‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:42 AM2023-12-06T05:42:35+5:302023-12-06T05:43:34+5:30

या वादळाने चेन्नईसारख्या महानगराला चोवीस तासांत ३०० मिलीमीटर पावसाने धुऊन काढले. इतक्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने चेन्नई शहराला महापुराचे स्वरूप आले होते.

Cyclone Michaung has hit four districts including the coastal city of Chennai in Tamil Nadu | ‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही

‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही

मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर हवामानातील बदलाचा वेग वाढल्याची चाहूल म्हणजे मिचाँग चक्रीवादळ आहे. त्याचा सर्वांत मोठा तडाखा तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावरील चेन्नई शहरासह चार जिल्ह्यांना बसला आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनोत्तर चक्रीवादळ निर्माण होण्याची जणू परंपराच आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या प्रदेश किनारपट्टीवर कमीअधिक प्रमाणात या वादळांचा तडाखा बसतो. गेल्या चार-पाच वर्षांत वेगाने होत असलेल्या हवामान बदलाने मान्सूनपूर्वदेखील चक्रीवादळ निर्माण होत आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मान्सून वाऱ्यामध्ये अडथळे निर्माण करणारे बिपरजॉय वादळ मागील एप्रिलमध्ये आले होते. परिणामी गुजरात आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला होता. आता निर्माण झालेले मिचाँग वादळदेखील हवामान बदलाचा परिणाम आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

या वादळाने चेन्नईसारख्या महानगराला चोवीस तासांत ३०० मिलीमीटर पावसाने धुऊन काढले. इतक्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने चेन्नई शहराला महापुराचे स्वरूप आले होते. विमानतळावर तसे फारसे अडथळे नसतात. मात्र चेन्नईच्या विमानतळावर चार-पाच फूट पाणी साचून राहिले होते. शहरातील सखल भागात दहा-दहा फूट पाणी वाहत होते. मिचाँग वादळाने चेंगरूपर, कांचीपुरम, तिरुवल्लूर तसेच मच्छलीपट्टणम् जिल्ह्यांना मोठा फटका बसला. चेन्नई शहरासह  या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठा बंद पडल्या. इंटरनेट सेवा बंद झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. मिचाँग वादळ चेन्नईपासून १०० किलोमीटरवर असले तरी ताशी ९० किलोमीटरने वाहणाऱ्या वाऱ्याने दाणादाण उडवून टाकली आहे. पुढे हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेशकडे वळले असून, त्याचा फटका किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना बसतो आहे. पुढे ओडिशापर्यंत ते जाऊन धडकेल असा अंदाज आहे.

ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात सर्व जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अद्याप तरी तामिळनाडूलाच फटका बसला असला आणि चक्रीवादळाचा जोर कमी नसल्याने बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण किनारपट्टीला धोका आहे. या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील हवामान ढगाळ बनले आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाचा अपवाद वगळता पाऊस पडेल असे वाटत नाही. तो पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान करून जाणार आहे. मिचाँग चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही दोन दिवस राहण्याची तसेच ते तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या आंध्र प्रदेशातील अमरावती विभागाने व्यक्त केली आहे. हवामान बदलाचे संकेत भारतासारख्या उपखंडाला वारंवार मिळत आहेत. अरबी समुद्राच्या तटावरील मुंबईसारख्या महानगरात किंवा पूर्वेकडील चेन्नई, विशाखापट्टणम्, कोलकाता आदी महानगरात अतिदक्षता घेण्याची गरज आहे.

चेन्नई शहराला २०१५ मध्ये मान्सूनोत्तर चक्रीवादळाने तडाखा दिला होता. सुमारे चारशे मिलीमीटर पाऊस दोन दिवसांत झाला होता. चेन्नई शहराच्या विस्तारित भागातील पाणी वाहून नेणारे ओढे, नाले आणि छोट्या नद्या अदृश्य केल्याचे परिणाम काय असू शकतात. याचा स्पष्ट संकेत त्यावेळी निसर्गाने दिला होता. तरीदेखील आपण शहाणे होत नाही. निसर्गाने वारंवार इशारे देऊनदेखील त्याची नोंद घेत नाही. युरोपात उन्हाळ्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाणे किंवा टांझानियासारख्या आफ्रिका खंडातील देशाला प्रचंड वादळी पावसाने धुऊन काढणे, ही कशाची लक्षणे आहेत? संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी विकसित राष्ट्रांनी निधी दिला असला आणि त्याच्या परिणामांचे विश्लेषण केले असले तरी त्यांची नोंद घेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी आता परवडणारी नाही.

हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देणारी पायाभूत सुविधा विकसित करण्याची तयारी महानगरांना तरी करावी लागणार आहे. आपल्या देशाच्या किनारपट्टीवर आठ-दहाच मोठी शहरे आहेत. त्यांचे नियोजन सुधारावे लागणार आहे. मागील मान्सूनच्या पावसाने हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमची हालत कशी झाली होती याचा अनुभव आपण घेतला आहे. हवामानातील या सर्व बदलांचा होणाऱ्या परिणामांचा अंदाज बांधण्यासाठी रडारसारख्या व्यवस्थेने देशाची इंच न इंच जागा नजरेखाली आणावी लागेल. त्या व्यवस्थेतून मिळणाऱ्या धोक्याच्या माहितीच्या आधारे सर्व प्रकारच्या व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांना तोंड कसे देता येईल, याचा अचूक अंदाज बांधावा लागेल तरच आपण होऊ घातलेले नुकसान टाळू शकू. 

Web Title: Cyclone Michaung has hit four districts including the coastal city of Chennai in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.