शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाचे सोंग

By admin | Updated: April 13, 2016 03:39 IST

साहित्य संमेलने घेण्याचा उद्देशच राहिलेला नाही, मग ते कोणतेही असो. हल्ली तर महिला, पुरोगामी, परंपरावादी अशी एक ना अनेक साहित्य संमेलने भरत असल्याने रंगत उरली नाही. कंपू मात्र तयार झाला.

- सुधीर महाजन

साहित्य संमेलने घेण्याचा उद्देशच राहिलेला नाही, मग ते कोणतेही असो. हल्ली तर महिला, पुरोगामी, परंपरावादी अशी एक ना अनेक साहित्य संमेलने भरत असल्याने रंगत उरली नाही. कंपू मात्र तयार झाला.मराठवाड्यात चैतीचे वातावरण आहे. दरवर्षी चैत्रात होणाऱ्या गावागावातील जत्रांना इकडे ‘चैती’ म्हणतात. बारागाड्या, सोंगं, तकतराव असा परंपरागत बाज अजून टिकून आहे. राम-रावण, भवानी, हनुमान, शूर्पणखा अशी सोंगं अजूनही निघतात. पालख्यांचा फेरा होतो, दाळ्या-रेवड्यांची उधळण होते. पैपाहुणे, लेकीबाळींनी घर गजबजते. शेतीच्या रगाड्यातून मिळालेली सुटका आणि श्रमपरिहार, थोडी मौजमजा हा या गावागावात होणाऱ्या यात्रांचा उद्देश. सोंग म्हणजे कलेचा आविष्कार समजला जातो. या सोंगांची चर्चा पुढे महिना-दोन महिने शिळोप्याच्या गप्पांमध्ये रंगते. काळ बदलला आणि या जत्रांचा बाजही बदलला; पण मूळ चौकट अजून कायम आहे.या चैतीच्या गर्दीत जालन्यात झालेले मराठवाडा साहित्य संमेलन हरवले असेच म्हणावे लागले. दोन दिवसांचे हे संमेलन गाजले ते वर्तमानपत्रांमध्येच. बाकी जालनेकर किंवा मराठवाड्यातील भद्र लोकांना त्याचे काही घेणे-देणे नव्हते, असेच म्हणावे लागेल. ना गर्दी, ना साहित्यिक, तसेच रसिकांचीही वानवा अशा परिस्थितीत प्रश्न पडतो हे संमेलन का घेतले याचा. मराठवाडा साहित्य परिषदेच्या एका मान्यवर सूत्रधारानी गप्पा मारताना अगदी सहजपणे सांगितले की, टायमिंग चुकले. डिसेंबर-जानेवारी हा खरा संमेलनाचा मोसम. आता एप्रिलचे ऊन आणि त्यात दुष्काळ, त्यामुळे साहित्यिक आणि रसिक दोघेही फिरकले नाहीत, हे खरे. मग संमेलन घेण्याचा अट्टहास का? तर उत्तर असे की, खंड पडायला नको. म्हणजे साहित्य संमेलनाच्या मूळ उद्देशालाच येथे हरताळ फासला गेला. चटावरचे श्राद्ध उरकावे तसे संमेलन उरकले. निमंत्रितांना पत्रिका पोहोचल्या नाहीत अशाही तक्रारी आहेत.जालन्याचे खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव पत्रिकेवर; पण त्यांची गैरहजेरी. त्यांना छेडले असता पत्रिकेत नाव आहे; पण ते टाकण्यापूर्वी संयोजकांनी संपर्क साधला नव्हता असे ते म्हणतात, तर संयोजकांचे म्हणणे असे की, पत्रकारांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना निमंत्रण पत्रिका दिली, शिवाय शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आणणार होतो, तर त्यासाठी दानवेंनी मुंबईला बोलावले होते; पण मुंबईला जाऊनही दानवेंची भेट झाली नाही. अशा एक ना अनेक कहाण्या आणि रुसव्याफुगव्यांच्या कथांना, तर मारुतीची शेपटी कमी पडेल.कहर म्हणजे या वातानुकूलित जमान्यात संमेलनाध्यक्ष दत्ता भगत हे नांदेडहून बसमध्ये प्रवास करीत जालन्यात पोहोचले आणि अध्यक्षीय भाषणात त्यांनी हे सांगितलेही. संमेलनातील चर्चासत्रांचे विषयसुद्धा पीएच.डी.च्या विषयासारखे. त्यामुळे परिसंवादात रंगत आलीच नाही. सारा उरकून टाकण्याचा प्रकार होता. याच काळात जालना शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालू आहे आणि त्यासाठी गर्दी एवढी की सभागृह ओसंडून वाहते. एकीकडे रसिकांची वानवा, तर दुसरीकडे प्रचंड प्रतिसाद असे परस्परविरोधी चित्र जालनेकरांनी पाहिले.हे सर्व पाहाता संयोजकांनीही काही गोष्टी सांगितल्या. संजीवनी तडेगावकर आणि जयराम खेडेकर हे दोघे म्हणजे जालना शहरात सातत्याने साहित्यिक उपक्रम घेणारी मंडळी. त्यांच्या म्हणण्यानुसार ऊन, दुष्काळ आणि संमेलन स्थळ ही तीन प्रमुख कारणे, ज्यामुळे रसिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. गोळाबेरीज काहीही असो. साहित्य संमेलनाला आता रमण्यांचे स्वरूप आलेले आहे. शिवाय सत्तेच्या राजकारणापेक्षाही साहित्यिकांमधील गटातटाचे राजकारण तीव्र आहे. अशा परिस्थितीत चुकलेले टायमिंग आणि उरकून टाकण्याची मानसिकता हेच रसिकांनी पाठ फिरविण्याचे कारण दिसते. गावागावातील चैतीची सोंगं तरी रंगत आणतात, लोकांचे किमान मनोरंजन करतात. आजच्या डिजिटल जमान्यातही ते संदर्भ ठेवून आहेत. हे संमेलन धड सोंगही झाले नाही आणि चैतीही नाही.