जगण्याच्या संघर्षातील करुण कथांची निष्ठूर मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:15 AM2020-06-03T06:15:43+5:302020-06-03T06:17:03+5:30

आजच्या आपल्या समाजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की, येथे आता समाजसेवा करणे ही एक ‘फॅशन’ झाली आहे.

A cruel series of tragic stories of the struggle for survival | जगण्याच्या संघर्षातील करुण कथांची निष्ठूर मालिका

जगण्याच्या संघर्षातील करुण कथांची निष्ठूर मालिका

Next

- सविता देव हरकरे । उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर
रेल्वेस्थानकावर मृतावस्थेत पडलेली एक माता आणि तिच्या अंगावरील चादरीशी खेळणारे तिचे अवघ्या दोन वर्षांचे बाळ. आपली आई आता या जगात नाही, ती कधीच उठून आपल्याला पोटाशी घेणार नाही, लाडवणार नाही, याची पुसटशीही कल्पना नसलेले निष्पाप, आपल्या आईला जागे करण्याचा प्रयत्न करणारे. मृत्यूलाही लाज वाटावी असे हे बिहारच्या मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावरील हृदय हेलावून टाकणारे दृश्य. कोरोना महामारीचे तांडव आणि त्यानंतरच्या टाळेबंदीमध्ये देशभरात स्थलांतरित मजुरांच्या जगण्याच्या संघर्षात जी करुण कथांची निष्ठूर मालिका सुरू झाली ती अद्यापही थांबायला तयार नाही.


महासत्ता बनू पाहणाऱ्या या देशाची लक्तरे आणखी किती दिवस अशी वेशीवर टांगली जाणार कुणास ठाऊक. ही दुर्दैवी मृत महिला कामगारांसाठीच्या विशेष गाडीतून प्रवास करीत होती. गुजरातेतून ती गाडीत बसली होती आणि मुझफ्फरपूरला उतरली. चार दिवस खाण्या-पिण्याची सोय न झाल्याने तिचा मृत्यू ओढवल्याची माहिती आहे. सोशल मीडियात आणि वृत्तवाहिन्यांवर या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये तिच्या मुलाला मदतीसाठी चढाओढ सुरू झाली. तिच्या मृत्यूचे राजकारण होऊ लागले. प्रत्येक नेता आपली पोळी भाजून घेण्याच्या मागे लागला. असंवेदनशीलतेचा कळस त्यांनी गाठला. उपासमारीमुळे तिचा मृत्यू झालेला नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न यांच्यापैकी काहींनी केला. देशातील या महास्थलांतराच्या काळात महिला आणि मुलाबाळांना अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत. हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही. भरल्या दिवसाच्या माता पायीच स्वगृहाच्या प्रवासाला निघाल्या. मार्गातच कुठेतरी बाळंत झाल्या आणि अवघ्या दोन-तीन तासांची उसंत घेऊन या ओल्या बाळंतीणी पुढल्या प्रवासाला निघाल्याचे धक्कादायक प्रकार घडले. ११ वर्षांची बालमजूर मुलगी रस्त्यातच मृत्युमुखी पडली, तर १५ वर्षांच्या ज्योतीकुमारीला अपघातात जखमी पित्याला घेऊन १२०० कि.मी.चा सायकल प्रवास करावा लागला. तिच्या या धाडसाचे कौतुक व्हायला लागले तेव्हा नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली. हे कौतुक नसून तिच्या गरिबीची थट्टा उडविली जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते.


आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक नियम शिथिल करण्यात आले असले, तरी स्थलातरितांच्या हालअपेष्टा काही संपलेल्या नाहीत. जगण्यासाठीच्या या संघर्षात किती लोकांना प्राण गमवावे लागले याचा नेमका आकडा सांगता येणार नाही. अक्षरश: जीवावर उदार होऊन मजुरांचे लोंढे स्वगृहाच्या वाटेवर निघाले आहेत; पण त्यांच्या या परिस्थितीसाठी केवळ कोरोना महामारीला दोषी धरून चालणार नाही, तर या देशातील विषम आर्थिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. कारण अशी माणुसकीला काळिमा फासणारी दृश्ये भारतवंशासाठी नवखी नक्कीच नाहीत. ओडिशातील गरीब, लाचार आदिवासी दाना मांझीला त्याच्या पत्नीचा मृतदेह एक-दोन नाही तर १२ किलोमीटर खांद्यावर वाहून नेताना आपण बघितलाय. मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी किंवा ठेल्याची व्यवस्था करण्यासाठीचेही पैसे त्याच्याकडे नव्हते आणि रुग्णालय एवढे असंवेदनशील की त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची माणुसकीही दाखवली नाही.


एका पित्याला आपल्या तरुण मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठी भीक मागावी लागते. तापाने फणफणणारा मुलगा उपचाराअभावी पित्याच्या खांद्यावरच प्राण सोडतो आणि सरपण गोळा करणाºया महिलेवर अंत्यसंस्कारासाठी लाकडे न मिळाल्याने तिचा पती कचºयाच्या ढिगाºयावरच अंत्यसंस्कार करतो. येथे अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह मांडीवर ठेवून आईला रात्रभर शववाहिकेची प्रतीक्षा करावी लागते. तरीही आपण जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्न बघतोय. येथील एकतृतियांश लोक अजूनही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. त्यांच्यावरील गरिबीचा शाप कुठलेही सरकार दूर करू शकलेले नाही. लोकशाही ही या देशाच्या सामाजिक व्यवस्थेची बळकट बाजू असली तरी स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही येथील राजकारण आणि संसाधने मात्र मूठभर श्रीमंतांच्याच हाती राहिली. चंद्रावर जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाºया या देशात असंख्य लोकांना दिवसातून दोन वेळ साधी भाकरीही नशिबी येत नाही, हे वास्तव कसे नाकारता येणार? श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखी गरीब. म्हणायला कल्याणकारी योजनांची संख्या भरमसाट वाढतेय; पण तळापर्यंत त्याचा लाभ किती पोहोचतो?


आजच्या आपल्या समाजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की, येथे आता समाजसेवा करणे ही एक ‘फॅशन’ झाली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात समाजसेवकांचे जे पीक उगवले आहे, त्यापैकी किती सच्चे आणि किती खोटे अथवा प्रसिद्धीच्या
झोतात राहण्याकरिता मदतीचा आव आणणारे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यामुळे देशात घडणाºया अशा घटना म्हणजे भारतीय लोकशाही आणि समाजाच्या बोथट झालेल्या संवेदनाच म्हणाव्या लागतील.

Web Title: A cruel series of tragic stories of the struggle for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.