क्रिकेट व ‘राष्ट्रप्रेम’ यांची फारकत करावीच लागेल
By Admin | Updated: April 4, 2015 00:32 IST2015-04-04T00:32:23+5:302015-04-04T00:32:23+5:30
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्याच्या पूर्वसंध्येला मी असे ट्विट केले होते की, ‘हृदय भारतासोबत आणि डोकं आॅस्ट्रेलियासोबत’, मिनिटभराच्या अंतरात

क्रिकेट व ‘राष्ट्रप्रेम’ यांची फारकत करावीच लागेल
राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्याच्या पूर्वसंध्येला मी असे ट्विट केले होते की, ‘हृदय भारतासोबत आणि डोकं आॅस्ट्रेलियासोबत’, मिनिटभराच्या अंतरात माझ्या ट्विटर खात्यावर लक्ष ठेवून असणारे लोक माझ्यावर रागावले. आॅस्ट्रेलियाचा संघ भारताच्या संघापेक्षा उत्कृष्ट आहे, हे सुचवून मी काहीतरी राष्ट्रविरोधी करतोय असा त्यांचा आक्षेप असावा. पण त्यांना आव्हान देण्यापेक्षा त्यांची क्रिकेटवेडाने झपाटलेली राष्ट्रभक्ती देत बसण्यापेक्षा त्यांची मानसिकता जाणून घ्यायला हवी. स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क मिळालेली दूरचित्रवाहिनी ‘वी वोन्ट गिव्ह इट बॅक’ (आम्ही ही संधी घालवणार नाही)चा अव्याहत घोष करीत होती, तर इतर खासगी वृत्तवाहिन्या ‘चॅम्पियन फिर से’ असे म्हणत भारताचा संघच विश्वचषकाचा पुन्हा विजेता होणार असा अंदाज बांधत होत्या. या सर्व वातावरणात माझे ट्विट राष्ट्रीय भावनेच्या विरोधात असल्याचे मानले जाऊन मला तसे अनेकांकडून सांगितलेही गेले.
जेव्हा धोनीच्या संघाला त्याच्यापेक्षा सरस अशा आॅस्ट्रेलियाच्या संघाने हरवले तेव्हा क्रिकेटप्रेमी, सोशल मीडियावरचे लोक आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रभक्तीचे अवाजवी प्रदर्शन केले. आपल्या संघाने सलग सात सामने जिंकले आहेत आणि आधी बांधलेल्या अंदाजाला खोटे ठरवत या स्पर्धेत फार पुढचा टप्पा गाठला आहे, हे सत्य ते पटकन विसरले होते. संघातल्या सर्वच खेळाडूंनी विदेशातल्या मैदानावर लाज घालवली असा आरोप सर्व बाजूंनी सुरू झाला. खेळातले कौशल्य, लोकप्रियता आणि आर्थिक संपन्नता या बाबींमुळे हे सगळे खेळाडू राष्ट्रीय नायक झाले होते, पण ते अल्पावधीतच रोषाचे धनी झाले. मागील वर्षी टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेनंतर युवराज सिंगच्या घरावर हल्ला झाला होता!
ट्विटरवरील देशभक्तांना कुणी ना कुणी शत्रू हवा असतो. त्यांना यावेळी तो सापडला अनुष्का शर्माच्या रूपात. तिचा गुन्हा इतकाच होता, की तिच्या प्रियकराचा, विराट कोहलीचा खेळ बघण्यासाठी सिडनीला पोहोचली होती. चुकीचा फटका मारताना कोहली एका धावेवर बाद झाला आणि तेवढेच कारण पुरेसे ठरले. अनुष्काच्या उपस्थितीमुळे कोहलीची एकाग्रता भंग पावली असा शोध लावला गेला. हीच अनुष्का जेव्हा कसोटी सामन्यांच्यावेळी प्रेक्षकात उपस्थित होती तेव्हा विराटने मोठी धावसंख्या उभी केली होती. तेव्हां ती सुदैवी ठरली होती!
विश्वचषक स्पर्धेच्या दोन महिन्यांच्या काळात संपूर्ण देश क्रिकेटवेडाच्या उन्मादात होता. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर सर्व देशाच्या अपेक्षा उंचावल्या गेल्या होत्या. अगदी पंतप्रधानांपासून तर पॉप-गायकापर्यंत सगळेच संघाचा उत्साह वाढवत होते. कारण प्रत्येकालाच भारताच्या विजयाची खात्री वाटत होती. एशिया-पॅसिफिक देशांमधील अनिवासी भारतीय सामन्यांना उपस्थित राहून संघाला प्रोत्साहन देत होते. त्यांची ‘भारतमाता की जय’ ही घोषणा राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन करीत होती तर भारतीय प्रेक्षक तिरंगी झेंडे फडकवून वातावरण तयार करत होते.
क्रीडा स्पर्धांमधले राष्ट्रप्रेम तसे नेहमीच काही अनिष्ट नसते. चीनने आॅलिम्पिक स्पर्धांमधील यशाच्या माध्यमातून या स्पर्धेतील पाश्चिमात्य वर्चस्वासमोर आव्हान उभे केले आहे. अमेरिकाही क्रीडा स्पर्धांकडे आपली विश्वासू प्रतिमा उभी करण्याचे साधन म्हणून बघते. आपण मात्र तसे एकाच म्हणजे क्रिकेटच्या खेळावर प्रेम करणारे राष्ट्र आहोत.
आपला देश क्रि केटचा निस्सीम चाहता आहे. परंतु भारत म्हणजे क्रिकेटचे हक्काचे घर असे मानणे वेगळे आणि विश्वचषकाचे सामने भारत विरुद्ध संपूर्ण जग असे मानणे वेगळे. ‘मौका मौका’, ही जाहिरात आकर्षक आणि यशस्वी झालीच होती. पण आपला संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचताच या जाहिरातीवरून असे वातावरण तयार झाले, की ही जाहिरात विश्वचषकाविषयी नसून ती विश्व विरुद्ध भारत यासाठीच आहे. भारतीय संघातले खेळाडू सगळी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेच चित्र या जाहिरातीवरून तयार झाले होते. ‘वी वोन्ट गिव्ह इट बॅक’ या जाहिरातीत तर संघातल्या खेळाडूंना योद्ध्याच्या रूपात उभे करण्यात आले होते, त्यांच्या पोलादी चिलखतावरून आणि क्रुद्ध चेहऱ्यावरून ते क्रिकेटियरपेक्षा रणांगणावर जाणारे योद्धेच जास्त भासत होते.
जेव्हा क्रि केटचा सामना हा शस्त्ररहीत लढाई बनतो, तेव्हा त्यात कुणीतरी एक जग जिंकायला निघाल्याच्या आविर्भावात असतो. साहजिकच यातील विजय उन्मादाची तर पराभव शरमेची बाब ठरत असतो. त्यामुळे खेळाडूंनी २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि तत्सम घटकांच्या तालावर नाचावे अशी अपेक्षा करणे चुकीचे असते. यातून निर्माण होणारा दबाव स्पर्धेतली उत्कंठा कदाचित वाढवतही असेल, पण खेळाडूंना योद्धे म्हणून उभे करणे म्हणजे त्यांच्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादणे ठरते.
आपल्याला आता क्रिकेट आणि तथाकथित राष्ट्रप्रेम यातले बंध तोडावे लागतील. भारतीय संघाचे मनोधैर्र्य वाढवले पाहिजे, त्यांच्या यशाचे कौतुक करताना, अभिमानाने तिरंगा फडकविणे, हे तर केलेच पाहिजे पण त्याच्या जोडीला वास्तव स्वीकारण्याची सवयदेखील केली पाहिजे. पराभूत होणे ही राष्ट्रीय खेदाची बाब न मानता, पुढील सामन्यात अधिक चांगला खेळ करून दाखविण्याचे ते आव्हान समजले पाहिजे. अयशस्वी कृषी धोरणांमुळे या देशात होत असलेल्या शेतकऱ्यांंच्या आत्महत्त्या हा खरा राष्ट्रीय खेदाचा विषय ठरला पाहिजे.
ताजा कलम : विश्वचषक स्पर्धा संपताच आता सगळे क्रिकेटजगत आयपीएलच्या प्रांतात शिरेल. विश्वचषकांच्या सामन्यांच्या वेळचे क्रिकेटमधील राष्ट्रप्रेम कट्टर राष्ट्रवादाच्या पातळीवर जाणारे असेल तर आता होणाऱ्या स्पर्धेतील मालकी तत्त्वावरील संघातले सामने व्यापारी वृत्तीचे प्रदर्शन करत क्रि केट मधली काळी बाजू दाखवतील. तिथे केवळ पैसाच इतरांना आपल्या तालावर नाचवेल. विजय मल्ल्या किंगफिशरमधील आपल्या वैमानिकांना आणि कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नसला तरी, तो क्रि केट खेळाडूंवर आणि त्यांच्या २० षटकांच्या खेळावर प्रचंड पैसा खर्च करील.