सततच्या स्क्रोलिंगने आपले माकड केले आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:12 AM2021-08-28T08:12:05+5:302021-08-28T08:15:04+5:30

माणसे एक अख्खा सिनेमा सलग पाहत नाहीत. पूर्ण गाणे ऐकत नाहीत! कुठल्याही एका जागी थांबतच नाहीत! माणसांचे हे काय चालले आहे?

Is constantly scrolling on mobile, you became monkey? | सततच्या स्क्रोलिंगने आपले माकड केले आहे का?

सततच्या स्क्रोलिंगने आपले माकड केले आहे का?

Next

- समीर गायकवाड, स्तंभलेखक, ब्लॉगर आणि सामाजिक कार्यकर्ता
सोशल मीडियापासून दूर असलेली माणसे अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. दीड जीबीचा डेटा हा आता विनोदाचा विषय होऊ पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे, याहीपुढला खरा प्रश्न हा  की, माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय? 

फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, लिंक्डइन इत्यादीत अकाउंट असते. माणसे लॉग इन करतात आणि त्यात हरवून जातात. मग सुरू होते स्क्रोलिंग! तासन्तास माणसे स्क्रोल करत  या वॉलवरून त्या वॉलवर, या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये भरकटत राहतात. या प्रोफाइलवरून त्या प्रोफाइलवर जातात. डिस्प्ले पिक्चर, फोटो अल्बम, व्हिडिओ रिल्समध्ये खोल-खोल फिरत राहतात. पटापट चित्रे बदलत राहतात. मजकुरावरून नुसती नजर भिरभिरत राहते, मध्येच एखादा व्हिडिओ रन होतो, मध्येच एखादी ऑडिओ क्लिप प्ले होते, अचानकच टीझर येते, टिकटिक करणारे टिकर येते. मन एकीकडे असते, नजर एकीकडे आणि बोटांची हालचाल अविरत सुरू असते.   

सोशल मीडियाने दिलेला सर्वांत मोठा शाप जर कुठला असेल तर तो अधीरतेचा आहे. हे चित्र संवेदनशील मनास अंतर्बाह्य हलवून टाकणारे आहे. सोशल मीडियात पोस्ट, फोटो, व्हिडिओ वा मजकूर स्क्रोल होत नसून माणूसच स्क्रोल होतोय. इथे माणसे अधीरतेच्या कमाल पातळ्या गाठण्यासाठी पेटून उठलीत. एखाद्या चांगल्या वॉलवर, पोस्टवर ती थांबू शकत नाहीत. मोठा मजकूर सलग नि पूर्ण वाचू शकत नाहीत. झरझर पुढे जातात. या स्क्रोलिंगची सवय आस्ते कदम त्याच्या दैनंदिन जीवनातदेखील भिनू लागलीय.  माणूसपण लोप पावून आपले डिजिटल आत्ममग्न स्वरूप सतत कसल्या न् कसल्या तरी अज्ञात वस्तूच्या, घटनेच्या, अणुरेणूच्या शोधात आहे. हा शोध अंतहीन आहे आणि त्यातून सुरू असलेले स्क्रोलिंग मानवी भावनांच्या मुळांवर उठलेले आहे. 

सोशल मीडिया सातत्याने वापरणारी माणसे एकसलग एक गोष्ट करूच शकत नाहीत. सिनेमा नाटकास गेले, तर दहाव्या मिनिटाला विचलित होतात. एखाद्या गाण्याच्या मैफलीत गेले, तर काही वेळातच अस्वस्थ होतात.   टीव्ही पाहत बसले की, मिनिटागणिक चॅनल बदलत राहतात. आवडीचा सिनेमादेखील सलग पाहण्याची क्षमता हरवून गेलीय. पुस्तक हाती घेतले तरी माणसे  भराभर पाने पालटत राहतात. कुठे भटकंती करायला गेले, तर कधी एकदा इथून निघून दुसरीकडे जातो यासाठी आतुर होतात. 
 माणसे वेळ काढून बाहेर पडली, बाजारात गेली तरी  एका जागी खरेदी करू शकत नाहीत. हे पाहू की ते पाहू, हे घेऊ की ते घेऊ, अशी द्विधा मन:स्थिती होते. ठरवतात एक आणि आणतात दुसरेच काही!  गप्पा मारत एका जागी अधिक वेळ बसू शकत नाहीत. कुठे सेलेब्रेशनला वा कार्यक्रमात गेले तर अवघ्या काही मिनिटांतच आपले वेगळे कोंडाळे करून बसतात.  कुठे काही दिसले जाणवले तर डोळ्याने पाहत नाहीत, तर हातातला मोबाइल काढून शूट करू लागतात. लोकांनी खोलात जाऊन विचार करणे आणि स्वतःला प्रश्न विचारणे बंद केले आहे.   

ज्याला त्याला आताच्या घडीला कुठला ट्रेंड सुरू आहे, हे जाणून घेण्याची एक अनामिक ओढ लागून असते.  माणसे ट्रेंडप्रमाणे बोलतात, लिहितात, रडतात, हसतात, धावतात, थांबतात, श्रद्धांजली वाहतात, शुभेच्छा देतात! जित्या जागत्या देहाचे रूपांतर बाहुलीत होऊ लागलेय. लोक नुसते धावताहेत, पुढे- पुढे जाताहेत. कुणाला कुणासाठी वेळ नाही, मग सोशल मीडियावर इतका अफाट वेळ कुठून देता येतो?

- अशा वेळी वाट पाहावी टॉलस्टॉयच्या ‘त्या’ गोष्टीतल्या शेवटाची. जमिनीच्या हव्यासापोटी धावणाऱ्याच्या अखेर कोसळण्याची, आहे तो आनंद गमावून बसल्याची जाणीव होण्याची! खऱ्या अर्थाने याची वाट पाहण्याचा हा काळ आहे.  ...म्हणूनच मी टॉलस्टॉयला शोधतो आहे. तुम्हालाही स्वतःचा शोध घ्यायचा असेल, तर त्याला शोधलेच पाहिजे. कुणी पाहिलेय का त्याला?
sameerbapu@gmail.com

Web Title: Is constantly scrolling on mobile, you became monkey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.