पण ते झाले नाही हे मात्र खरे! हे नियोजनातले गालबोट सोडले, तर या इंडियन सायन्स काँग्रेसने भविष्याची उमेद तेवढी दिली!

Web Title: Described as a gathering of scientists, scholars, researchers, the Indian Science Congress was held in Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर