नरेंद्र मोदीपंतप्रधान
शंभर वर्षांपूर्वी विजयादशमीच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्या त्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनव्या स्वरूपांमध्ये राष्ट्रभावना वेळोवेळी प्रकट होते, त्याचेच हे प्रत्यंतर होते. देशसेवेच्या निश्चयाला वाहून घेतलेल्या कोट्यवधी स्वयंसेवकांना शुभेच्छा आणि संघाचे संस्थापक परम पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या चरणी श्रद्धांजली.
विशाल नद्यांच्या किनाऱ्यांवर मानवी संस्कृतीची जोपासना व्हावी, त्याच पद्धतीने संघाच्या आधाराने शेकडो आयुष्ये फुलली-फळली. एक नदी ज्या ज्या मार्गांवरून वाहते त्या क्षेत्रांना स्वतःच्या पाण्याने समृद्ध करत जाते, तसेच संघाने या देशातील प्रत्येक भागाला, समाजाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. संघाच्या वेगवेगळ्या संस्था जीवनाच्या प्रत्येक पैलूशी स्वतःला जोडून घेऊन देशाची सेवा करतात. शिक्षण, कृषी, समाज कल्याण, आदिवासी कल्याण आणि महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये संघ अविरतपणे कार्य करत आला आहे. उद्देश आणि भावना एकच - देश सर्वप्रथम!
स्थापनेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश घडवण्याचे उद्दिष्ट निश्चित करून वाटचाल केली. व्यक्तीच्या घडणीतून राष्ट्रउभारणीचा मार्ग निवडला आणि त्यासाठी सुरू झाल्या संघ-शाखा ! संघाच्या शाखेचे मैदान, ही एक प्रेरणादायक भूमी आहे. प्रत्येक स्वयंसेवकाचा ‘अहम् पासून वयम्’च्या दिशेने प्रवास शाखेतूनच सुरू होतो. देश उभारणीचा उद्देश, व्यक्ती घडवण्याचा सुस्पष्ट मार्ग आणि शाखेसारखी अत्यंत सोपी, सजीव कार्यपद्धत हेच घटक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आधारस्तंभ बनले. याच स्तंभांवर पाय घट्ट रोवून संघाने लाखो स्वयंसेवक घडवले आहेत. संघासाठी देश हेच प्राधान्य राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यात संघाने असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे रक्षण केले आहे, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे.
स्वातंत्र्यानंतरही, संघ राष्ट्रसाधनेत अखंड झटत राहिला. या प्रवासादरम्यान, संघाविरुद्ध कट कारस्थाने रचण्यात आली, संघाला नामशेष करण्याचे प्रयत्न करण्यात आले. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या परमपूज्य गुरुजींना खोट्या खटल्यात अडकवण्यात आले. परंतु संघाच्या स्वयंसेवकांनी कधीही कटुता येऊ दिली नाही. कारण त्यांची भावना होती की आपण समाजापासून वेगळे नाही; समाज आपल्यापासून तर बनलेला आहे. समाजाशी एकरूपता आणि घटनात्मक संस्थांवरील विश्वास यामुळे संघाचे स्वयंसेवक प्रत्येक संकटात स्थितप्रज्ञ राहिले. समाजाप्रति संवेदनशील राहिले.
सेवाकार्यात संघाचे पाऊल सदैव पुढे राहिले. वेदनेमुळे लाखो कुटुंबे बेघर झाली तेव्हा स्वयंसेवकांनी निर्वासितांची सेवा केली. प्रत्येक आपत्तीमध्ये, संघाचे स्वयंसेवक आपल्या मर्यादित साधनसंपत्तीसह सर्वात पुढे उभे राहिले. स्वतः त्रास सोसून इतरांचे दुःख निवारण करणे ही प्रत्येक स्वयंसेवकाची ओळख आहे. आजही, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक सर्वात आधी पोहोचणाऱ्यांपैकी एक असतात.
आपल्या १०० वर्षांच्या प्रवासात, संघाने समाजातील विविध घटकांमध्ये स्वाभिमान जागवला. संघ अनेक दशकांपासून आदिवासी परंपरा, आदिवासी रीतिरिवाज, आदिवासी मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात योगदान देत आहे. आज, सेवा भारती, विद्या भारती, एकल विद्यालय आणि वनवासी कल्याण आश्रम आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाचे आधारस्तंभ म्हणून उदयाला आले आहेत.
प्रत्येक सरसंघचालकाने, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आहे. परमपूज्य गुरुजींनी ‘न हिंदू पतितो भवेत’ या भावनेला सातत्याने प्रोत्साहन दिले. पूज्य बाळासाहेब देवरस म्हणायचे, ‘जर अस्पृश्यता हे पाप नसेल तर जगात कोणतेही पाप नाही!’ पूज्य रज्जूभय्याजी आणि पूज्य सुदर्शनजी यांनीदेखील ही भावना पुढे नेली. विद्यमान सरसंघचालक आदरणीय मोहन भागवतजी यांनीही समरसतेसाठी समाजासमोर ‘एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशानभूमी’चे स्पष्ट ध्येय ठेवले आहे.
संघ अस्तित्वात आला त्या काळातील गरजा आणि संघर्ष वेगळे होते. परंतु आज १०० वर्षांनंतर काळाची आव्हाने अतिशय वेगळी आहेत, संघर्ष वेगळे आहेत.
इतर देशांवरील आर्थिक अवलंबित्व, आपली एकता तोडण्याची कटकारस्थाने या आव्हानांचे आपले सरकार वेगाने निराकरण करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक ठोस पथदर्शी आराखडा बनवला आहे. आत्मबोध, सामाजिक समरसता, कौटुंबिक प्रबोधन, नागरी शिष्टाचार आणि पर्यावरण हे पाच संकल्प अर्थात संघाचे पंच परिवर्तन ही प्रत्येक स्वयंसेवकासाठी एक विशाल प्रेरणा आहे.
आत्मबोधाच्या भावनेचा उद्देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वतःला मुक्त करणे आणि स्वतःच्या वारशाचा अभिमान बाळगणे, स्वदेशीचा मूलभूत संकल्प पुढे नेणे. सामाजिक समरसतेतून वंचितांना प्राधान्य देऊन सामाजिक न्याय स्थापित करणे ही प्रतिज्ञा आहे. कौटुंबिक प्रबोधनाच्या माध्यमातून आपण कुटुंब संस्कृती आणि मूल्येदेखील मजबूत केली पाहिजेत. प्रत्येक नागरिकामध्ये नागरी कर्तव्याची भावना जागृत केली पाहिजे. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करून भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे.
२०४७च्या विकसित भारतासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान राष्ट्राला ऊर्जा आणि प्रेरणा देईल. पुन्हा एकदा, प्रत्येक स्वयंसेवकाला मन:पूर्वक शुभेच्छा !
Web Summary : PM Modi hails RSS's century of nation-building. From its inception, the Sangh has worked to shape individuals, fostering national unity and service across various sectors, embodying the principle of 'Nation First.'
Web Summary : पीएम मोदी ने आरएसएस के राष्ट्र निर्माण के शताब्दी वर्ष की सराहना की। संघ ने व्यक्तियों को आकार देने, राष्ट्रीय एकता और विभिन्न क्षेत्रों में सेवा को बढ़ावा देने का काम किया है, जो 'राष्ट्र सर्वप्रथम' के सिद्धांत का प्रतीक है।