कोकणातील सर्वच जुने पूल नव्याने बांधा!

By Admin | Updated: August 16, 2016 04:06 IST2016-08-16T04:06:46+5:302016-08-16T04:06:46+5:30

कोकणातील महाडजवळच्या सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून, त्यामध्ये बस बुडून झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे! या अपघातात दगावलेले प्रवासी

Construct all the old bridges in Konkan! | कोकणातील सर्वच जुने पूल नव्याने बांधा!

कोकणातील सर्वच जुने पूल नव्याने बांधा!

- यशवंत जोगदेव

कोकणातील महाडजवळच्या सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून, त्यामध्ये बस बुडून झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे! या अपघातात दगावलेले प्रवासी या भागातील धोकादायक पूल, रस्ते वाहतुकीतील नेहमी येणारे अडथळे आणि अपघात याच्या जोडीलाच महाराष्ट्रातील विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे, राजकीय आरोप आणि प्रत्यारोप याही घटना अपेक्षेप्रमाणे गाजल्या. आता या सर्व गदारोळातून थंड डोक्याने कोकणातील प्रवास भविष्यात सुरक्षित, सुखरूप, जलद गतीने आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने भारी वजनाच्या मालवाहतुकीला योग्य, तसेच कोकणात पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने रस्ते वाहतुकीसाठी नवीन पूल आणि चौपदरी महामार्ग एक नवीन जाळे उभारणे, आता आवश्यक ठरले आहे!

सावित्री नदीवरील पूल अपघातात २४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याने, प्रसारमाध्यमे आणि राजकीय स्तरावर एकमेकांवर दोषारोपण आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे सत्र सुरू झाले आहे! मात्र, जसा काळ पुढे सरकतो, तसतसे घटनेचे गांभीर्य आणि महत्त्व कमी होत पुन्हा अशीच दुर्घटना घडेपर्यंत उपाय योजनेकडे दुर्लक्ष केले जाते! देशात आणि महाराष्ट्रात रस्त्यावरच्या अपघातात दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे लाखो निरपराध प्रवाशांचे बळी गेले आहेत. इतक्या नागरिकांचे बलिदान होऊनही राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे, तसेच नेहमीच्या आर्थिक अडचणींचे कारण पुढे करून असे प्रकल्प रेंगाळतात!
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि कोकणातील जुन्या पुलांचे सर्वेक्षण, स्ट्रक्चरल आॅडिट आणि गणेशोत्सवासाठी राष्ट्रीय महामार्गावर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची जबरदस्त गर्दी होणार असल्याने डळमळीत झालेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. वर्तमान परिस्थितीत कोकणामधील वाहतूक चालू ठेवण्यासाठी हे आवश्यक असले, तरीही हा उपाय पुरेसा नाही. यासाठी आता कोकणातील महामार्गावरील महत्त्वाचे २० पूल, १०० वर्षांपूर्वी बांधलेले दगडी बांधकाम चुना आणि कमानी असलेले ३४ पूल, हे सर्वच आता दुरुस्त करीत बसण्यापेक्षा अत्याधुनिक तंत्र वापरून बांग्लादेशातील युद्धकाळात नद्या ओलांडण्यासाठी संरक्षण दल वापरतात, तसे फोल्डिंग ब्रीज असे तंत्रज्ञान सध्या गणेशोत्सव आणि दिवाळी सणामधील मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतुकीसाठी वापरून भविष्यकाळात हे सर्व पूल नव्यानेच उभारण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात कोकण रेल्वेचे पहिले कार्यसंचालक श्रीधरन यांच्याशी संपर्क साधल्यावर या सर्व पुलांची आधुनिक तंत्र वापरून उभारणी अवघ्या २ ते ३ वर्षांतच करता येईल आणि त्यासाठी खर्च अवघा ५००० कोटी येईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या उभारणीसाठी असलेला सर्वांत मोठा शाप म्हणजे राजकीय मतभेद, जमीन संपादन, प्रशासकीय प्रक्रिया आणि निधींची अडचण असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प रखडत आहेत. त्याऐवजी आतापासूनच नवीन पुलांच्या उभारणीसाठी जमीन संपादन, त्यासाठी जोडमार्गाचे बांधकाम, या पुलांचे डिझाइन, त्यासाठी मान्यता, कंत्राटदारांची नेमणूक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केंद्र आणि राज्याने निधीची व्यवस्था केली, तरच हा प्रकल्प ठरावीक वेळेत पूर्ण होऊ शकेल. सुदैवाने राज्यातील जलदगती महामार्ग उभारणारे नितीन गडकरी केंद्रात सार्वजनिक बांधकाममंत्री असल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे दृढनिश्चयी असल्याने, कोकणातील महामार्ग आणि नवीन पूल बांधणीच्या कामाला विलंब लागणार नाही, ही अपेक्षा आहे.
सध्या असलेल्या जुन्या पुलांचे आयुष्यमान ७०-८० वर्षे हे पूल वाहतुकीसाठी उपयोगात आल्याने पूर्ण होत आले आहे. त्यावरील खर्च केव्हाच भरून निघाला आहे. या सर्व ठिकाणी पुलांची लांबी, जास्तीत जास्त २०० मी. आणि रुंदी ४ लेनची धरली, तरीही या सर्व प्रकल्पाला ५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार नाही. या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नवीन पूल बांधण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या जागेची जमीन संपादन युद्धस्तरावर केली गेली आणि जलद गतीने प्रत्येक आठवड्याचे लक्ष्य ठरवून, ठरावीक बांधकाम पूर्ण करण्याचा दृढ निश्चय केला, तर वर्षभरातच नदीच्या पात्रात अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून पुलाच्या पायासाठी खोदकाम, त्यामध्ये काँक्रिट ओतणे, मजबूत पोलादी सळ्या रोवून या पुलाचे पिलर उभारणे, त्याच्यावरील सुपर स्ट्रक्चर, डेक ही सर्व कामे वर्षभरातच उरकली जातील. हे सर्व होत असतानाच सध्याच्या महामार्गातूनच नवीन महामार्गासाठी जोडरस्ते आणि त्याचे बांधकाम तातडीने सुरू करता येईल.
या सर्व प्रयत्नांच्या तुलनेत सध्याच्या गोव्याला जाणाऱ्या महामार्गावर नवीन पूल उभारणे हे काम फारच मर्यादित आणि सोपे आहे. उलट सध्या भारत सरकारकडे प्रकल्पासाठी विदेशी मुद्रा आणि आर्थिक मदत मिळणे अशक्य नाही. त्याखेरीज सध्या बांधकाम क्षेत्रातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, व्यवस्थापन, भारी वजनाचे बांधकाम साहित्य याची वाहतूक करण्यासाठी कोकणात रेल्वे मार्ग झाला आहे. पुन्हा एकदा कोकणात रेल्वे वाहतुकीप्रमाणे रस्ते वाहतुकीसाठीसुद्धा प्रयत्न होणे, ही काळाची गरज आहे.
(लेखक जम्मू काश्मीर रेल्वे प्रकल्पाचे माजी जनसंपर्क सल्लागार आहेत)

Web Title: Construct all the old bridges in Konkan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.