कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले

Who Is Sanjiv Goenka : लखनौच्या दारूण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोएंका चांगलेच संतापले.

बुधवारी सनरायझर्स हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान हैदराबादने १० गडी राखून विजय साकारला. पाहुण्या लखनौने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सलामी जोडी पाहुण्यांना भारी पडली.

अवघ्या ९.४ षटकांत लक्ष्य गाठून पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील संघाने मोठा विजय मिळवला. खरे तर आयपीएलमध्ये १०० हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सर्वात कमी षटकांत आव्हान गाठणारा हैदराबाद हा पहिला संघ ठरला आहे.

लखनौच्या दारूण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोएंका हताश दिसले. त्यांनी सामना संपताच कर्णधार लोकेश राहुलवर राग काढल्याचे पाहायला मिळाले. लखनौ सुपर जायंट्सच्या मानहानीकारक पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका प्रचंड (LSG owner Sanjiv Goenka) नाराज दिसले आणि ते सामन्यानंतर रागात कर्णधार लोकेश राहुलशी चर्चा करताना दिसले.

लखनौच्या गोलंदाजांची धुलाई होताना कॅमेरा जेव्हा जेव्हा गोएंका यांच्याकडे वळला, तेव्हा ते संतापलेले, हतबल झालेले दिसले आणि सामन्यानंतर ते लोकेश राहुलसोबत बोलतानाही रागात असल्याचे फोटोतून अंदाज बांधला जात आहे.

संजीव गोएंका हे देशातील नामांकित उद्योगपती असून, त्यांची कंपनी RPSG ने ऑक्टोबर २०२१ मध्ये सात हजार नव्वद कोटी रूपयांची बोली लावून आयपीएलचा संघ खरेदी केला. लखनौने आयपीएलच्या आपल्या पदार्पणाच्या हंगामात (२०२२) प्रभावी कामगिरी केली होती. यंदा हा संघ आपला तिसरा हंगाम खेळत आहे.

गोएंका हे क्रिकेटशिवाय सहा मोठ्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय करतात. RPSG संजीव गोएंका समूह प्रामुख्याने पॉवर आणि नैसर्गिक संसाधने, मीडिया आणि मनोरंजन, शिक्षण आणि आयटी, सारेगामा इंडिया आणि फिलिप्स कार्बन ब्लॅक या सहा विशिष्ट क्षेत्रात आघाडीवर आहे.

RPSG या उद्योग समूहामुळे ५० हजारहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्याकडे ४.३ बिलियन अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे. त्यांच्याकडे त्यांच्या या समूहाचे लाखो शेअरहोल्डर्सही आहेत.

६० वर्षीय गोएंका RP समूहाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी आयआयटी खडगपूर येथे बॉर्ड ऑफ गव्हर्नर म्हणून सेवा दिली आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य म्हणून कारभार पाहिला आहे.

दरम्यान, गोएंका समूह आयपीएलमध्ये आपली दुसरी इनिंग खेळत आहेत. यापूर्वी त्यांनी या स्पर्धेत दोन वर्षांसाठी एन्ट्री घेतली होती. २०१६ आणि १०१७ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर फिक्सिंगमुळे बंदीची कारवाई करण्यात आली होती.

तेव्हा संजीव गोएंका यांनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स या नावाचा संघ मैदानात उतरवला होता. या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टीव्ह स्मिथ यांसारख्या दिग्गज खेळाडूंची फळी होती. तेव्हा पुण्याशिवाय गुजरात लायन्स हा देखील संघ होता.