गोरगरिबांहाती शिक्षणाचे शस्त्र देणारे दत्ताभाऊ
By विजय दर्डा | Updated: March 24, 2026 04:44 IST2026-03-24T04:44:41+5:302026-03-24T04:44:58+5:30
दत्ताभाऊंनी लहानपणी, तरुणपणात गरिबी भोगली होती. नंतर गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मागे भक्कम उभे राहून त्यांनी दातृत्वाचा आदर्श निर्माण केला.

गोरगरिबांहाती शिक्षणाचे शस्त्र देणारे दत्ताभाऊ
डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
सिंगापूरचे अब्जाधीश व्यावसायिक दादी बलसारा एकदा मला दिल्लीत भेटले. त्यांनी चाैकशी केली, ‘अहो, ते आमचे दत्ता मेघे कुठे आहेत?’ दत्ताभाऊ तेव्हा महाराष्ट्रात मंत्री होते. इतके मोठे व्यावसायिक राज्याच्या मंत्र्यांची चाैकशी करताहेत हे पाहून मी कुतूहलापोटी विचारले, ‘तुमचा व दत्ता मेघे यांचा कसा संबंध?’ तेव्हा बलसारा म्हणाले, ‘आम्ही दोघे इन्शुरन्स एजन्सीचे काम एकत्र करायचो आणि त्या कामासाठी भाड्याच्या सायकलवर नागपुरात एकत्र फिरायचो.’ कठीण काळात सोबत असलेल्या या जुन्या मित्राला भेटायची बलसारा यांची इच्छा होती. मी त्या दोघांची भेट घडवून आणली. बलसारा त्यांच्या जेटने नागपूरला आले. अनेक वर्षांनंतर दोघे भेटले. दादी बलसारा बोलके तर दत्ताभाऊ मोजकेच बोलणारे. बलसारा यांच्या अंगावरील किमती सूट व दत्ताभाऊंच्या अंगावरील खादीचा शुभ्र पेहराव यावरून दोघांची थोडी थट्टामस्करीही झाली.
आमदार-मंत्री, लोकसभा व राज्यसभेचे सदस्य, शिक्षण संस्थाचालक, सावंगी मेघे येथील मेडिकल काॅलेज, मुंबईत इंजिनअरिंग काॅलेज असे वैभव कमावलेल्या दत्ताभाऊंनी लहानपणी, तरुणपणात गरिबी भोगली होती. दादी बलसारा हा त्या गरिबीचा वैभवशाली संदर्भ. गरिबीची जाणीव व गरिबांबद्दलची कणव, कळकळ दत्ता मेघे यांनी आयुष्यभर जपली. सामान्य लोकांचे उत्थान केवळ शिक्षणानेच होऊ शकते, हे ओळखून त्यांनी शिक्षण संस्था काढल्या, यशस्वीपणे चालवल्या. केजीपासून पीजीपर्यंतचे शिक्षण गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेले. आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभे केले. हे सारे करताना गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवला.ते उदार वृत्तीचे. दातृत्वाचा, दानशूरपणाचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला.
हजारो, लाखो माणसांना आधार दिला. अडल्यानडलेल्यांना मदत केली. मदत मागण्यासाठी त्यांच्याकडे आलेले कोणीही कधी रिकाम्या हाताने परत जायचे नाही. तथापि, उण्यापुऱ्या ९० वर्षांच्या आयुष्यातील पूर्वार्धातील त्या गरिबीचे त्यांनी कधी भांडवल केले नाही. खानदानी आयुष्य जगले. ते आणि मी अनेक वर्षे राज्यसभेत एकत्र होतो. ‘७, गुरूद्वारा, रकबगंज, नवी दिल्ली’ या पत्त्यावर ते, मी, मुकेश पटेल एकत्र राहायचो. हे पूर्वी राम मनोहर लोहिया यांचे निवासस्थान होते. मुकेश पटेल शिवसेनेचे, दत्ताभाऊ राष्ट्रवादीचे तर मी अपक्ष राज्यसभा खासदार. नंतर राष्ट्रपतीनियुक्त थोर अभिनेते दिलीप कुमार हेदेखील सोबत राहायला आले. या वास्तव्यात दत्ताभाऊंचे ॲरिस्टोक्रॅट राहणीमान मी जवळून पाहिले. गज्जू नावाचा तरुण सहकारी त्यांचे सगळे काम पाहायचा. गज्जू नसताना दत्ताभाऊंची तारांबळ उडायची. आम्ही मग प्रेमाने त्यांची मजा घ्यायचो.
दत्ताभाऊ व माझा स्नेह राज्यसभेपुरता नव्हता. ‘लोकमत’ नागपूरमधून निघू लागल्यानंतर वर्षभरापासूनच ते नियमित, अगदी रोज किंवा एक दिवसाआड ‘लोकमत’ कार्यालयात यायचे. तेव्हाचे आमचे मुख्य बातमीदार दत्ता कवीश्वर यांच्याकडे बसायचे. अनेकवेळा मला किंवा बाबूजी जवाहरलाल दर्डा यांना भेटायचे. बाबूजींनी सावंगी मेघे येथे मेडिकल काॅलेज दिले, संस्थांना खूप मदत केली, याचा कृतज्ञतेने उल्लेख करायचे. या संस्था दत्ताभाऊंनी पोटच्या मुलासारख्या जपल्या. त्यासाठी राजकीय तडजोड करावी लागली तर ती खुलेपणाने केली. त्याबद्दल कोणताही अपराधभाव कधी मनात बाळगला नाही. काँग्रेस फुटली व दत्ताभाऊ शरद पवार यांच्यासोबत गेले. त्याबद्दल विचारले. ते स्पष्टपणे म्हणाले, संस्थांसाठी. एकदा माझ्यासमक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनीही विचारले, तेव्हाही त्यांनी तसेच उत्तर दिले. मला त्यांच्या या प्रामाणिकपणाचे काैतुक वाटायचे.
‘स्वतंत्र विदर्भ’ हा आमच्या दोघांसारखा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. वसंतराव साठे, एनकेपी साळवे, नासिकराव तिरपुडे, बाबूजी जवाहरलाल दर्डा, रिखबचंद शर्मा, भोलासिंग नाईक, दत्ता मेघे, रणजितबाबू देशमुख, हरीभाऊ नाईक असे अनेक दिग्गज नेते स्वतंत्र विदर्भ या एका धाग्यात गुंफले गेले होते. जांबूवंतराव धोटे हेदेखील कट्टर विदर्भवादी. पण, ते वेगळ्या प्रवाहातले. या सगळ्यांच्या रेट्यामुळे विदर्भ राज्याची मागणी ऐरणीवर आली होती. श्यामाचरण व विद्याचरण शुक्ला या बंधूंची इच्छा होती की, छत्तीसगड जोडून घेऊन विदर्भाचे राज्य व्हावे. पण, नोव्हेंबर २००० मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड या तीन नव्या राज्यांची घोषणा केली. तेव्हा मी राज्यसभेत अडवाणींना उद्देशून म्हणालो, ‘ज्यांनी राज्य मागितले नाही, त्यांना तुम्ही दिले आणि राज्याचा दर्जा गमावलेले आम्ही सतत मागणी करत आहोत, तरी तुम्ही ते नाकारता.’
दत्ताभाऊ अखेरपर्यंत विदर्भवादी राहिले. त्यांनी त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व राजकीय कार्यक्षेत्र विदर्भ हेच ठेवले. संस्था जपल्या, मोठ्या केल्या. साम्राज्य उभे केले. सागर व समीर ही दोन्ही मुले कर्तबगार निघाली. स्मिता व संगीता या मुलींनीही नाव काढले. मुलांच्या कर्तबगारीबद्दल दत्ताभाऊंना अभिमान वाटायचा. मुलांनी संस्था आणखी मोठ्या केल्याचे समाधान ते बोलून दाखवायचे. पण, इतके करूनही ते लाैकिकार्थाने शिक्षण संस्थाचालक बनले नाहीत. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणापासून ते अनेक मुले-मुली दत्तक घेण्यापर्यंत या संस्थांचा लाभ गरजूंनाच मिळेल, याची त्यांनी सतत काळजी घेतली. म्हणूनच अखेरपर्यंत लोकप्रिय राहिले. आयुष्यभर त्यांनी तळागाळातील माणसांचाच विचार केला. विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना मंत्रिपद किंवा नागपूर, रामटेक व वर्धा या तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमधून विजय हे सारे त्यांना साधता आले. गरिबांशी नाळ जुळलेला असा कर्तबगार विदर्भपुत्र आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!