आडवाणींविषयीची अनुकंपा
By Admin | Updated: April 4, 2015 00:35 IST2015-04-04T00:35:09+5:302015-04-04T00:35:09+5:30
बेंगळुरू येथे सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्या पक्षाचे एक संस्थापक व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी भाषण द्यावे अशी

आडवाणींविषयीची अनुकंपा
बेंगळुरू येथे सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्या पक्षाचे एक संस्थापक व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी भाषण द्यावे अशी विनवणी करायला गेलेल्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला ‘आपण अधिवेशनाला येऊ पण त्यात बोलणार नाही’ असे आडवाणींनी सांगितल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. १९८०मध्ये अटलबिहारी वाजपेयींसोबत भाजपाची स्थापना करण्यात आडवाणी आघाडीवर होते. १९९०च्या दशकात त्यांनी पक्षाच्या विजयासाठी काढलेली रथयात्रा पक्षाला सत्तेपर्यंत पोहचविणारी आणि अटलबिहारी वाजपेयींना पंतप्रधानपदावर बसविणारी ठरली. त्यांच्या मंत्रिमंडळात आडवाणी प्रथम गृहमंत्री व पुढे उपपंतप्रधान झाले. फाळणीपूर्वीच्या कराचीतच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक बनलेले आडवाणी प्रथम जनसंघाचे तरुण नेते झाले व पुढे त्या पक्षाचे ते अध्यक्षही झाले. त्या काळात ते स्वत:, वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाचे अध्यक्षपद आळीपाळीने भूषविले. जनसंघाचे भाजपात रूपांतर झाल्यानंतरही तोच क्रम चालू राहिला. २००९ च्या निवडणुकीत आडवाणी हे पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत त्यांचा पक्ष बहुमत मिळवू शकला असता तर देशाच्या पंतप्रधानपदी त्यांनाच बसलेले आपण पाहिले असते. परंतु तीत त्यांचा पक्ष पराभूत झाला व आडवाणींचे ते स्वप्न विरले. २०१४च्या निवडणुकीत ती संधी पुन्हा एकवार आपल्या वाट्याला येईल अशी आशा ते बाळगून होते. त्यांच्या उंचीचा दुसरा नेता तेव्हा पक्षात नव्हताही. परंतु संघाच्या मोहन भागवतांनी त्यांचा वर्चस्व व अधिकार वापरून आडवाणींच्या त्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फिरविले. भागवतांनी त्यांना पक्षाध्यक्षपद व लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पदही सक्तीने सोडायला लावले. तेव्हापासून आडवाणींची स्थिती राजकारणाच्या अडगळीत टाकल्यासारखी झाली. त्यांच्या व पक्षातील त्यांच्या इतर चाहत्यांच्या समाधानासाठी त्यांना पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात (म्हणजे अधिकारशून्य सल्लागारांच्या समितीत) मोदींनी टाकले. परवा त्यांना पद्मविभूषण देण्याचे औदार्यही त्यांनी दाखविले. मात्र ते करताना ‘देतो ते घ्या आणि गप्प बसा’ असे बजावण्याचाच मोदींचा अविर्भाव होता. हा अपमान पचविण्याची शर्थ आडवाणींनी केली असली तरी त्यांना त्यांची नाराजी कधी लपविता आली नाही. २०१४च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना गांधीनगरची दिलेली जागा घ्यायला (आणि त्यातून मोदींचे उपकार शिरावर घ्यायला) ते तयार नव्हते. त्याऐवजी त्यांना शिवराजसिंह चौहानांच्या अखत्यारीतील भोपाळची जागा हवी होती. मात्र मोदींनी त्यांचे काहीएक चालू दिले नाही. त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मोदींनी गांधीनगरात उभे केले व निवडूनही आणले. तेव्हापासून आडवाणींची अवस्था नुसती अडगळीतलीच नाही तर आश्रिताचीही झाली आहे. मोदींचे सरकार दिल्लीत सत्तारूढ होऊन आता एक वर्ष होत आले. या काळात त्यांनी व त्यांच्या सरकारने आडवाणींशी सल्लामसलत केल्याचे वा त्यांची साधी विचारपूस केल्याचेही कधी दिसले नाही. नभोवाणी मंत्री ते गृहमंत्री व पुढे उपपंतप्रधान राहिलेले आडवाणी या काळात लोकसभेत येत व जात राहिले. त्यांनी कधी कोणती महत्त्वाची भाषणे केली नाही वा त्यांच्या कोणत्या वक्तव्याला माध्यमांनी महत्त्व दिले नाही. सारे आयुष्य घराचे कर्तेपण केलेल्या माणसाच्या वाट्याला सेवानिवृत्तीनंतर जशी उपेक्षेची अवकळा चढते तशी ती आडवाणींवर संसदेत, पक्षात आणि देशातही चढलेली दिसली. जम्मू आणि काश्मिरात अलीकडेच पीडीपी-भाजपाचे संयुक्त सरकार स्थापन झाले. त्याच्या शपथविधीच्या सोहळ्याला आडवाणी हे मुरली मनोहर जोशींसोबत हजर होते. पण त्यासाठी त्यांना मिळालेले निमंत्रण भाजपाचे नव्हते, पीडीपीचे होते. आडवाणी हे स्वाभिमान बाळगणारे नेते आहेत. त्यांना त्यांची होत असलेली उपेक्षा दिसत असणार आणि ती त्यांना सहनही होत नसणार. पण पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते म्हणून ते सारे मुकाट्याने पचविण्यावाचून त्यांच्याजवळ दुसरा मार्ग तरी कोणता आहे? बंगळुरुचे त्यांना आलेले निमंत्रण या पार्श्वभूमीवरचे आहे. ते स्वीकारतानाची त्यांची नाराजी त्यांनी लपवून ठेवली नाही. एखादेवेळी ते तेथे जातील आणि साऱ्यांच्या आग्रहाखातर भाषणही देतील. पण त्यात ते पूर्वीचे आडवाणी असणार नाहीत. ‘आता उरलो आशीर्वादापुरता’ असेच त्याचे स्वरूप असेल. त्यांच्या आशीवार्दालाही मोदींच्या लेखी आता फारशी किंमत नाही. प्रथम आडवाणींना व नंतर गडकरींना आपल्या मार्गातून बाजूला करतानाच त्यांचे मोल मोदींनी ओळखले आहे. तशा आपल्या चढतीत संघ परिवारही आपल्या मागे असल्याची खात्री त्यांनी करून घेतली आहे. भागवतांना आडवाणी चालत नव्हते आणि मोदींना त्यांना नुसते सांभाळायचेच होते. आडवाणींची वंचना मोदींना ठाऊक आहे आणि अमित शाह यांनाही माहीत आहे. आताच्या स्थितीत त्यांना आडवाणींनी उठाव करणे मान्य होणारे नाही. संघाला ते चालणारे नाही. आडवाणींची व्यथा, ही की ते हे सारे जाणून आहेत. आपली उपेक्षा पाहणे व ती न बोलता सहन करणे या एवढी दु:खाची बाबही कोणती नाही. त्याचमुळे त्यांच्याविषयीच्या आदराएवढीच त्यांच्याविषयीची सहानुभूती बाळगणेही गरजेचे आहे.