Corona Vaccination: मित्रांना लस द्या, हॉटेल-सिनेमाची ऐश करा; लसीकरण भाग्यवंतांची चंगळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:33 AM2021-10-06T05:33:38+5:302021-10-06T05:34:06+5:30

जो कोणी नागरिक आपल्या मित्रांना, नातेवाइकांना, शेजाऱ्यांना परिचितांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करेल, त्याला प्रत्येक लसीमागे मोठं बक्षीस देऊ करण्यात आलं आहे.

Corona Vaccination: Public awareness for vaccination drive to give prizes, money and officers | Corona Vaccination: मित्रांना लस द्या, हॉटेल-सिनेमाची ऐश करा; लसीकरण भाग्यवंतांची चंगळ

Corona Vaccination: मित्रांना लस द्या, हॉटेल-सिनेमाची ऐश करा; लसीकरण भाग्यवंतांची चंगळ

Next

सध्या कोरोनाची काय स्थिती आहे?,  तिसरी लाट येणार का?, लहान मुलांना पण, कोरोना होईल का?, सर्व देशांकडे कोरोना लसीच्या पुरेशा लसी उपलब्ध आहेत का?, डेल्टा व्हेरिएंटची भीती किती असेल?- अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळायची असली, तरी कोरोनाची भीती मात्र अनेक देशांतून जवळपास हद्दपार झालेली आहे असे दिसते . लस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृृत्त करणं  अजूनही फार अवघड ठरत आहे. 

चीनमधील लसी परिणामकारक नसल्याचा अनुभव अनेक देशांतील लोकांनी घेतल्यानंतर लोकांवरचा लसींवरचा विश्वासही पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात उडाला. लोकांनी लसी घ्याव्यात यासाठी त्यांना अनेक मोठमोठी प्रलोभनं दाखवण्यात आली, त्यातून लसी घेण्याचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं खरं, पण, अजूनही त्याचा तितकासा उपयोग होऊ शकलेला नाही. यासाठी स्वित्झर्लंड सरकारनं आता नवीच युक्ती काढली आहे. लोकांनी लस घ्यावी यासाठी अगोदर अनेक देश लाभार्थ्यांना लालूच दाखवत होते, पण, स्वित्झर्लंडनं जो नागरिक दुसऱ्या कोणाला लस घेण्यासाठी प्रवृत्त करेल, त्याला मोठं बक्षीस देण्याचं जाहीर केलं आहे. निदान याचा तरी उपयोग होईल असं सरकारला वाटतंय.

काय आहे हा उपाय आणि काय आहे बक्षीस?..
जो कोणी नागरिक आपल्या मित्रांना, नातेवाइकांना, शेजाऱ्यांना परिचितांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करेल, त्याला प्रत्येक लसीमागे मोठं बक्षीस देऊ करण्यात आलं आहे. लोक स्वत:हून तर लस घेत नाहीत, पण त्यांच्या परिचितांकडून त्यांना आग्रह झाला, तर, कदाचित लस घेण्यास ते प्रवृत्त होतील, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर जी कोणी व्यक्ती जाईल, त्या प्रत्येकाला विचारलं जाईल, या केंद्रावर तुला कोणी पाठवलं? लस घेण्यासाठी तुला कोणी प्रवृत्त केलं?.. याचं उत्तर त्या व्यक्तीला द्यावं लागेल. विशेष बाब म्हणजे ज्या कोणाच्या प्रभावामुळे ती व्यक्ती लस घेण्यास तयार झाली, त्या व्यक्तीला हे बक्षीस दिलं जाईल. म्हणजे, समजा मी माझ्या मित्राला लस घेण्यास प्रवृत्त केलं, तर बक्षीस लस घेणाऱ्याला नाही, ज्यानं लस घ्यायला लावली, त्याला मिळेल.

काय आहे हे बक्षीस? 
टोकनच्या रुपात हे बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक टोकनची किंमत आहे ५० स्विस फ्रँक्स म्हणजे अंदाजे ४,०५० रुपये ! प्रत्यक्ष रोख रकमेऐवजी हे टोकन त्या व्यक्तीला दिलं जाईल आणि हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह इथे ते टोकन त्याला वापरता येईल. याठिकाणी जेवढं बिल होइॅल, त्यातून बक्षिसाची रक्कम वळती केली जाईल! हॉटेलमध्ये खाणं, पिणं आणि फुकटात सिनेमा पाहायला मिळावा म्हणून अनेक नागरिक आता त्यासाठी पुढे येत आहेत. आपल्या मित्रमंडळींना राजी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.. या मार्गानं तरी देशातील लसीकरण मार्गी लागेल असं सरकारला वाटतंय. कारण पश्चिम युरोपात सगळ्यात कमी लसीकरण सध्या स्वित्झर्लंडमध्ये झालंय. येत्या काळात आपल्या देशाला त्याचा फटका बसू नये याची तीव्र चिंता सरकारला लागून आहे.

स्वित्झर्लंडची लोकसंख्या साधारणपणे ८७ लाख आहे. आतापर्यंत त्यातील केवळ ५८ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. देशाला आतापर्यंत एक कोटी १९ लाख डोस मिळाले आहे. मात्र महत्प्रयासानंही आतापर्यंत केवळ एक कोटी डोस वापरले गेले आहेत. उरलेले डोस वाया जाण्याची शक्यता असतानाही लोकांनी त्याकडे दुर्लक्षच केलं आहे. लसीबाबत लोकांच्या मनात साशंकता असल्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे लसीकरणाच्या विरोधात देशातील अनेक संघटनांनी आंदोलन पुकारताना त्याविरुद्ध तीव्र असंतोष प्रकट केला आहे. सरकारचंही म्हणणं आहे, कोरोना पेशंट्सची संख्या आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात वाढली नसली, तरी आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांची संख्याही कमी झालेली नाही. भविष्यात ही स्थिती अडचणीची ठरू शकते.

सध्याच्या घडीला स्वित्झर्लंडमध्ये साडे आठ लाख लोक कोरोनाचे पेशंट असून आतापर्यंत ११ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या लिकटेंस्टाइन या देशातील काेरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेच आहे. सरकारचं म्हणणं आहे, येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आम्हाला वाटते आहे. त्यासाठी सरकार १४०० कोटी स्विस फ्रँक  खर्च करणार आहे. 

लसीकरण भाग्यवंतांची चंगळ! 
देशातील लोकांचं लसीकरण वाढावं म्हणून आजपर्यंत अनेक देशांनी आपल्या नागरिकांना लालूच आणि बक्षीसं देऊ केली आहेत. हाँगकाँगमध्ये १४ लाख डॉलर किंमतीच्या फ्लॅटची लकी ड्रॉ ऑफर जाहीर केली होती. काही देशांनी लसीकरण केलेल्या नागरिकांना लकी ड्रॉॅ मध्ये टेस्ला कार, सोन्याचं बिस्कीट, अत्यंत महागडं रोलेक्स घड्याळ... अशा अनेक ऑफर जाहीर केल्या होत्या.  अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटनसारख्या देशांनी विजेत्यांना ‘वर्ल्ड टूर’, आयफोनसारख्या ऑफर्स दिल्या, तर इतर काही देशांनी विमानाचं तिकीट, बिअर इत्यादी गोष्टी भाग्यवंतांना मोफत दिल्या.

Web Title: Corona Vaccination: Public awareness for vaccination drive to give prizes, money and officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.