संरक्षण सिद्धतेचे महासागरी बिगुल!

By Admin | Updated: February 7, 2016 02:14 IST2016-02-07T02:14:13+5:302016-02-07T02:14:13+5:30

थरारक हवाई आणि सागरी कसरती करणारे जवान, खोल समुद्रात आपल्या विशाल अस्तित्वाची साक्ष देत कलात्मकपणे उभ्या असलेल्या युद्धनौका किंवा रात्रीच्या वेळी दिव्यांच्या रोशणाईने

Defense trump card! | संरक्षण सिद्धतेचे महासागरी बिगुल!

संरक्षण सिद्धतेचे महासागरी बिगुल!

( विशेष)
- गौरीशंकर घाळे

थरारक हवाई आणि सागरी कसरती करणारे जवान, खोल समुद्रात आपल्या विशाल अस्तित्वाची साक्ष देत कलात्मकपणे उभ्या असलेल्या युद्धनौका किंवा रात्रीच्या वेळी दिव्यांच्या रोशणाईने झळाळून निघालेल्या युद्धनौकांच्या छायाचित्रांची सध्या सोशल मीडियावर धूम आहे. भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ताफा संचलनाच्या (आयएफआर) निमित्ताने सध्या सोशल मीडियावर भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची चुणूक पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम् येथे भारतीय नौदलाच्या वतीने आयएफआर-२०१६चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती हे आपल्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख असतात. राष्ट्रपतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नौदलाच्या वतीने नौदल ताफा संचलनाचे आयोजन केले जाते. भारतीय नौदलाच्या ताफ्यात असणाऱ्या प्रमुख युद्धनौका, पाणबुड्या, वेगवान गस्तीनौका या संचलनात सहभागी होतात. यापैकी एका नौकेला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा मान मिळतो. याच युद्धनौकेवरून राष्ट्रपती संचलनाचे निरीक्षण करतात आणि अभिवादन स्वीकारतात. खोल समुद्रात चार-पाच रांगांमध्ये ओळीने उभ्या असणाऱ्या युद्धनौकांच्या मधून मोठ्या दिमाखात राष्ट्रपतींची नौका पुढे जाते. राष्ट्रपतींची नौका समोर येताच युद्धनौकेचे नेतृत्व करणारा कॅप्टन कडक सॅल्यूट करतो तर अन्य जवान आपली नौदलाची टोपी समोर धरून राष्ट्रपतींना अभिवादन करतात. सुमारे तीन तासांच्या निरीक्षणानंतर राष्ट्रपतींचे भाषण होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरने युद्धनौकेवरून उड्डाण भरताच सोहळा संपतो.
१९५३ साली पहिल्यांदा नौदलाने ताफा संचलनाचे आयोजन केले होते. यंदा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या ताफा संचलनात भारतासह जगभरातील अनेक नौदलांच्या युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी झाल्या आहेत. यापूर्वी २००१ साली भारताने पहिले आंतरराष्ट्रीय ताफा संचलन केले होते. मुंबईनजीक अरबी समुद्रातील त्या संचलनानंतर आता १५ वर्षांनी भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे मुख्यालय व तळ असणाऱ्या विशाखापट्टणम् येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ताफा संचलनाचे आयोजन केले आहे.
विशाखापट्टणम् येथील संचलनात अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, ओमान, श्रीलंका, बांगलादेश, ब्राझील, मालदीव, मॉरिशस व आॅस्ट्रेलियासह तब्बल ५०हून अधिक देशांच्या १३० युद्धनौका व २० हजारांहून अधिक नौसैनिक, अधिकाऱ्यांचा ताफा सहभागी झाला आहे. आयएफआरचे आयोजन ही कोणत्याही राज्यासाठी सन्मानाची बाब असते. विशाखापट्टणम् येथील या संचलनासाठी आंध्र प्रदेश सरकारनेही मोठ्या प्रमाणावर तयारी केली. यासाठी विशेष आयएफआर नगरीही उभारण्यात आली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंह्मन व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या नगरीचे उद्घाटन करण्यात आले. तर, आयएनएस सत्वाहन येथील कमांड स्टेडियमवरील रंगारंग सोहळ्याने या जागतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. तब्बल ११ हजार पे्रक्षकांच्या साक्षीने देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रदर्शन केले. भारतीय नौदलासह विविध यंत्रणांच्या अहोरात्र प्रयत्नातून, कष्टातून आयएफआर-१६चे सफल आयोजन शक्य झाले. आंतरराष्ट्रीय ताफा संचलनासारखा प्रचंड व्यापाचा, जिकिरीचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि तितक्याच काटेकोर अंमलबजावणीशिवाय पार पडणे शक्य नाही. भारतीय नौदलाने याबाबत आपले संस्थात्मक श्रेष्ठत्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. या सोहळ्याने जगभरातील बलाढ्य नौदलांच्या युद्धनौका पूर्व किनाऱ्यावर जमतात ही बाब देशाच्या संरक्षण सिद्धतेवरील एक प्रकारचे शिक्कामोर्तबच असल्याचे सिद्ध करते. अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागराने भारतीय भूभाग वेढला आहे.

जगातील बहुतांश व्यापार अरबी व हिंद महासागरातून होतो. या क्षेत्रात भारताचे वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणूनच आवश्यक बनून जाते. एकीकडे स्वत:चा वचक निर्माण करतानाच जागतिक शांतता, सद्भाव, परस्पर सहकार्य व वैश्विक मूल्यांप्रति भारताची बांधिलकी अधोरेखित करणारा हा सोहळा आहे. ‘महासागरातून एकात्मता’ हे आयएफआर-१६चे बोधवाक्य त्यासाठी
यथार्थ म्हणावे लागेल.

संरक्षणाबाबत अधिकाधिक स्वयंपूर्ण होण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे विशाखापट्टणम् येथे संरक्षणविषयक मेक इन इंडिया प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले. भारतीय बनावटीच्या, स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित संरक्षणविषयक बाबींचे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले.

जगातील बहुतांश व्यापार अरबी आणि हिंद महासागरातून होतो. या क्षेत्रात भारताचे वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणूनच आवश्यक बनून जाते. वैश्विक मूल्यांप्रति भारताची बांधिलकी अधोरेखित करणारा हा सोहळा आहे. ‘महासागरातून एकात्मता’ हे आयएफआर-१६चे बोधवाक्य त्यासाठी यथार्थ म्हणावे लागेल.

‘सुमित्रा’ला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा मान
भारतीय नौदलाच्या ताफ्यातील आयएनएस सुमित्रा, आयएनएस सुमेधा, आयएनएस शरयू, आयएनएस सुनयना या चार अतिवेगवान गस्तीनौकांचा ताफा राष्ट्रपतींसाठी सुसज्ज करण्यात आला. यापैकी ‘आयएनएस सुमित्रा’ला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा सन्मान मिळाला. या युद्धनौकेवरूनच राष्ट्रपतींनी मानवंदना स्वीकारली.

विराट व विक्रमादित्य प्रथमच एकत्र
आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विराट या भारताच्या दोन्ही अजस्र विमानवाहू युद्धनौका आयएफआरच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आल्या. याशिवाय कोलकाता वर्गातील स्टेल्थ विनाशिका, दिल्ली वर्गातील विनाशिका, स्टेल्थ फ्रिगेटस्, मिसाइल कॉर्व्हेट्स, पाणबुडीविरोधी युद्धनौका, शार्दूल वर्गातील युद्धनौकांबरोबरच किलो व सिंधुघोष वर्गातील पाणबुड्यांनी भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व केले.

Web Title: Defense trump card!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.