सरकारमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांच्या चांगल्या-वाईट परिणामांची पूर्ण कल्पना सरकारी यंत्रणेला असते. अनेकदा अशी कल्पना अनुभवातून येते. अनेकदा ती त्या त्या विभागाच्या परंपरांमधून येते. आपल्याकडे अशा परंपरा उज्ज्वलही आहेत आणि भ्रष्ट मानसिकता दाखवणाºयाही आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाºया नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायजिंग अॅथॉरिटी (एनपीपीए) या संस्थेचे आणि राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांचे वागणे पाहून दुसºया परंपरेची आठवण झाली. या परंपरेत काम करणाºया अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणाºया मास्कच्या बाबतीत घेतलेले निर्णय संशयांच्या चौकटीत आले आहेत. मास्क बनविणाºया कंपन्यांनी संगनमत करून सकृतदर्शनी मोठ्या प्रमाणात नफेखोरी केल्याचे दिसत आहे. डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी, पोलीस असे अनेक पातळीवर लोक जीव धोक्यात घालून काम करत असताना या कंपन्यांनी स्वत:च्या तोंडालाच नव्हे, तर सद्सद्विवेक बुद्धीलाही मास्क लावून सरकारची आणि जनतेची दिवसाढवळ्या लूट सुरू केली आहे.हा सगळा प्रकार मृतदेहाच्या टाळूवरचे खाण्याचा आहे. ‘एन ९५’ मास्क राज्य सरकारच्या हाफकिन संस्थेने १७ रुपये ३३ पैशांना घेतला, तोच मास्क या कंपन्यांनी ४२ रुपयांपासून २३० रुपयांपर्यंत महाराष्टÑात विविध सरकारी पातळीवर विकण्याचे काम केले. या काळात एकाही अधिकाºयास आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे याचे भान राहिले नाही. काळाबाजार, साठेबाजी आणि अवास्तव किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘एन ९५’, ‘ट्रीपल’ आणि ‘डबल लेअर’ हे तीन मास्क तसेच सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तू व सेवा कायद्यात आणले. या कायद्यात आणलेल्या वस्तूच्या किमती वाढविता येत नाहीत. दरम्यान, मास्कची किमान किंमत १७ रुपयांवरून थेट ९५ रुपयांपर्यंत नेण्यात आली. त्यानंतर मास्कच्या किंमत आणि उपलब्धतेबद्दल तक्रारी राहिलेल्या नाहीत, असे कारण देत केंद्र सरकारने हे मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तू व सेवा कायद्यातून काढूनही टाकले. आता या कंपन्या मास्कच्या किमती ९५ रुपयांपेक्षा जास्त करायला मोकळ्या झाल्या आहेत. ही उघडउघड दरोडेखोरी आहे. महामारीत अडलेल्यांची केलेली लूटमार आहे.
coronavirus: राज्यात सुरू असलेली मास्कच्या खरेदीतील लूटमार थांबवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 04:30 IST