संसर्गाचा सारीताप, कोरोनाचा सारिपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:50 PM2020-04-16T22:50:40+5:302020-04-16T22:51:38+5:30

गेल्या महिनाभरापासून या सारी रुग्णांची संख्या वाढत असून, औरंगाबादेत या आठवड्यात चौदाजणांचा बळी गेला आहे.

Contagious infection, coronary artery corona | संसर्गाचा सारीताप, कोरोनाचा सारिपाट

संसर्गाचा सारीताप, कोरोनाचा सारिपाट

googlenewsNext

संजीव उन्हाळे

राज्यभर कोरोनाचे थैमान असतानाच, तुलनेने कमी संसर्गजन्यता असूनही कोरोनाशी तंतोतंत साधर्म्य असलेला ‘सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ म्हणजेच सारी हा आजार मराठवाडा आणि विदर्भामध्ये वाढत आहे. तथापि, कोरोनापेक्षा या तीव्र वेदनादायी ‘सारी’मध्ये श्वसनसंस्थेची संसर्गबाधा झाल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त म्हणजे किमान १५ टक्के आहे. राज्यभर या सारी आजाराने बाधित रुग्णांचे शासनाने सर्वेक्षण केले असून, त्यामध्ये ३.८ टक्के कोरोनाबाधित सापडले आहेत. अगदी अलीकडे शासनाने सर्व खासगी डॉक्टरांना ‘सारी’चा रुग्ण सापडला, तर अगोदर सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा आदेश दिला; पण गर्दी वाढल्याने उपचार आणि बडदास्त ठेवता-ठेवता नाकीनऊ आले आहे.

गेल्या महिनाभरापासून या सारी रुग्णांची संख्या वाढत असून, औरंगाबादेत या आठवड्यात चौदाजणांचा बळी गेला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गांभीर्य ओळखून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘ताप उपचार केंद्र सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. कोविड केअर सेंटरचा ताप उपचार केंद्र हा एक भाग असून, आता सार्वजनिक आरोग्य विभागाने बांधून पूर्ण केलेल्या; पण अद्याप वापरात नसलेल्या इमारती, स्टेडिअम, हॉटेल याठिकाणी आता सारी ताप असलेल्या रुग्णालासुद्धा दाखल करण्यात येईल. वस्तुत: कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल येऊनही जर ताप, श्वसनाचा आजार दिसून आला, तर त्याला सारी रुग्ण म्हणून दाखल करण्यात येते. असेही घडले आहे की, अगोदरचा निगेटिव्ह अहवाल नंतर पॉझिटिव्ह आढळला. मग कोरोनाचा रुग्ण म्हणून धांदल उडते. ‘सारी’साठी दाखल रुग्णांना प्रथम कोरोनाचे औषधोपचार चालू करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयात दाखल झालेला कोणताही ‘सारी’चा रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह आहे, असे समजूनच सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे,’ असे ज्येष्ठ डॉक्टर मंगला बोरकर यांनी सांगितले. वस्तुत: ‘सारी’ हा काही वेगळा आजार नाही, तर तीव्रतम श्वसन संस्थेचे आजार, शीतज्वर या संसर्गजन्य आजारांच्या समूहाला साकल्याने ‘सारी’ असे संबोधण्यात येते. त्यात स्वाईन फ्लू, बॅक्टेरिअल इन्फेक्शन, फ्लूपासून अलीकडे आलेल्या कोरोनाचाही समावेश होतो. मुळामध्ये न्यूमोनिया या आजारामध्ये अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत होते; पण त्याची माध्यमांनी कधीच गंभीरपणे दखल घेतली नाही. कोरोनाच्या आगमनानंतर या आजाराला विशेष महत्त्व आले आहे. ‘सारी’ची लक्षणे व कोरोनाची लक्षणे एकसारखीच आहेत. दम लागणे, ताप येणे, श्वासोच्छ्वासास त्रास होणे, खोकला यांपासूनच दोन्ही आजारांची सुरुवात होते. ‘सारी’ हा आजार कमी संसर्गजन्य आहे एवढेच. जागतिक तापमानवाढीमुळे ‘सारी’च्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याघडीला महाराष्ट्रातील आठ जिल्हे, तमिळनाडू, गुजरात, केरळ, आदी राज्यांतही ‘सारी’ने हात-पाय पसरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वयस्करांना लवकर होतो, तसे ‘सारी’चे नाही. लहान मुलांपासून मध्यमवयीन माणसांपर्यंत ‘सारी’चा संसर्ग दिसतो.
मुंबईहून आलेले स्टेट बँक आॅफ इंडियाचे एक व्यवस्थापक देवळाई चौकामध्ये राहिले. त्यांना न्यूमोनिया झाला. त्यामुळे ‘सारी’ वॉर्डात दाखल करण्यात आले. शेवटच्या क्षणी ते कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. त्यानंतर श्वासोच्छ्वासक लावला; पण काही उपयोग झाला नाही. नंतर अल्पावधीत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनियाचा रुग्ण समजून घरातील सर्वांनी संपर्क ठेवला आणि चारजणांना न्यूमोनियाची बाधा झाली. अशा कितीतरी सारी-कोरोनाच्या कथा.
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केलेल्या संशोधनामध्ये असे लक्षात आले आहे की, ‘सारी’च्या रुग्णांमध्ये कोविड-१९चे रुग्ण सापडतात. ५,९११ सारी रुग्णांमध्ये १०४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून, ‘सारी’च्या पुरुष रुग्णांमध्ये कोरोना सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. जवळपास ४० टक्के न्यूमोनियासदृश आजार असलेल्या सारी-कोरोना संशयित रुग्णांमध्ये परदेशी पर्यटनाचा इतिहास नाही. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आयसीएमआरने केलेल्या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील ५५३ सारी रुग्णांचा अभ्यास केला असता कोरोनाचे २१ पॉझिटिव्ह सापडले. या अहवालात सर्वाधिक ‘सारी’चे रुग्ण गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले. सारीच्या संसर्गजन्य आजाराच्या गटामध्ये कोरोनाचा समावेश अपरिहार्य झाला आहे.
अगोदरच सगळी जनता लॉकडाऊनने हैराण आहे. त्यात कोणत्या एखाद्या भागामध्ये कोरोना रुग्ण निघाला की, पोलीस व्यवस्था कडक होते. त्या सगळ्या यातनांतून मार्ग काढत असताना मध्येच ‘सारी’चा हा सारिपाट काही वेगळाच आहे. ‘सारी’चे रुग्ण हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून, ग्रामीण भागातूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर येत
आहेत. अगदी खेड्यातील सामान्य खासगी डॉक्टरसुद्धा सध्या सारी रुग्णांची जोखीम घ्यायला तयार नाहीत. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयाची वाट दाखविण्यात येते. प्रश्न एवढाच आहे की, शासनाच्या आरोग्य विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ आहे व अशा तोकड्या मनुष्यबळाच्या जोरावर कोरोनाप्रमाणेच ‘सारी’च्या रुग्णांची व्यवस्था ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. यापैकी एकही रुग्ण कोरोनाबाधित असेल, तर आरोग्य कर्मचाऱ्यांचे भविष्यही टांगणीला लागल्यासारखे होणार आहे.


( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )

Web Title: Contagious infection, coronary artery corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.