दिल्लीचा वावर वाढला..
By Admin | Updated: November 1, 2014 00:14 IST2014-11-01T00:14:06+5:302014-11-01T00:14:06+5:30
महाराष्ट्रातील शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात दिल्लीचा वावर अधिक वाढणार आहे. त्याची बीजे देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपूर्व राजधानी दौ:यात रोवली गेली.
दिल्लीचा वावर वाढला..
महाराष्ट्रातील शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात दिल्लीचा वावर अधिक वाढणार आहे. त्याची बीजे देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपूर्व राजधानी दौ:यात रोवली गेली. संघाला कितीही शिवसेना आपली आहे, असे वाटत असले, तरी त्यांच्याशी संग कसा धरायचा याच्या सूचना दिल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी जसा कारभार राजधानीचा हाकतात, तसाच कारभार आता फडणवीस महाराष्ट्राचा चालवतील, अशीच चिन्हे आहेत. केंद्रात सत्ता आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या मागेमागे धावत आहे, तेच चित्र राज्यात आहे. शरद पवार यापूर्वी एवढे अगतिक नव्हते. आपल्या 4क् वर्षाच्या राजकीय जीवनात जातीय शक्तींशी कधीच सोबत केली नाही, असे निवडणूक निकालाच्या एक दिवसआधी सांगणारे पवार विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच भाजपाला विनाअट पाठिंबा द्यायला तयार झाले. याचे कारण लोकांना ठावूक आहे.
शिवसेना आता भाजपाला नकोशी झाली आहे. त्याला राजकीय कारणो अनेक असली, शिवसेनेच्याही कैक चुका झाल्या आहेत. आपणच सत्तेत येऊ, असा त्यांच्या नेत्यांचा उन्माद जागोजाग दिसून आलेला असला, तरी सत्तेचा सोपान दिसताच सेनेला बाजूला सारण्याची त:हा लोकांना आवडलेली नाही. शिवसेनेने प्रचारात मोदींना लक्ष्य करून त्यांच्यावर असभ्य शाब्दिक प्रहार केले किंवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर ‘शहा’णा हो! म्हणत ठाकरी कोटय़ा केल्या. मोदी व शहा यांना ते रूचले नाही. काही वर्षापूर्वी शिवसेनेने सुषमा स्वराज यांना पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती ठरवले होते. तर अगदी अलीकडे राजनाथसिंग यांच्याशीच चर्चा करू, असे बोलून सेनानेत्यांनी प्रदेशातील भाजपा नेते आपल्या खिजगणतीतही नसल्याचे दाखवले होते. हे मोदी व शहा यांना पटलेले नाही. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना भाजपाचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठविण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय तर भाजपा नेत्यांचा वर्मी लागला आहे. 11, अशोक रोड या भाजपाच्या मुख्यालयातील बदलत्या राजकारणाची यथा:स्थिती मातोश्रीवर पोहोचविण्यात शिवसेनेचे दिल्लीतील दूत म्हणा किंवा हेर कमी पडले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वत:च्या बलबुत्यावर भक्कम यश संपादन केले, शिवसेनाप्रमुखांनंतर पक्षसंघटना बळकट झाली, हे मात्र विधानसभेच्या निकालाने दाखवून दिले.
मोदींनी महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भेटीला बोलविले होते. चहापान घेताघेता त्यांनी एकेकाची कार्यपद्धती, शैली आणि खासदार झाल्यानंतर त्याने लोकहिताची काय कामे केली, पक्षाच्या फायदा-तोटय़ाची कुंडली मांडली. मोदींचे बाण एवढे लक्ष्यवेधी होते, की बैठकीतून बाहेर पडलेले खासदार रक्तबंबाळ झाले होते. आठवडाभर अनेकांच्या चेह:यावर रौनक नव्हती. मोदींनी या खासदारांना विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार कसा विजयी होईल, कुठे कस लागेल याबाबत काही ठोकताळे दिले होते. केंद्रातील मंत्री त्यासाठी कशी मदत करतील. कोणत्या मतदारसंघात आपण अशक्त आहोत, ते सांगितले होते आणि खासदारांनी वर्तणूक कशी ठेवायची, याचा सल्ला दिला होता.एवढय़ावरच मोदीसरांचा क्लास संपला नाही, तर माध्यमांपुढे काहीच बोलायचे नाही, हेही त्यांनी निक्षुण सांगितले होते. मोदींनी विधानसभा निवडणूक अशी ‘मनावर’ घेतली होती. खासदारांचा मोदीवर्ग होण्यापूर्वी एकच दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांना मोदींनी बोलवून घेतले होते. दोन तास त्यांची बैठक झाली होती. भेटीचे तपशील फुटले नाहीत, पण प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण त्यांना भेटलो होतो, असे नंतर फडणवीस म्हणाले होते, पण पूर्णसत्य- खासदारांच्या मोदीवर्गात दडलेले होते.!!
मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या या आखणीपासून शिवसेना कोसोदूर होती. अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा पहिला मुंबई दौरा त्यांनी मातोश्रीला टाळून आखला, यामागची कुटनीती माध्यमांना कळली, पण शिवसेनेला ती समजली नाही की समजूनही त्यांनी लक्ष दिले नाही, हे कळत नाही.
याउलट पवारांनी मात्र काळाची पावले ओळखली. भाजपा दूर ढकलण्याचा आव आणते, तरी पवार मात्र आम्ही सोबतच आहोत, हे आवजरून सांगतात. विनाशर्त पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करतात, लोकहितासाठी अल्पमतातील सरकार शाबूत राहावे म्हणून मतदानाच्या वेळी सभात्याग करण्याची रणनीती ते जाहीर करून मोकळे होतात. एरवी दारबंद राजकारण खेळणारे पवार या वेळी उघडय़ावरच पत्ते फेकत आहेत आणि तेसुद्ध भाजपाच्या खेळीआधी, हा खेळ सोपा नक्कीच नाही.
लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे तख्त शिवसेनेने राखले असले तरी, त्यांतरच्या सा:याच घडामोडींना शिवसेना अधिक जबाबदार आहे. नेमकी भूमिका घेतली जात नसल्याने या पक्षाने आत्मविश्वास गमावला काय, अशी चर्चा राजधानीत आहे. शिवसेना नेतृत्वाला निश्चित करावे लागेल त्यांना विरोधी बाकावर बसायचे आहे, की सत्तेची मलाई खायची आहे. सत्तेतील शिरकावासाठी काही अटी असतात, त्या शिवसेनेला पाळाव्या लागतील.
रघुनाथ पांडे
विशेष प्रतिनिधी
लोकमत समूह, नवी दिल्ली