काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहील?
By Admin | Updated: November 4, 2014 01:57 IST2014-11-04T01:57:09+5:302014-11-04T01:57:09+5:30
हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत तर निवडणुकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव पत्करला होता. महाराष्ट्रातील एका काँग्रेस उमेदवारानेच मला सांगितले

काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहील?
राजदीप सरदेसाई
ज्येष्ठ पत्रकार
आपल्या मुली सध्याच्या असाधारण स्थितीत भविष्यवेत्त्या ठरू शकतात. कारण माझ्या १ नोव्हेंबर २०१४ रोजी बाजारात येणाऱ्या २०१४ : ‘द इलेक्शन दॅट चेन्ज्ड् इंडिया’ (२०१४ : भारताला बदलून टाकणाऱ्या निवडणुका) या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांची छायाचित्रे बघून माझी मुलगी म्हणाली, ‘‘तुम्ही फक्त मोदींचे चित्र द्यायला हवे होते. कारण ते जेते आहेत. तुम्हाला राहुलचे चित्र कशाला हवे?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘कारण की प्रत्येक जेत्यासोबत एक पराभूत व्यक्ती असतेच.’’
या महानिवडणुकीचे पोस्टमार्टेम केल्यास हे लक्षात येईल, की या निवडणुका मोदींनी आपल्यातील उत्साहामुळे आणि कल्पकतेमुळे जिंकल्या. अर्थात् काँग्रेसची प्रचार मोहीमही तेवढीच भिकार होती, हेही तितकेच खरे आहे. हे पुस्तक लिहिताना मी जो शोध घेतला त्यात मला दिसून आले, की काँग्रेसने खूपच गोंधळ करून ठेवला होता. काँग्रेसच्या प्रचाराच्या जाहिराती चुकीच्या होत्या, निवडणुकीचे उमेदवार निश्चित करताना प्रचंड गोंधळ घालण्यात आला आणि मोदींनी उभे केलेले आव्हान समजून घेण्यात काँग्रेसला अपयश आले. त्यात राहुल गांधींच्या मुलाखतीने भर घातली.
याउलट मोदींची प्रचार मोहीम अत्यंत आखीव होती आणि त्यांना काँग्रेसच्या चुकांचा फायदा मिळाला. त्या गोष्टीस आता सहा महिने उलटून गेले आहेत. पण, त्या पराभवापासून काँग्रेसने काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येते. निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला लढण्याची तयारी ठेवावी लागते. निदान तुम्ही लढण्यास तयार आहात हे तरी दाखवावे लागते. राजकीय विश्लेषक प्रताप भानू मेहता यांनी काँग्रेसच्या पराभवाचे अचूक विश्लेषण केले आहे. ‘पराभूत मनोवृत्तीने लढल्याने काँग्रेसचा पराभव झाला,’ असे त्यांचे म्हणणे आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत तर निवडणुकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव पत्करला होता. महाराष्ट्रातील एका काँग्रेस उमेदवारानेच मला सांगितले, ‘‘जी निवडणूक मी हरणार आहे, त्यावर मी पैसे का खर्च करावेत?’’ एकूणच काँग्रेसचे सैनिक हताश झालेले दिसतात. कारण त्यांच्या सरदारांनी निवडणुकीच्या रणांगणावरून पळ काढला होता. १९९९ मध्ये काँग्रेसची हीच बिकट अवस्था होती. वाजपेयी फेरनिवडणूक जिंकले होते आणि काँग्रेस आता संपली, अशीच भावना निर्माण झाली होती. पण, १९९९ ते २००४ या काळात सोनिया गांधींनी अनेक निर्णय घेऊ न विरोधकांनी उपस्थित केलेल्या त्यांच्या विदेशीपणाच्या मुद्याला चोख उत्तर दिले आणि आपले खासदार लोकसभेत रालोआचे हल्ले परतवून लावतील अशी व्यवस्था केली. २००४ च्या निवडणुकीतील काँग्रेसचे यश हे अपघाताने मिळाले होते, असे एकवेळ मानले तरी सोनिया गांधींची ‘आम आदमी’विषयीची भूमिका हतोत्साह झालेल्या पक्षात प्राण फुंकणारी ठरली. त्याहीपूर्वी १९७७ च्या निवडणुकीत आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर काँग्रेस संपली, असेच वाटू लागले होते. पण त्या वेळी इंदिरा गांधींनी आपली प्रतिकार करण्याची क्षमता दाखवून दिली होती. बिहार राज्यातील बेलची या गावाला त्यांनी हत्तीवरून दिलेली भेट हे त्यांच्या निधडेपणाचे निदर्शक आहे. त्या वेळी जनता पक्षात पडलेली फूट आणि त्या पक्षाने केलेल्या चुका काँग्रेसच्या मदतीला धावून आल्या. पण त्याही वेळी इंदिरा गांधींसारख्या पक्षाला एकत्र बांधू शकणाऱ्या नेत्याची गरज भासतच होती.
अलीकडच्या काही महिन्यांत राहुल गांधी म्हणजे इंदिरा गांधी नव्हेत, हे दिसून आले आहे. इतकेच नव्हे, तर ते सोनिया गांधीसुद्धा नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे. पराभवाला जिद्दीने तोंड देण्याची क्षमता राहुल गांधी यांच्या आजीत आणि आईतही होती; पण राहुल गांधींनी अगदी उलट केले. ते स्वत:च्या कोषातच बसून राहिले. त्यांनी पत्रकारांनाच नव्हे, तर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही भेटणे टाळले. अत्यंत कमी प्रचारसभांना त्यांनी संबोधित केले आणि जनसंपर्काचा कार्यक्रम मुळीच राबविला नाही. जणू राजकारण हे चक्रनेमिक्रमेण चालत असते, असेच काँग्रेस पक्षाला वाटते आहे. त्यामुळे रालोआचे सरकार पाच-दहा वर्षे सत्तेत राहील, पण नंतर पुन्हा सत्तेच्या दोऱ्या काँग्रेसच्या हातात असतील, असेच काँग्रेसला वाटत असते. दहा वर्षांनंतर राहुल गांधी पन्नाशीत पोचलेले असतील आणि त्यामुळे त्यांना सत्तेत बसता येईल, अशी आशा त्यांना आहे. पण, नरेंद्र मोदी म्हणजे मोरारजी देसाई नव्हेत, हे ते विसरतात. ते वाजपेयीसुद्धा नाहीत, तर ते २४ तास काम करणारे राजकारणी आहेत. त्यांना मतदारांच्या बदललेल्या स्वरूपाची जाणीव आहे. लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. शिवाय त्यांच्यापाशी निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज आहे.
काँग्रेसचे बिगरकाँग्रेसी स्पर्धक जसे संपले, तसे नरेंद्र मोदी संपणारे नाहीत. तसे मानणे म्हणजे त्यांनी उभे केलेले आव्हान न समजण्यासारखे आहे. तेव्हा राहुल गांधींनी नरेंद्र मोदींसमोर ठामपणे उभे राहणे एवढाच पर्याय त्यांच्या हातात आहे. अन्यथा सूर्य जसा अस्तास जातो त्याप्रमाणे त्यांनाही अस्तास जावे लागेल. संसदेत त्यांनी विरोधी पक्षनेता ही भूमिकाही स्वीकारली नाही. येथेच काँग्रेससाठी अडचण निर्माण झाली. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वत:चा प्रभाव निर्माण केला नाही. यावरून मोदींना पर्याय देण्याच्या जबाबदारीपासून ते दूर जात आहेत, असेच दिसते. घराणेशाहीच्या प्रभावामुळे त्यांच्या स्थानाला काँग्रेसमध्ये सध्या तरी धोका नाही. काँग्रेसच्या नेत्यांना बंडखोरी करण्याचा तिटकारा असला, तरी राहुल गांधींनी त्यांना जिंकून घेतले पाहिजे. काँग्रेस पक्षावर सतत ६० वर्षे राज्य करणाऱ्या नेहरू-गांधी घराण्यातील ते एकमेव अशीे व्यक्ती आहेत जी लोकांच्या आदरास पात्र ठरू शकली नाहीत. तो आदर मिळविण्यासाठी त्यांनी पुढे येऊन आपल्या पक्षाचे नेतृत्व करायला हवे. भूपिन्दर हुडा किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पराभवाची शक्यता असलेल्या युद्धाची जबाबदारी त्यांनी सोपवावयास नको होती. आजच्या राजकारणात ‘आयटम’ नंबरला कोणतेही स्थान नाही.