Coronavirus : तळीरामांच्या तहानेचे तर्कट!

By किरण अग्रवाल | Published: April 16, 2020 07:26 AM2020-04-16T07:26:46+5:302020-04-16T07:30:47+5:30

Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटकाळातून बाहेर पडल्यावर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकेल याच्या चर्चा होत आहेत; पण त्यानंतरच्या शक्यतांऐवजी आताच जे परिणाम दिसून येत आहेत त्यात तळीरामांनी चालविलेल्या चोऱ्या-लुटीच्या घटनांची आवर्जून दखल घेता यावी.

Coronavirus liquor shops closed due to corona lockdown | Coronavirus : तळीरामांच्या तहानेचे तर्कट!

Coronavirus : तळीरामांच्या तहानेचे तर्कट!

Next

किरण अग्रवाल

आपत्तीतही संधीचा शोध घेण्यासाठी दांडगी इच्छाशक्ती व चौकस असणे गरजेचे असते. इच्छा ही शोधाला प्रोत्साहित करते तर चौकसपणामुळे संधीच्या जवळ जाता येते. हे सारे जुळून येते तेव्हा उद्दिष्ट साध्य झाल्याखेरीज राहात नाही. सध्याच्या ‘कोरोना’च्या आपत्ती काळात सर्वत्र भीतिदायक व ‘लॉकडाउन’ची स्थिती असली तरी, गरजूंनी आपापल्या गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठीचे मार्ग शोधून ठेवल्याचे दिसून येणे स्वाभाविक आहे. ते मार्ग वैध की अवैध, यावर खल होऊ शकेल; परंतु गरज ही शोधाची जननी कशी ठरू शकते याचा प्रत्यय यानिमित्ताने यावा. ‘कोरोना’तील बंदीमुळे वेगळीच अस्वस्थता वाट्यास आलेल्या तळीरामांनी यासंदर्भात चालविलेल्या प्रयत्नांकडे म्हणूनच वेगळ्या दृष्टीने पाहिले गेल्यास हरकत असू नये.

‘कोरोना’ला रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक नसलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत. दूध, भाजीपाला, किराणा आदी. अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने ठरावीक काळात ते सुरू आहेतच, तथापि काहींनी यातही अभिनवता आणली आहे. ग्राहकाने आपल्या दाराशी येण्याची अपेक्षा न ठेवता घरपोच किराणा वगैरे उपलब्ध करून दिला जात आहे. लॉकडाउनमुळे वाहतूक बंद झाल्याने द्राक्षाचे होऊ शकणारे नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील तसेच सोलापूरच्या करमाळा तालुक्यातीलही एकाने मोटारसायकलवर घरपोच द्राक्ष विक्री केली. आपत्तीने घाबरून न जाता, योग्य तो मार्ग शोधून अडचणीतून बाहेर पडता येते, हेच यातून लक्षात घ्यायचे, अशी इतरही अनेक ठिकाणची उदाहरणे आहेत. तात्पर्य, इच्छा असली की मार्ग दिसतो. त्यामुळे अशाच अनावर इच्छेपोटी तळीरामांनाही मार्ग दिसले नसते तर नवल. कारण, यासंदर्भातील त्यांची तहान ही इतरांपेक्षा वेगळी असल्याने; ती त्यांच्यासाठीची आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक गरजेत मोडणारी बाब म्हणवली जाते.

‘कोरोना’च्या संकटकाळातून बाहेर पडल्यावर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकेल याच्या चर्चा होत आहेत; पण त्यानंतरच्या शक्यतांऐवजी आताच जे परिणाम दिसून येत आहेत त्यात तळीरामांनी चालविलेल्या चोऱ्या-लुटीच्या घटनांची आवर्जून दखल घेता यावी. या संकटकाळात चोवीस तास पोलीस गस्त असल्याने व कडेकोट बंदोबस्तामुळे नित्याची गुन्हेगारी घटली आहे, मात्र बेकायदा-गावठी दारू विक्री जोमाने सुरू झाल्याच्या वार्ता असून, मद्यविक्रीची दुकाने फोडली जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. गरज ही शोधाची जननी असल्याने ग्रामीण भागात दूरवर पायपीट करून असे गुत्ते शोधून काढले जात आहेत. या गुत्त्यांवर होणारी बाहेरच्यांची गर्दी व त्यातून होऊ शकणारा कोरोनाचा प्रसार पाहता तेथे हमरीतुमरीच्याही घटना घडत असून, नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत परिसरात तसला प्रकार घडून गेला आहे. इतकेच नव्हे, २४ मार्च ते १२ एप्रिलपर्यंतच्या टाळेबंदीच्या काळात राज्यात बेकायदा मद्यविक्रीचे सुमारे अडीच हजार गुन्हे नोंदविले गेले असून, हजाराच्या आसपास लोकांना अटक करण्यात आली आहे. गावठीवर भागले नाही, दुकाने फोडून पर्याप्त मात्रेत तहान भागू शकत नाही म्हणून की काय, वाडीवºहे येथे देशी दारू बनविणाºया कंपनीतच चोरट्यांनी डल्ला मारून माल लांबविल्याचाही गुन्हा पोलिसांकडे नोंदविला गेला आहे. विशेष म्हणजे अवैधरीत्या महागात मिळणारी दारू परवडेनाशी झाल्याने घरातल्या घरात ती कशी बनवता येईल हे शिकण्याची तयारीही तळीरामांनी दर्शविली आहे. गुगलवर यासाठी सर्वाधिक सर्च केले गेल्याचे आढळून आले आहे. मद्यपींची तहान किती टोकाला गेली आहे किंवा त्यांचा जीव किती कासावीस झाला आहे हेच यावरून लक्षात यावे.

सवयीने मजबूर म्हणून अशा तळीरामांकडे नेहमी पाहिले जाते; पण ते आता अल्कोहोलमुळे कोरोनाला दूर ठेवता येते असे अजब तर्कट मांडून आपल्या उद्दिष्टपूर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठीचे प्रयत्न एकीकडे केले जात असताना तळीरामांना आवरणे दुसरीकडे गरजेचे होऊन बसले आहे. अन्यथा आहे त्या आपत्तीत आणखी भलतीच भर पडण्याची भीती नाकारता येऊ नये. महत्त्वाचे म्हणजे, यातील तळीरामांची अगतिकता, त्यासाठीची त्यांची शक्कल तर्कट; वगैरे बाजू ठेवले तरी एक बाब दृष्टिआड करता येऊ नये ती म्हणजे, शासनाच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्काचा वाटा मोठा असतो. दारूबंदीच्या मोहिमा कितीही राबविल्या जात असल्या आणि बाटली आडवी करण्याच्या घटना घडत असल्या; तरी ही बाटलीच मोठा महसूल मिळवून देत आली आहे. एकट्या नाशिक विभागाची आकडेवारी पाहता वर्षाला दोन ते सव्वादोन हजार कोटींचा महसूल या विभागाकडून मिळत असतो. तेव्हा, तळीरामांनी त्याहीदृष्टीने तर्कट मांडून अत्यावश्यक सेवांच्या यादीत भर घालायची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये.  

 

Web Title: Coronavirus liquor shops closed due to corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.