भाष्य - आप्पांची भांडणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:12 IST2017-05-05T00:12:39+5:302017-05-05T00:12:39+5:30
भारतीय जनता पक्षाचे दक्षिणेतील विजयी महाद्वार म्हणून २००८मध्ये कर्नाटकाचे उदाहरण दिले जात होते. कारण जनसंघ ते भाजपा

भाष्य - आप्पांची भांडणे
भारतीय जनता पक्षाचे दक्षिणेतील विजयी महाद्वार म्हणून २००८मध्ये कर्नाटकाचे उदाहरण दिले जात होते. कारण जनसंघ ते भाजपा या प्रवासात दक्षिण भारतातील एकाही राज्याने या पक्षाला स्वीकारलेले नव्हते. कर्नाटकात सत्तेवर येण्याचा प्रयत्न प्रथमच यशस्वी ठरला होता. त्या यशाचे नायक भाजपाचे कर्नाटकातील प्रथम मुख्यमंत्री बी. एस. येड्डीयुराप्पा होते. मात्र, या सरकारच्या पाच वर्षांच्या कालखंडाच्या अखेरीस भाजपांतर्गत गटबाजीतून वाताहत झाली. येड्डीयुराप्पा यांना भाजपातून बाहेर पडावे लागले. त्यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. या पक्षाला २०१३च्या विधानसभा निवडणुकीत केवळ दहा टक्के मते आणि त्यांचे सातच आमदार निवडून आले. पण त्या दहा टक्के मतांच्या विभाजनाने काँग्रेसचे पन्नासहून अधिक आमदार विजयी झाले. हा सर्व इतिहास ताजा असताना केवळ अकरा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये पुन्हा गटबाजीने डोके वर काढले आहे. यावेळची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा येड्डीयुराप्पा यांच्या भोवतीच घोंगावते आहे. कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वराप्पा यांनी येड्डीयुराप्पा यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. केवळ स्वत:च्या माणसांचे पक्षात महत्त्व वाढविण्याचे, त्यांना पदे देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या कामाची पद्धतही एकाधिकारशाहीची आहे, असा आरोप ईश्वराप्पा यांनी येड्डीयुराप्पा यांच्यावर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या गटबाजीने सार्वजनिक रूप धारण केले आहे. याची पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने नोंद घेतली. पक्षाचे राष्ट्रीय निरीक्षक पी. मुरलीधर राव यांनी तातडीने बंगलोर गाठले. त्यांनी दोन्ही गटाच्या प्रत्येकी दोन पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकले. दरम्यान, माजी मंत्री व्ही. श्रीनिवास प्रसाद यांना येड्डीयुराप्पा यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले. या कृतीने ईश्वराप्पा यांच्या गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १० मेपर्यंत पक्षातील येड्डीयुराप्पा यांचा एकाधिकार पद्धतीचा कारभार बंद झाला नाही तर आपला गट वेगळा विचार करेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. ईश्वराप्पा यांनी संगोळी रायण्णा ब्रिगेडच्या व्यासपीठावरून चालविलेली मोहीम येड्डीयुराप्पा यांची अडचण ठरली आहे. संगोळी रायण्णा यांना क्रांतिकारक म्हणून धनगर समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. त्या समाजाला दुखावण्याचे धाडस भाजपा करू शकत नाही. त्याचवेळी लिंगायत समाजाचे आयकॉन समजणारे येड्डीयुराप्पा यांनाही डावलायचे नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या लढाईपूर्वीच भाजपा गटबाजीने बेजार झाला आहे. या दोन आप्पांची सत्ताकांक्षा दडून राहिलेली नाही. मात्र, भाजपा यापैकी एकालाही डावलू शकत नाही. त्यांना एकत्र आणण्याचे आव्हान पक्ष कसे पेलतो त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.