भ्रष्ट व्यवस्थेने चालविलेला सुंदर गोव्याचा ऱ्हास!
By Admin | Updated: April 29, 2016 05:40 IST2016-04-29T05:40:52+5:302016-04-29T05:40:52+5:30
गोवा हे भारतातले सर्वात लहान राज्य असले तरी कथा-किस्से यांनी भरलेले आहे.

भ्रष्ट व्यवस्थेने चालविलेला सुंदर गोव्याचा ऱ्हास!
गोवा हे भारतातले सर्वात लहान राज्य असले तरी कथा-किस्से यांनी भरलेले आहे. ओतप्रोत निसर्गसौंदर्य, पारंपरिक घरे, कलात्मकतेने सजलेले चर्च, लोकांनी जपलेली कला व संगीत या गोष्टींमुळे गोव्याकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षित होत असतात. पण गोव्याला एक काळी बाजू सुद्धा आहे. इथले समुद्र किनारे सोडले तर इतर भागात एकीकडे भूमाफिया गोंधळ घालत असतात तर दुसरीकडे खाण व्यवसायातील लोक पूर्व सीमेवरील दाट जंगलांचा ऱ्हास करीत आहेत.
हार्टमन डिसोजा यांच्या ‘ईट डस्ट’ या पुस्तकात त्यांनी अवैध आाण अनियंत्रित खाण व्यवसायामुळे गोव्यातले डोंगर, जंगले, नद्या आणि झरे कसे प्रभावित होत आहेत याचे विस्तृत विवेचन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या अवैध खाणकामामुळे इथल्या ग्रामीण भागाची सामाजिक वीण उसवली जात असून इथली हवा प्रदूषित होत चालली आहे. याच्या माध्यमातून कमालीचा राजकीय व आर्थिक भ्रष्टाचार सुरु आहे. या पुस्तकानुसार साठ आणि सत्तरच्या दशकात गोव्यातील खाणी मुख्यत: चार कुटुंबांच्या हातात होत्या. पण जसजसा व्यवसाय वाढू लागला तसतसे मालकीहक्कसुद्धा वाढू लागले. कालांतराने खाण मालकांना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून अभय लाभू लागले. राजकारण्यांनी मग खाण मालक, स्थानिक लोक व सरकारी अधिकारी यांच्यात प्रदूषणाच्या मुद्यावरुन होणाऱ्या वादात लक्ष घालायला सुरुवात केली व बदल्यात व्यक्तिगत स्तरावर तसेच पक्षांसाठी देणग्या स्वीकारु लागले. राज्यातील नेत्यांना यात दिल्लीतील सर्वपक्षीय राजकारण्यांचा पाठिंबा मिळू लागला. खाण मालकांना पर्यावरणसंबंधीच्या सरकारी आडकाठीचा सामना करावा लागू नये याचीच केवळ काळजी राष्ट्रीय नेते वाहू लागले. एकदा तर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने अवघ्या एका तासात गोव्यातील १५० प्रकल्पांना मंजुरी दिली.
अलीकडेच मी गोव्याला भेट दिली. मला वास्तव जाणून घ्यायचे होते. सुरुवातील मी राज्याच्या उत्तर भागातील सेंट इस्टव्हम बेटावर गेलो. तेथील एक ख्रिस्ती धर्मगुरू फादर बिस्मार्क डायस यांनी इथल्या वादग्रस्त विकास प्रकल्पांविरोधात मोठा लढा उभारला होता. या प्रकल्पांमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि नवीन विमानतळाचा समावेश होता. बिस्मार्क यांनी चर्चच्या मालकीच्या जागेच्या विक्री व्यवहारालाही प्रखर विरोध केला होता. त्यापायी त्यांना बिशपपदावरून हटवण्यातही आले. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ते दोन दिवस बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा कुजलेला देह मांडवी नदीत सापडला होता. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटलो. मला जाणवले की, बिस्मार्क यांच्या मृत्युनंतरही त्यांनी सुरु केलेल्या चळवळीची धार कमी झालेली नाही. फादर बिस्मार्क उत्तम गीतकार-संगीतकार होते. संगीताच्या माध्यमातून ते स्थानिकांना त्यांच्या जमिनींच्या, जंगलांच्या संरक्षणासाठी व जगण्याच्या हक्कासाठी प्रेरित करीत असत. ते राहत असलेल्या भागात त्यांची छायाचित्रे असलेले अनेक फलक लावले गेले असून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे.
सेंट इस्टव्हमवरुन मी दक्षिण-पूर्व भागातील कावरम नावाच्या छोट्या खेड्यात पोहोचलो. शेती आणि जंगलांनी वेढलेल्या या गावात रवींद्र वेळीप नावाचा तरुण कार्यकर्ता राहतो. तो नेहमीच अवैध खाणींच्या विरोधात उभा राहिला आहे. मागील महिन्यात त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून व तोंडात बोळा कोंबून त्याला अमानुष मारहाण केली गेली. त्यात अनेक ठिकाणी अस्थिभंगही झाला. मारहाणीत तो कदाचित मारलाही गेला असता पण सुदैवाने त्याच्या आरोळ्या सोबतच्या कोठडीतील लोकांनी ऐकल्या व तो बचावला. मात्र लोक गोळा होण्याआधीच हल्लेखोर पसार झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक पोलिसांनी या जीवघेण्या हल्ल्याची साधी तक्रार घेण्यासही नकार दिला. मी कावरमला जाऊन रवींद्रला भेटलो. त्याचा एक हात गळ्यात अडकवलेला होता. गावकऱ्यांच्या मते, खाणकाम इतके महत्वाचे असेल तर त्यात स्थानिक सहकारी संस्थांना सामील करावे जेणे करून या संस्था पर्यावरणाची पुरेशी काळजी घेतील.
त्या नंतर मी खाणींच्या क्षेत्राला भेट दिली. तेथील चित्र सुन्न करणारे होते. डोंगराशेजारची जमीन अक्षरश: उकरून काढण्यात आली होती. मातीमुळे सर्व जिवंत झरे आणि तळी बुजलेली होती. एकेकाळी हिरवाईने नटणाऱ्या व भरपूर पाऊस असलेल्या या भागातील पाणी आता खाणींमुळे इतके प्रदूषित झाले आहे की शेतकऱ्यांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. सामाजिक पातळीवर सुद्धा असेच अडथळे आणले जात असून खाण मालकांनी आंदोलनकर्त्यांना दडपण्यासाठी गुंड बाळगले आहेत. प्रशासन सुद्धा फोडा आणि राज्य करा या धर्तीवर ठराविक स्थानिक लोकांना माल वाहून नेण्याचे ठेके देत आहेत व त्यातून चिरीमिरी मिळवत आहे. २०१० मध्ये जेव्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी इथल्या अवैध खाण व्यवसायाची पोल खोलली होती तेव्हा गोवा सरकारने न्यायमूर्ती एम. बी. शाह आयोगाची नियुक्ती केली होती. आयोगाच्याही हे निदर्शनास आले होते की खाण माफियांनी जंगल, वन्यजीव आणि प्रदूषणविषयक कायद्यांचे उल्लंघन केले आहे. आयोगाच्या अंदाजानुसार अवैध खाणींमुळे सरकारी खजिन्याचे ३५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आयोगाच्या शिफारसी आणि जनतेचा विरोध लक्षात घेऊन सप्टेंबर २०१२ पासून राज्यातील सर्व खाणी बंद करण्यात आल्या होत्या. पण दुर्दैवाने गोवा सरकारने नुकतीच खाणींना पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. काही पाहण्यांमधून हे स्पष्ट झाले आहे की खाणींमुळे फक्त मालकांनाच प्रचंड फायदा झाला आहे पण त्यातून स्थानिकांना मिळणारा रोजगार मात्र अल्पकाळ असतो. परिणामी यातून स्थानिक अर्थकारण व सामाजिक समन्वय प्रभावित होत आहे. पर्यावरणावर होणारे परिणाम तर भीषण असून त्यातून होणारे नुकसान निश्चितच अब्जावधी रुपयांचे आहे.
फादर बिस्मार्क आणि रवींद्र वेळीप यांच्यावरचे हल्ले नवे नाहीत कारण त्यापूर्वी सुद्धा खाण माफियांनी सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. खाण माफियांचे संबंध राजकारण्यांमध्ये, पोलिसात, प्रशासनात आणि माध्यमात फार घनिष्ट आहेत. गोव्याचे अर्थकारण आणि तिथली राजकीय व्यवस्था हितसंबंध व भ्रष्टाचारावर आधारलेली आहे. पर्यटकांना याविषयी काही माहीत नसले वा माहीत असूनही त्यांना त्याविषयी काही वाटत नसले तरी गोव्यात आज बरेच मोठे काही बिघडलेले आहे.
रामचन्द्र गुहा
(ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)