शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोटातल्या आगीतून घडणारे गुन्हे..

By किरण अग्रवाल | Updated: February 10, 2022 07:00 IST

Editors view :पोटच्या गोळ्याला विकण्यासारखी निर्दयता, भावनाहीनता आकारास येण्यामागील समाजशास्त्रीय कारणांचा कायद्याच्या पलीकडे जाऊन शोध वा अभ्यास होणे यानिमित्ताने गरजेचे ठरते.

- किरण अग्रवाल

भावनांशी संवेदना निगडित असतात, त्यांना हळवेपणाचा किंवा अलवारतेचा पदर लाभलेला असतो, त्यामुळे त्यात तडजोडीचा विचार करता येऊ नये, हे खरेच; परंतु जेव्हा परिस्थिती बिकट बनून जाते, तेव्हा संवेदनांचा बाजार मांडला जातोच, शिवाय भावना काखोटीस मारून व्यवहाराचे सौदे केले जातात. असे प्रकार कारुण्य, कणव जागवणारे असतात, तसेच शोचनीय व दुर्दैवी म्हणवणारेही असतात; परंतु ते रोखणे अवघड असते, कारण त्यास कायद्याच्या चौकटीत मोडणाऱ्या गुन्हेगारीकरणाखेरीज दारिद्र्यातून आकारास आलेल्या मजबुरीसारखे इतर अनेक पदर लाभलेले असतात. रुपया-पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री करण्याचे जे प्रकार अलीकडच्या काळात वाढलेले दिसत आहेत, त्याकडेही याच दृष्टिकोनातून पाहता येणारे आहे. या प्रकारांचे समर्थन कुणीही करणार नाही; परंतु समाजाच्या आर्थिक व मानसिक अवनतीच्या संदर्भाने त्याचा विचार होणे गरजेचे ठरावे.

 

एकीकडे अपत्यप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या दाम्पत्यांची वैद्यकीय प्रगत तंत्र असणाऱ्यांच्या दारी गर्दी वाढत असताना दुसरीकडे आहेत ती अपत्ये चक्क पैशांच्या मोबदल्यात विकून टाकण्याचे प्रकारही वाढीस लागलेले दिसत आहेत. अलीकडेच पुण्यातील कोथरूडच्या एका मुलाला एक लाख रुपयात पनवेलच्या दाम्पत्यास विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईच्या नेरुळमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. तेथे तर एकाच दाम्पत्याने आपली तीन अपत्ये विक्री केल्याचे समोर आले होते. सातारा, नांदेड, डोंबिवली, बुलडाणा जिल्ह्यांतील देऊळगाव राजा आदी ठिकाणीही असे प्रकार घडले असून, गुन्हे दाखल आहेत. मानवी तस्करीचे हे प्रकार भावना गोठवणारेच असून, पोटच्या मुलांची विक्री करणाऱ्या मात्या-पित्यास त्याचे काही एक वाटत नसावे काय? असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित करणारेही ठरावेत. भावभावना किंवा संवेदनांचा संबंध या प्रकरणांतून पणास लागून जातो तो म्हणूनच.

 

अपत्याला पैशाच्या मोबदल्यात विकल्याबद्दल ‘माता न तू वैरीणी...’ म्हणून संबंधित मातांकडे पाहिले जाते; मात्र दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेली कुटुंबे यात जेव्हा आढळून येतात, तेव्हा गुन्हेगारीच्या चौकटी पलीकडील सामाजिक, आर्थिक विपन्नावस्थेच्या विदारकतेची वास्तविकता समोर येऊन जाते, जी संवेदनशील मनांना अस्वस्थ करून गेल्याखेरीज राहत नाही. अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या वर्गाची अगतिकता यात असते, तशी किमान दुसऱ्या घरात गेल्यावर पोटच्या पिलाला दोनवेळचे जेवण मिळून त्याचे आयुष्य सुधारण्याची संबंधितांची आसही असते. या दोन्ही घटकांची परस्परपूरक गरज हेरून मध्यस्थ लाभ उठवतात. वंशाला दिवा असावा म्हणून मुलगा असण्याची एक मानसिकता आपल्याकडे अजूनही आहे, त्यातूनही काही प्रकार घडून येतात. नातेसंबंधातील अगर अनाथ मुले दत्तक घेण्याचा अधिकृत मार्ग आहे; परंतु शॉर्टकटच्या नादात बुद्धी गहाण पडते.

 

महत्त्वाचे म्हणजे, पोटच्या मुलांची विक्री करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलेल्या दाम्पत्यांची मानसिकता किंवा त्यामागील गरज अभ्यासणे गरजेचे आहे. यातील अनेकांची अवस्था उपासमारीशी निगडित आढळते. आपल्याकडे म्हणजे भारतात ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनामुळे तर त्यात भरच पडली आहे. यासंदर्भात जागतिक भूकनिर्देशांक बघता भारताचा नंबर ११६ देशांच्या यादीत १०१ व्या क्रमांकावर घसरला आहे. २०२० या वर्षात तो ९४व्या स्थानी होता. ‘भुखे पेट भजन ना होय’ असे नेहमी म्हटले जाते. पोटातली आग स्वस्थ बसू देत नाही. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पोषण मिशन- २ ची घोषणा केली; पण त्यासाठी तरतूद कमी आहे. तेव्हा दोनवेळच्या अन्नासाठी वंचित राहणारा जो घटक आहे त्याची आर्थिक व मानसिक मजबुरी टाळण्यासाठी काही करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. पोटच्या गोळ्याला विकण्यासारखी निर्दयता, भावनाहीनता आकारास येण्यामागील समाजशास्त्रीय कारणांचा कायद्याच्या पलीकडे जाऊन शोध वा अभ्यास होणे यानिमित्ताने गरजेचे ठरते.