CoronaVirus : भूक मिटेना, भयही संपेना!

By किरण अग्रवाल | Published: April 2, 2020 08:29 AM2020-04-02T08:29:31+5:302020-04-02T08:30:30+5:30

CoronaVirus : सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्या निवडणुकीप्रमाणेच एकत्र पुढे आलेल्या दिसत आहेत.

CoronaVirus: do not end of starve and panic | CoronaVirus : भूक मिटेना, भयही संपेना!

CoronaVirus : भूक मिटेना, भयही संपेना!

Next

- किरण अग्रवाल

भूक व भयमुक्ती... या दोन्ही बाबी सर्वसाधारणपणे निवडणुकीतल्या जाहीरनाम्यात वाचावयास मिळतात. निवडणुकोत्तर कालावधीत सत्तारूढांकडून अशी मुक्ती साधली जाण्यासाठी प्रयत्नही नक्कीच केले जातात; पण ते साध्य होतेच असे नाही. अर्थात या दोन्हीही बाबी हातात हात घालून येणाऱ्या असल्यातरी तशा वेगळ्या आहेत. भुकेचा संबंध पोटाशी व भयाचा मनाशी आहे. त्यामुळे पोट भरले म्हणजे मनातील भयाचे सावटही दूर झाले असे समजता येऊ नये. वेगळी स्थिती व वेगळ्या संदर्भाने या दोन्ही बाबींकडे पाहता येणारे आहे. पण, सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्या निवडणुकीप्रमाणेच एकत्र पुढे आलेल्या दिसत आहेत. मुंबई-पुण्यासारख्या महानगरातील लोंढेच्या लोंढे गावाकडे लोटण्यासाठी उत्सुक आहेत, ते त्याचमुळे.

कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जग चिंतित आहे. जागतिक महासत्ता म्हणविणा-या अमेरिकेलाही हादरे बसत असून, भारताचीही यासाठी निकराने लढाई सुरू आहे. सावधानतेचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘जनता कर्फ्यू’ पाळला गेल्यानंतर देशात ‘लॉकडाउन’ पुकारला गेला आहे. याचदरम्यान रोजीरोटीसाठी, म्हणजे नोकरीसह कामाधंद्यासाठी दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांत स्थलांतरित झालेले लोक गावाकडे परतण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र समोर आले आहे. रेल्वे, बस आदी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बंद असली तरी, अनेकजण आवश्यक त्या सामानाचे गाठोडे डोक्यावर घेत व लहान कच्च्याबच्च्यांना खांद्यावर बसवून पायीच निघाल्याचेही दिसून येत आहे. बरे, जवळचे शे-सव्वाशे किलोमीटरचे अंतर असेल तर एकवेळ ठीक; पण चक्क हजार-पाचशे किलोमीटरवरील गावचे लोकही पायी निघाले आहेत. त्यामुळे राज्या-राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमांवर या स्थलांतरितांमुळे नवेच प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. पोटापाण्यासाठी आलेले हे लोक, असे जत्थ्याने परतीला निघण्यामागेही भूक व भय हीच कारणे असून, त्यासंबंधीची चिंता आणि भीती त्यांच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत आहे.

खरे तर कोरोनाच्या संकटाला घाबरून जाण्याचे कारण नाही, खबरदारी मात्र घ्या असे आवाहन शासन-प्रशासनातर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. घराबाहेर पडू नका, असेही बजावण्यात आले असून, त्याचकरिता ‘लॉकडाउन’ केले गेले आहे. शासनाने गरजूंसाठी राशन-पाण्याची व्यवस्था केली असतानाच आता सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणात फूड पॅकेट्सचे वितरण करावयास सरसावल्या आहेत. तरीही मजुरीवर काम करणारा वर्ग व अन्यही अनेकजण गावाकडे परतण्याचा आटापिटा करीत आहेत. बाहेर पडणे धोक्याचे आहे, कदाचित जिवाशीच गाठ पडू शकते हे माहीत असूनही, त्याबद्दलचे भय न बाळगता ही मंडळी रस्त्याने चालू लागली आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’सारख्या बाबीचा तर यात मागमूसही नाही. एखादे वाहन मिळालेच तर अगदी गुरासारखे कोंबून घेत रस्ता कापणारे यात आहे. मुंबईतून राजस्थानच्या दिशेने, जळगाव खान्देशच्या वाटेवर असे जत्थेच्या जत्थे लोटलेले दिसतात. त्यातील अनेकांना वाटेत अडवले गेले, काहींना पुन्हा मुंबईत पाठविले गेले. म्हणजे पायपीट झाली, प्रकृतीची-जिवाची हेळसांडही झाली आणि भय कायम राहिले ते राहिलेच! त्यामुळे भूक आणि मृत्यूच्या भयातून ओढवणारी अधीरता, अस्वस्थता व असहायताही चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे.

खरे तर प्रत्येकजण धावपळ करतो ती कशासाठी, तर पोटाचे खळगे भरण्यासाठी. पिढीजात ऐश्वर्य अगर संपन्नता लाभलेल्यांना किंवा सुस्थिर असलेल्यांना हे लागू पडणारे नाही, मात्र बहुसंख्य वर्ग पोटासाठीच धडपडतो हे सत्य आहे; त्याअर्थाने भुकेकडे पाहता यावे. प्रत्येक निवडणुकांत व प्रत्येकच राजकीय पक्षांच्या वचननाम्यात भुकमुक्तीचा विषय असतो तो त्यामुळेच. कोरोनाच्या संकटानेही अनेकांसमोर भुकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषत: रोजंदारी, मजुरीवर काम करणाऱ्यांची सायंकाळची चूल पेटणे जिथे दिवसभराच्या कामावर अवलंबून असते, अशा वर्गाची मोठीच पंचाईत होताना दिसत आहे. एका बातमीनुसार, या काळात काहींवर भुकेपोटी भिकेची वेळ ओढवलीय; पण रस्त्यावर भीक द्यायलाही कोणी उपलब्ध नाही. त्यामुळे भुकेतून ओढावलेल्या असहायतेने काहीजण गावाकडे जाऊ पाहात आहेत.

संकट असे आहे की, गावात असलेल्यांचे लक्ष शहरातील आप्तांकडे व शहरात आलेल्यांचे गावातील वडीलधा-यांकडे लागले आहे. त्यातून परस्पर भेटीची अधीरता आली आहे, आणि त्यातूनच आकारलेल्या अस्वस्थतेतून मार्ग काढीत मृत्यूच्या भयाची फिकीर न बाळगता संबंधित लोकांचे तांडे परतीला लागलेले दिसत आहेत. भुकेची चिंता आहे; पण त्यापुढे मृत्यूचे भय दुर्लक्षिले जात आहे, अशी ही अजब स्थिती आहे. भूक व भय यातील हे द्वंद्व असून, त्यात ही मंडळी अडकली आहे. तेव्हा अशांना सुबुद्धी लाभो, इतकेच आपण या स्थितीत म्हणू शकतो.  
 

Web Title: CoronaVirus: do not end of starve and panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.