पक्षवाढीसाठी ‘नवीन सिलॅबस’ बनवण्यासाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 10:08 AM2021-07-11T10:08:50+5:302021-07-11T10:09:31+5:30

भाजपच्या न झालेल्या चिंतन बैठकीचा वृत्तांत.

Committee to formulate new syllabus for party growth devendra fadnavis chandrakant patil | पक्षवाढीसाठी ‘नवीन सिलॅबस’ बनवण्यासाठी समिती

पक्षवाढीसाठी ‘नवीन सिलॅबस’ बनवण्यासाठी समिती

Next
ठळक मुद्देभाजपच्या न झालेल्या चिंतन बैठकीचा वृत्तांत.

अतुल कुलकर्णी 
मुंबई : पक्षवाढीसाठीचा नवीन सिलॅबस, नवीन नेत्यांना सोबत घेऊन तयार करावा. जुन्या नेत्यांकडे आता सांगण्यासारखे फार काही उरलेले नाही. ते विनाकारण बोधामृत देत राहतात. त्यापेक्षा शिवसेनामार्गे, काँग्रेस, व्हाया भाजपमध्ये आलेल्या नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद लाड, राम कदम, प्रवीण दरेकर यांची एक समिती नेमून नवीन सिलॅबस फायनल करावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपच्या न झालेल्या चिंतन बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

नवीन लोकांमध्ये विशेष गुण असल्याचे पक्षाला जाणवले. त्यामुळेच नव्या लोकांना संधी दिली असेल, असे विधान पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे पक्षाच्या न झालेल्या चिंतन बैठकीत यावर गंभीर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ज्यांना आपण संधी दिली, आमदारकी, मंत्रिपदे दिली. त्यांनी पक्षासाठी काय केले? त्यांच्यात असे कोणते विशेष गुण आहेत, म्हणून त्यांना ही संधी मिळाली? हे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे, म्हणजे कार्यकर्ते पक्ष वाढवतील, अशी चर्चा झाली. त्यासाठी पक्षाचा इतिहास नव्या पिढीला व्यवस्थित सांगता आला पाहिजे, यावर खलबते झाली. कोणता इतिहास शिकवायचा यावर मात्र नेत्यांचे काही केल्या एकमत झाले नाही. गोळवलकर गुरुजींपासून सुरुवात करायची की, मधल्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षासाठी काय केले हे सांगायचे, की सध्याच्या राजकारणात आपल्याकडे कसे व कोणते लोक आहेत, त्यांचा पूर्वेतिहास काय आहे, याविषयी सांगायचे?, असे गहन प्रश्न बैठकीत चर्चेला आले होते. 

नव्याने पक्षात येणाऱ्यांसाठी नेमका सिलॅबस कोणता ठेवायचा? कोणत्या नेत्यांची नेमकी कोणती माहिती त्यांना द्यायची? जेणेकरून त्यांना पक्षात गतीने वरच्या जागा पटकावता येतील, यावर जोरदार विचारमंथन सुरू झाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी कशा पद्धतीने पक्ष वाढवला? अडवाणी यांनी रथयात्रा काढून देशभरात पक्षासाठी कसे पूरक वातावरण तयार केले? या गोष्टी शिकवायच्या की नव्याने पक्षात आले आणि आमदार, मंत्री, विविध पदे गतीने मिळवणारे रमेश कराड, गोपीचंद पडळकर, नारायण राणे, राधाकृष्ण विखे, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड यांनी कशा पद्धतीने स्वतःचे स्थान पक्षात निर्माण केले याची माहिती द्यायची? यावर काही केल्या निर्णय झाला नाही. 

सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमावी. ते यावर मार्ग काढतील, असा प्रस्ताव एका नेत्याने दिला. मात्र प्रसाद लाड आणि राम कदम यांनी तो प्रस्ताव देणाऱ्याकडे असे काही डोळे मोठ्ठे करून पाहिले की, तो प्रस्ताव पुढे नेण्याची कोणाची हिम्मतच झाली नाही. मनसेमार्गे भाजपमध्ये आलेले प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेबद्दल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले तर काय सांगायचे? प्रसाद लाड आधी राष्ट्रवादीत होते. एकेकाळी छगन भुजबळ यांचे ‘ब्लू आइड बॉय’ असणारे लाड यांचा क्रिस्टल क्लीअर कारभार नेमका कसा सांगायचा? राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्ये होते. नंतर अचानक भाजपमध्ये स्वतःच्या विरोधी पक्षनेते पदासह कसे आले? ही किमया त्यांनी कशी साधली? यावरही एक चॅप्टर नव्या सिलॅबसमध्ये असावा असाही सूर पुढे आला. राष्ट्रवादीत असणाऱ्या चित्रा वाघ यांनी पक्ष सोडताना स्वतःच्या नेमक्या कोणत्या अडचणी शरद पवार यांना सांगितल्या आणि भाजपचा मार्ग स्वीकारला? अशा अडचणी सांगून दुसऱ्या पक्षात जाता येते का? यावर नव्याने पक्षात येणाऱ्यांसाठी व्याख्यान ठेवले पाहिजे, असा मुद्दा लाड यांनी मांडला खरा, मात्र त्याला फारसे कोणी अनुमोदन दिले नाही. 

मुंबईतल्या अधिवेशनात दरवेळी प्रकाश मेहता सगळ्या आमदारांसाठी थेपले, खाकरा, ढोकळा कसे घेऊन येत असत. त्यासाठीचे नेमके नियोजन ते कशा पद्धतीने करायचे? विनोद तावडे सगळ्या आमदारांच्या जेवणाची कशी व्यवस्था करायचे? यावरही विस्तृत मार्गदर्शन असावे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींची मोट बांधण्यासाठी  विदर्भात केलेल्या कामाची नेमकी नोंद कशा पद्धतीने सांगायची? यावरही सखोल चर्चा झाली. अखेर प्रश्नच जास्त समोर येऊ लागले. एकाही प्रश्नाचे उत्तर मिळेनासे झाले, म्हणून ही चिंतन बैठक पुन्हा घेण्याचा निर्णय झाला.

... तर उत्तर काय द्यायचे?
भाऊसाहेब फुंडकर, विनोद तावडे या विधान परिषदेच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी पक्षासाठी नेमके काय केले? विरोधी पक्षनेतेपदी असताना एकनाथ खडसे यांनी पक्षासाठी रसद पुरवण्याचे काम केले. त्यावेळी ती रसद कोणत्या तत्त्वात बसत होती, असे जर कोणी विचारले तर त्याचे उत्तर काय द्यायचे? 

Web Title: Committee to formulate new syllabus for party growth devendra fadnavis chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.