कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 04:45 AM2021-04-17T04:45:14+5:302021-04-17T05:32:23+5:30

BCCI : कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने खेळाडूंना सप्टेंबर २०२१पर्यंत करारबद्ध करताना त्यांची रक्कम ‘जैसे थे’ ठेवलेली आहे. त्यात कसलीही काटछाट केलेली नाही.

Corona or not, spectators on the field or not, the flow of money to cricket continues ... | कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम...

कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम...

Next

भारताच्या क्रीडाविश्वाचा विचार केला, तर क्रिकेटसारखे सुदृढ अर्थकारण इतर कोणत्याही खेळाचे नाही. अफाट लोकप्रियता आहे, त्यामुळे या खेळात पैसासुद्धा आहे; पण ही लोकप्रियता नुसती टिकवूनच ठेवायची नाही तर ती वाढत राहावी यासाठीची जी उच्च कोटीची व्यावसायिकता लागते ती व्यावसायिकता आणि ती दृष्टी या देशात फक्त क्रिकेटची धुरा वाहणारांकडेच आहे. म्हणून कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने- बीसीसीआयने अलीकडेच २८ क्रिकेटपटूंशी केलेला वार्षिक करार.

कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने खेळाडूंना सप्टेंबर २०२१पर्यंत करारबद्ध करताना त्यांची रक्कम ‘जैसे थे’ ठेवलेली आहे. त्यात कसलीही काटछाट केलेली नाही. ठरल्याप्रमाणे मंडळाची जी सर्वोच्च श्रेणी आहे ‘ए प्लस’,  त्यातील क्रिकेटपटूंना वार्षिक सात कोटी रुपये,  ‘ए’ श्रेणीतील खेळाडूंना पाच कोटी रुपये,  ‘बी’  श्रेणीसाठी तीन कोटी रुपये आणि ‘सी’ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहेत.  याखेरीज प्रत्येक कसोटीसाठी १५ लाख रुपये, वन डे सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ३ लाख रुपये सामना शुल्क म्हणून मिळतात ते वेगळे. जाहिराती व प्रायोजकत्वातून येणारा पैसा वेगळा. साहजिकच क्रिकेटपटू बनला म्हणजे पैसाच पैसा हा जो लोकांचा समज झालाय तो चुकीचा नाही; पण फारच थोड्या म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या आणि कडव्या स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणारांच्याच हाती हे घबाड लागते. १३० कोटींच्या वरील लोकसंख्येच्या देशात असे खेळाडू फक्त २५ ते ३० असतात आणि त्यांची जागा घेण्यासाठी  २५ ते ३० हजार खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात.

या २५ ते ३० खेळाडूंमध्ये यंदा ज्यांनी स्थान मिळविले, त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसारखे ‘ए प्लस’ श्रेणीतील नेहमीचे चेहरे तर आहेतच; पण शुभमन गिल, अक्षर पटेल व मोहम्मद सिराजसारखे नवे चेहरेसुद्धा आहेत. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांना वरच्या श्रेणीचे बक्षीस मिळाले आहे. दुखापतींमुळे कामगिरीत सातत्य राखू न शकलेला भुवनेश्वर कुमार आणि कामगिरी घसरलेले युझवेंद्र चहल व कुलदीप यादव यांची श्रेणी घसरली आहे. मनीष पांडे व केदार जाधव हे तर बादच झाले आहेत. थोडक्यात काय तर बीसीसीआयचे हे वार्षिक करार म्हणजे क्रिकेटपटूच्या कामगिरीचा आरसा आहे. चांगली कामगिरी केली  तर बढती,  नाही तर खालची श्रेणी किंवा थेट बाद. काही खेळाडूंकडे दुर्लक्ष वा अन्याय झाल्याची ओरड होण्यास नेहमीच जागा असते तशी ती या करारांसंदर्भातही होते आहे.

यंदा टी. नटराजन, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन अशा उमद्या आणि चुणूक दाखविलेल्या खेळाडूंना करार मिळायला हवा होता अशी चर्चा आहे; पण जे करारबद्ध खेळाडू आहेत त्यांच्यापैकी कुणी योग्यतेचा नाही असे मात्र नाही. मात्र, नटराजन, यादव व किशन यांना करार मिळवायचा असेल  तर सातत्यपूर्ण कामगिरी दाखवावी लागणार, हे निश्चित. या करारांचा दुसरा फायदा असा की नावाजलेला खेळाडू असो की नवोदीत, जो कामगिरी दाखवील त्याला त्याच्या कामगिरीनुसार श्रेणी मिळेल.  कुणी मोठा, कुणी छोटा असा भेद नाही. शिवाय करारबद्ध खेळाडूंच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मंडळ उचलत असते.

युवराज सिंगच्या कर्करोगावरील उपचार असोत, की मोहम्मद शमीच्या पायाच्या दुखापतीवरील उपचार, त्यांना याचा फायदा मिळाला. याच्या आधीसुद्धा खेळाडूंना अर्थसाहाय्य मिळतच होते; पण आता ती प्रक्रिया अधिक सूत्रबद्ध झाली आहे. अर्थात नवोदित खेळाडूला संघात स्थान मिळणे, त्याने सातत्य दाखवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण देशात इतके गुणवंत खेळाडू  आहेत, की एकाची जागा घेण्यासाठी दुसरा हजरच असतो. काही सामने जरी एखाद्या खेळाडूची कामगिरी वाईट झाली, तर तो कायमचाच संघाबाहेर जाऊन ‘माजी खेळाडू’ होऊ शकतो; पण स्पर्धेच्या जगात याला पर्याय नाही. करारांमध्ये ‘ए प्लस’ श्रेणी हाच एक मतभेदाचा विषय आहे.

महेंद्रसिंह धोनी व विराट कोहलीच्या सूचनेवरून ही श्रेणी आली आणि त्यात सातत्याने अत्युच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्यांनाच स्थान देण्याचे ठरले; परंतु कुणी खेळाडू म्हणून नाही; पण कर्णधार म्हणून यशस्वी ठरत असेल तर त्याचे काय? कामगिरी झाली नाही म्हणून अवमूल्यन की कर्णधार म्हणून त्याच्या यशाचा विचार होणार, हे निश्चित नाही. हा एक मुद्दा सोडला तर सातत्याने चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी हीच पद्धत योग्य आहे आणि सातत्य राखाल तर करार मिळवाल हा त्याचा गुरुमंत्र आहे.

Web Title: Corona or not, spectators on the field or not, the flow of money to cricket continues ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.