गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईतील सायन आणि केईएम हॉस्पिटलचा विषय भलताच गाजत आहे. एकाच खाटावर दोन-दोन रुग्ण इथंपासून ते मृतदेहाच्या गराड्यातही रुग्ण, अशी अनेक धक्कादायक दृश्ये सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती. इतके दिवस इटली-स्पेनमधील कोरोनाशी संबंधित मृतदेहांची अवस्था दूरस्थपणे पाहणारा मराठी माणूस आता आपल्याच भागातील रुग्णालयांची विचित्र परिस्थिती अनुभवताना मात्र पूर्णपणे हादरला. ज्यांना क्वारंटाईन होण्याची गरज आहे, ते तर सोडाच, अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्णही अशा रुग्णालयात दाखल होण्यासाठी प्रचंड घाबरू लागले. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील दृश्यांची कारणमीमांसा मात्र केली गेली नाही. केवळ एकच वाईट बाजू सातत्याने पुढे आणली गेली, याबद्दल खंत व्यक्त करणारी एक ठाम भूमिका एका वरिष्ठ परिचारिकेने जाहीरपणे मांडली. खरेतर लोकांचे गैरसमज दूर करण्याचे जे काम सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे, तीच जबाबदारी एका परिचारिकेने स्वत:हून पेलली. आता असे का घडले, या प्रश्नाचे उत्तर केवळ एकाच शब्दात मिळू शकते. कारण ती परिचारिका आहे.कोणत्याही संकटाशी सामना करणारी आणि युद्धाच्या काळात पळ न काढता जबाबदारी स्वीकारणारी ती परिचारिका आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभर कोरोनाविरोधात जणू सामाजिक युद्ध पुकारले गेले. पोलीस, सरकारी डॉक्टर्स, परिचारिका आणि जनतेला अत्यावश्यक सेवा देणाºया घटकांनी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम सुरू ठेवले. कोरोनाच्या तिसºया टप्प्यात रुग्णांची संख्या कैकपटीने वाढत चालल्याने सरकारी रुग्णालयातील यंत्रणा तोकडी पडत चालली आहे. अशावेळी सर्वच खासगी डॉक्टरांनी स्वत:हून पुढे येऊन या यंत्रणेला साथ द्यावी, अशी अपेक्षाही सरकारने वारंवार व्यक्त केली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर कामाच्या तुलनेत कमी पगारावर काम करणा-या परिचारिकांची सेवा समाजासाठी खरोखरच आदर्शवत ठरली आहे. देशभरात कोरोनाची लागण झालेल्या घटकांमध्ये परिचारिकांची संख्या अधिक असली तरी मृत्यूच्या भीतीवर मात करीत त्या आजही अत्यंत निडरपणे आणि मोठ्या धाडसाने आपली ड्यूटी चोखपणे बजाविताना दिसतात.
coronavirus: रुग्णसेवेत गुंतलेल्या परिचारिकांमधील ममत्वाला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:05 IST